मराठी मुलांची शाळा, कासमपुरे

 

मराठी मुलांची शाळा

वडील वारल्यानंतर अर्ध्या दुसरीत माझा दाखला झाला ह्या शाळेत. वाईट दिवसातील शाळा जीने मला शिक्षणासोबत व्यवहार ज्ञान दिले. शाळा होती १-७  वर्ग एकूण बांधकाम झालेले वर्ग ५ अर्ध्या वर्गात मुख्याध्यापकांचे हाफिस.


पटावर ३००, हजर ८०, बाकी गैरहजर.  शाळा भरायची सकाळी ८:३० ते ११:३० मग दुपारी २:३० ते ५:००. एकून शिक्षक, मुखायाध्यापक पकडून ५. दुसरीत आम्हाला ६ वी चा सगळा सिल्याबस पाठ होता. आणि जसे वर्ग वाढले तसे आम्ही एका वर्गात दोन वर्गांचे शिक्षण घेतले. काहीवेळा आम्ही वरच्या वर्गात गेलो आणि अभ्यासक्रम बदलला कि आणखी एक असे तीन तीन सिल्याबस शिकल्यामुळे आम्ही खूप शिल्लक होतो. मुलांना अगदी पदवीत्तर शिक्षण दिले तरी ते दिवे लाऊ शकतात असा माझा ठाम विश्वास आहे. 

जाहीर आहे, एका वर्गात २ इयत्ता बसल्यामुळे त्याचे नको ते शिक्षण आम्ही किती लवकर शिकलो ते सांगू शकत नाही. सकाळी शाळेची घंटा वाजायची (एका इलेक्ट्रिक पोलचा १ फुटाचा तुकडा तारेने लटकवलेला होता मुख्याध्यापाकाच्या वर्गाबाहेर, वाजवायचा लोखंड तिथून उचलून त्या पोलवर तालात, लयीत (लटकावलेला असल्यामुळे तो हलायचा) आदळायचा.) हे काम करण्यासाठी शाळेत काही मुले लवकर येत. सगळ्यात पहिले वर्ग झाडायचा, एकमेकांना शिव्या देऊनच इकडची धूळ तिकडे उडवायची, समोरून कोणी आले तर जोरात उडवायची.

तुले दिखून नि राहिल का मंग, फुटले का तुह्ये? इकडी कामून येऊ राह्यला

गावात, घरात परदेशी भाषा आणि शाळेत मराठीचा अट्टाहास. गुरुजी माळी, तेली, वडार, सुतार मराठी आणि त्यात अहिराणी, खान्देशी, कुणबी, परदेशी, लेवा पाटील अशी मिसळून एक वेगळीच भाषा आम्ही बोलायचो.

थारी मैयाकू $%$^ Vs थुत्री फोडून टाकीन तुही छीनालच्या. (हा एक वेगळा संशोधनाचा विषय आहे त्याला नंतरच्या आवृतीत लिहीन, तितके पत्र वाचकांनी लिहिले तर.)

वर्ग झाडून झाले कि पट्ट्या अंथरायच्या, अंथरतांना त्या जोरजोरात झटकायच्या , इतक्या जोरात कि दुसऱ्या टोकाचा मुलगा पडला पाहिजे. मग सफायीचा वर्ग, अंगण सफाई. मोठा बाभळीचाकाटा आणून त्याने सगळी अंगणातील पाने टोचून टोचून गोळा करायची, संशोधन सारखी गोष्ट आहे. सफाई झाली कि मग प्रार्थना. बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहोनाहीतर खरा तो एकाची धर्म, जगाला प्रेम अर्पावेमग प्रतिज्ञा मग कुणी मेलेला असला तर २ मिनिट शांतता मग एक साथ बैठ जावो. 

पुज्य गुरुजी आणि माझ्या बालमित्रांनो मी तुम्हाला ये बी शी डी सांगून दावतो ती तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावी हि नम्र विनंती –abcdefghijklmonopqrstuvwxyz वेळ फक्त ५ सेकंद. संपवून बसतांना गड जिंकल्याचा आनंद आणि मित्राकडे पाहून आता तुझे काय व्हणार रे सांबा ची चमक डोळ्यात. वरच्या वर्गातील मुलांना सभाधीटपण येण्यासाठी वेगवेगळे गुरुजी वेगवेगळे प्रयोग करायचे. हा त्यातलाच एक नमुना. बर्याच वेळा पुज्य गुरुजी आणि माझ्या बालमित्रांनो मी तुम्हाला ये बी शी डी सांगून दावतो ती तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावी हि नम्र विनंती....पुढचे आठवायचे नाही, पाय लटपट, पोटात गोळा, घश्यात कोरडे, पायाच्या बोटांनी जमीन उकरायची, हातांना घाम असे २ मिनिट जायचे मग गुरुजी म्हणायचे उद्या नीट म्हण बाळ नाहीतर सर्वांसमोर कान उपटायचे. हि अनिर्वाच्य अवस्था, योग्यांना साधत नाही ती आम्हाला सहज साधायची. कधी तिथेच पीटी चा तास म्हणजे खाली बसून जोरजोराने हाथ हलवायचे. माना तिरक्या करून आवडत्या मुली बघायच्या, इतरांची फजिती बघायची. 
कालच्या दिवशी ज्यांनी ज्यांनी जैन गुरुजीना चिडवले ते उभे राहा, मग काय ३० मिनिटाची फुकटची करमणूक. पहिले फटके मग पालकांना बोलवून आणा. म्हणजे पालक सभ्य असतील त्यांनाच. गुरुजी हा अत्यंत सावध प्राणी असतो.

