मसनखडी आणि चुनीलाल गवळी
मसनखडी आणि चुनीलाल गवळी चुंनीलाल गवळी बद्दल मला प्रचंड आदर आहे , त्याची सेल्फ लेस (निस्वार्थी) सेवा वाखणण्याजोगी आहे. त्याला आमंत्रण लागत नाही , कुठल्याही सामाजिक कामासाठी तो सदैव तयार असतो आणि कुठल्याही वेळेला. तो मुळात सेवा करतोय हे सुद्धा त्याच्या गावी नसेल. बोलायला फटकळ म्हणजे अगदी फाटक्या तोंडाचा पण त्याला भान आहे कुणाला टोमणे द्यायचे आणि कुणाला नाही. मी त्याला नमस्कार करू शकत नाही कारण तो मामा आहे. कुणाच्याही मयतीला हा सर्व प्रथम हजर असतो. सगळे दू:खात असतात तेंव्हा याचे एकच काम "रडणार्या जीवांना हलकासा आधार आणि दटावणी देऊन हा प्रेताचे सोपस्कार पूर्ण करणे" मसणात लाकूड आहे किंवा नाही , कुणाकडून ते घेता येईल ते त्याला माहीत असते. लागणार्या तुर्खाट्यांचा भारा आणला की नाही , आणला नसेल तर परस्पर तो कुणालातरी सांगून मागवून ठेवतो. किरडी साठी लागणारे बांबू , मयताचे सामान , फेकायला लागणारी चिल्लर , अगरबत्ती , कपूर , हळद कुंकू , तांदूळ , आगीचे मटके , लागणारी दोरी , पायाचे बोट बांधला लागणारी तार , कपाळावर ठेवायला लागणारा रुपया , तोंडात द्यावे लागणारे बिड्याचे पान , प्रेता...