मसनखडी आणि चुनीलाल गवळी
चुंनीलाल
गवळी बद्दल मला प्रचंड आदर आहे, त्याची
सेल्फ लेस (निस्वार्थी) सेवा वाखणण्याजोगी आहे. त्याला आमंत्रण लागत नाही,
कुठल्याही सामाजिक कामासाठी तो सदैव तयार असतो आणि
कुठल्याही वेळेला. तो मुळात सेवा करतोय हे सुद्धा त्याच्या गावी नसेल. बोलायला
फटकळ म्हणजे अगदी फाटक्या तोंडाचा पण त्याला भान आहे कुणाला टोमणे द्यायचे आणि
कुणाला नाही. मी त्याला नमस्कार करू शकत नाही कारण तो मामा आहे. कुणाच्याही मयतीला
हा सर्व प्रथम हजर असतो. सगळे दू:खात असतात तेंव्हा याचे एकच काम "रडणार्या
जीवांना हलकासा आधार आणि दटावणी देऊन हा प्रेताचे सोपस्कार पूर्ण करणे"
मसणात
लाकूड आहे किंवा नाही, कुणाकडून
ते घेता येईल ते त्याला माहीत असते. लागणार्या तुर्खाट्यांचा भारा आणला की नाही ,
आणला नसेल तर परस्पर तो कुणालातरी सांगून मागवून ठेवतो.
किरडी साठी लागणारे बांबू , मयताचे
सामान, फेकायला
लागणारी चिल्लर , अगरबत्ती
, कपूर,
हळद कुंकू , तांदूळ
, आगीचे मटके ,
लागणारी दोरी , पायाचे
बोट बांधला लागणारी तार, कपाळावर
ठेवायला लागणारा रुपया, तोंडात
द्यावे लागणारे बिड्याचे पान , प्रेताचा
चश्मा किंवा तत्सम स्ववस्तू, गव्हाचे
पिठाचा गोळा , अग्यारीचे
सामान , गंगाजल
किंवा नदीत लागणारा पाण्यासाठीचा लोटा हे सगळे त्याच्या अगदी लक्षात असते आणि
तटस्थ अवस्थेत तो सगळे सोपस्कार पार पाडतो. त्याची गाडी बहुतेक टाकल्याशिवाय सुरू
होत नाही पन टाकून सुद्धा तो सगळ्यात जास्त शुद्धीत कसा राहू शकतो हे कोड मला सुटत
नाही, मृत्यू
अटळ आहे आणि तो ज्या निर्विकार्तेणे त्याला स्वीकारतो ते बुद्धीच्या पलीकडचे आहे.
तिरडीची बांधणी झाली की याच्या ऑर्डर सुटायला सुरवात होतात,
बस
व्होयो , जाबालो
आदमी वापस नही आव, थम
आब रोरो कण उकी घाण मत करो , उरकाव
जलदी ! हाथ लगा शिवलाल देखरे कायी है ? प्रेताचा
इतका घाण वास येतो की त्याला राम म्हणणारी बायको सुद्धा त्याला शिवायला पाहत नाही
तिथे हा चुन्यामामा त्याला अगदी साबण लाऊन न्हावू माखू घालतो लहान बाळासारखा.
त्याला वास नाही येत - कदाचित नवटाक मारल्यामुळे असेल म्हणा पण त्याची तन्मयता
वेगळीच असते. येरवी दारू पिवून याची त्याची मैयाकू करणारा मामा ,
इतका समजूतदार आणि इतका संतासारखा स्थिरचित्त कसा बनतो ?
त्याला काहीतरी माहीत असावे जगावेगळे.
प्रेत
धुणे नंतर त्याला कपडे घालणे, लाकडासारखे
कडक झालेले मढे, त्याचा
तोल सांभाळणे त्याला मित्रासारखा आधार देत,
तोल सांभाळत तो निजवतो तिरडीवर. मग सुरू होतात बांधायचे
सोपस्कार, डोक्याच्या
खाली आधार, मान
तिरकी होऊ नये म्हणून दोन्ही बाजूने जपून आणि मापून ठेवलेली गादी. टाळू वरचा रुपया,
तोंडात टाकलेला बिडा,
तळ पायाची बांधलेली बोटे. पायाची दिशा उत्तरेकडे होणार
नाही याची घेतलेली काळजी.अनंताच्या प्रवासाला डफ वाजवीत बुवा आणि चुंनीलाल मामाच
पोहोचवतो. इतके सगळे करून तो सगळ्यांच्या आधी मसनवटीत पोहोचून सरणाची तयारी करत
असतो.
अग्निडाग
मुलाच्या हातून होतो म्हणून मुलगा सगळ्यांच्या पुढे असतो, डफ वाजवित बुवा ठराविक लयीत चालतो "ढम - ढम " इतकी
शांतता त्या गावात फ़क़्त माय्तीलाच असते, आजूबाजूचे
बघे कपडे हलवून हवा दिल्यासारखे करतात , कोणी
पाणी भारलेली कळशी टाकतो त्या रस्त्यावरून.
"राम
बोलो भाई राम बोलो" किंवा "राम नाम सत्य है",
फेकलेल्या चिल्लर चा आवाज येतो- ती वेचण्यासाठी मुले झडप घेतात. यात्रा नदी क्रॉस करते.
चुण्यामामा
आणि आणखी दोघे तिघे सरण रचतात, खाली
मोठे लाकड, वरती
छोटे , बाजूला
आधारासाठी लावलेली टेकू देणारी लाकडे , वर
तुरखातीची बिछायीत. तिरडीवरून प्रेत उचलून ते व्यवस्थित लाकडांमध्ये रचणे आणि
त्यावर मोठी लाकडे रचून, चेहरा
झाकायच्या आधी तो पाणी पाजायला मदत करतो. नदीच्या पाण्यात कुणाचातरी बागायतदार
रुमाल भिजवून तोच मुडद्याच्या तोंडात पिळला जातो.
बस्स
, इथून पुढे मामाचे काम सुरु
होते. चेहरा झाकला कि तो परत वरती लाकडे रचतो,
बाजूला तुरखात्या व्यवस्थित पसरवतो,
त्याच्या हातात एव्हाना मोठा बांबू असतो,
मुलाने अग्निडाग दिल्यानंतर तो त्या धग-धगत्या अग्नीला
अधिक वाढवायचे काम करतो, प्रसंगी
राकेल किंवा तुम ओततो. आलेले सगे सोयरे गोवरीचे तुकडे फेकून शेवटचे उरकून पळत
असतात तेंव्हा मामा उभा असतो टोकर घेऊन तो वाट पाहत असतो कवटी फुटायची
"फट" आवाज ऐक्ल्याशिवाय तो हलत नाही. नंतर तो गायब होतो.
मग
कधी भेटला तर दसर्याला पाय पडतांना नाहीतर पोळ्याचा बैल उडवतांना नाहीतर
कुस्तीच्या मैदानात गोंधळ घालतांना. बाकी वेळ भेटणारा मामा कुणाच्या तरी आई
बहिणीचा उद्धार करत असतो.
"आर
पण म काही कह्यरे हय सून त लेव - म्हणजे थम्कू काई वाट मन पेल है ... इकी मैय्याकू
! आपण काई कोनकू गाली देवा ?
मामा आज वारले, त्यांना परमेश्वर सदगती देवो , हीच त्या प्रभू चरणी प्रार्थना. हे असे एकेक बुरूज ढासळून पडले आणि तो मनातला गाव अधिकच भोंडा वाटायला लागतो, आपली ओळख काळा आड जाते आहे हे निश्चित !
Comments
Post a Comment