प्रार्थना झाली कि रांगेत वर्गात जायचे असायचे मग कुणीतरी गुर्जी लघी करून यीवू?” वर्ग सुरु झाला कि लक्षात यायचे पटावर आणि हझर मध्ये फरक खूपच जास्त आहे. आम्हाला कळायचे आता गुरुजी म्हणणार,

अरे त्या बळीराम चे घर कुणाला माहित आहे का रे

गुर्जी मी ! गुर्जी मी !... ३-४ जणांना चान्स मिळायचा वर्ग बुडवायचा, सोबत लघीला गेलेला एक असे ५ जन मग बल्ल्या च्या घरी.

बल्ल्यो है कि बाबा ?

उकू गुर्जीना बलायो लगेच! 


बळीराम चे वडील उवाच: उठ रय बल्लू, लगा जोर ! देख थारा सोबती आगया थकू बलाब. 

बल्कीला भविष्य कळायचे. तो म्हणायचा,

पेट दुखरे है बाबा काल (उद्या) जान्गो.. 

नाही आबाच बलायेल है : आम्ही. 

आम्ही: हम चल्या थकू जाणो होणगो त जा.

आमु जातो रय गण्या त्या चीपटी च्या सुन्याकडी ( ४-५ सुनील होते त्यात एकाच्या आयीचे नाक चपटे होते, एक कहीटा खालचा सुनील, एक बोयचा तर एक भौचा). 


मग आई बघायची

कारे तुम्ही शाळेत नाही कसे “ ? 

आम्ही एकसुरात : त्या बल्ल्याला बोलवायला आलो होतो.

जितके रमत, गमत जाता येयील तितका अभ्यास वाचायचा, कुणाला आवडतो कोंडवाडा ? परत पोहोचून गुर्जींना रिपोर्ट द्यायचा,

गुर्जी बल्की ढोंग करत व्हता. 

मागून बल्की : कायीबी कि छीनाल्कानो म त थमारास पहिले आ गयो. 


जीवनाच्या कुठल्या शाळेत मिळेल हे कुरघोडीचे, मखलाशीचे, हजरजबाबीपणाचे शिक्षण ? आमच्या शाळेत फी नव्हती पण गुरुजी कुटून कुटून शिकवायचे. 


लघीचा टोल झाला कि मुले गेटाकडे, मुली शाळेच्या पाठीमागे लघवीला जायचे. गेट जवळच सरकारी विहीर होती. इकडच्या बाजूला आधीच कुणीतरी लांगी (चर) कोरून ठेवलेली असे, आमचे टार्गेट म्हणजे मुताची धार नदीपर्यंत पोहोचली पाहिजे गेटातून येणाऱ्या प्रत्येकाला आम्ही लंगीत मुतणे किती गरजेचे आहे ते पटवून सांगायचो.  बहुतेक धरणात मुत्नारा मंत्री लहानपणी आमच्या सारखाच लांगीत मुतला आसन.


तेव्हड्या वेळेत कुणी घरी चक्कर टाकून यायचा बाकी बरेच शेजारच्या शेतात बोर,भोकरे, जांभूळ, कहीट, कैऱ्या आणायला पळून जायचे. सीजन प्रमाणे आमची दिशा बदलायची, सगळे फुकट होते. गेट बाहेर विकनार्याची गाडी नव्हती कि कुणाच्या खिशात पैका नव्हता घेण्यासाठी. चप्पल कुणाच्याच पायात नसायची, चालताना काटा मूडला (रुतला) आणि बहुतेक सराटयाचा काटा काढायला कुणी खाली वाकायचा नाही, त्याला पायानेच जमीनीला घासून काढणारे मजबूत पाय होते. 
अशी आमची मुले - रानातली फुले होती - कविता जगायचो आम्ही !


लहान वयात मोठ्या वर्गात बसल्याने किती ज्ञान प्रसारित होते हे मला माहित आहे. रम्या नवले (बिडीचे थोटक) गोळा करून आणायचा आजोबाची फेकलेली. लाखन माचीस आणयचा मग सगळे शाळेच्या मागे जायचे, जहिरी नागीनचे (एक प्रकारची घाणेरी सारखी वनस्पती) दाट जाळे होते नदीकाठी, तिच्यात घाबरून कुणी जायचे नाही, सेफ जागा होती ती बिड्या ओढायला. मी तुलनात्मक थोडा नाजूक असल्यामुळे अशा ठिकाणी मला ते टाळायचे. बिड्या पिल्याने सामानाची वाढ होते असे कुणीतरी त्यांच्या डोक्यात टाकलेले होते. कहीटा खालचा सुनील हा मुलींच्या लडिवाळ आग्रहाला बळी पडून सगळे पिकलेले कहीट त्यांना न मागता आणून द्यायचा मग आम्ही त्याचे नाव भोस्क्या ठेवले होते. छिद्राला तो भोसक म्हणायचा. कुणालाही एकेरी आयीच्या किंवा बापाचा नावाचा उद्धार करून बोलवायची प्रथा होती. 

रतिलाल हा ब्राम्हणाचा मुलगा होता, त्याचे वडील हे प्रसिद्ध ब्राम्हण होते. रतिलाल चे नाव लत्या. मला कुस्तीचा एकमेव जोडीदार कारण बाकी सगळे मला लगेच पाडायचे. शाळा संध्याकाळी खेळायला सुटायची. त्या तासाला आम्ही कबड्डी किंवा कुस्त्यांची पकड करायचो. जेव्हा लत्या नसायचा तेव्हा मी टिवल्या बावल्या करत फिरायचो. एकदा मला पट्टीने खडे मारायची सवय लागली. जिकडे तिकडे मी फुट पट्टी स्प्रिंग सारखी वापरून छोटे खडे भिरकावयचो. असाच एकदा न विचार करून मारलेला खडा जैन गुरुजींच्या एकुलत्या एक मुलाला म्हणजे नंदूला डोळ्याजवळ लागला. तो जोरात कळवळला. मी पटकन पट्टी वर्गात लपवून आलो. कुणी मारले असा साळसूद पणे विचारू लागलो. बराच गलका झाला त्याला गुरुजींनी पाणी पाजले, त्याचा डोळा थोडक्यात वाचला. शाळा सुटली, बाहेर नान्या उभा. माझ्याकडे बोट दाखवून म्हणतो कसा कहु म थारो नाव भूवाकू” (सांगतो मी तुझे नाव आत्याला). घरापर्यंत मी त्याला खाऊ कि गिळू ह्या नजरेने पाहत होतो पण त्या दिवशी मार चुकला. 
शाळा सुटल्यानंतर शाळेत कोण जात असतील रात्र झाली कि आम्ही पकड करायला शाळेतील आखाड्यात जायचो, म्हणजे सगळे मोठे पहिलवान असायचे. हात किंवा पाय तुटेल ह्या भीतीने मला त्यांच्या सोबत खेळायला भीती वाटायची. ते सगळे पकड झाली कि नदीवर डोहात उड्या टाकायची. 


त्यानंतर रात्री गांजा वाले शाळेत यायचे. सकाळी व्हरांडा झाड्तांना नारळाच्या जळलेल्या दोराचे तुकडे मिळायचे. खूप प्रयत्न केले तरी ते वर्गाच्या दारांना लाथा मारून कुलूप कडी सहित दार उघडायचे. बहुधा त्यांना वर्गात गांजा प्यायला आवडत असावे. गावात झांबर डोकरीचा कैलास एमपी तून गांजा आणायचा, तो फ़क़्त दोन वर्ग पुढे होता. त्याला गुरुजींनी मारून बघितले , समजून बघितले पण बिना आई बापाचा तो आजी सोबत राहून हाता बाहेर गेलेला होता. कुणालाही adjective लाऊन बोलवायची पद्धत होती. त्याची आजी बहुतेक विस्कटलेल्या केसांची असावी किंवा तिचे नाव झुंबर बाई असावे. कैलास हा फारच अवलादी होता, त्याच्या डोळ्यात एक गुन्हेगारी चमक असायची. त्याला नंतर पोलीस पकडून घेऊन गेले, बेड्या टाकलेला कैलास पण जसा काय लग्नाला निघालेला नवरदेव. पोलिसांना तो दादा म्हणत असे. पुढे मनमाड-भुसावळ-भोपाल रेल्वे मार्गावर त्याचे उपद्व्याप चालूच होते. नंतर मात्र त्या बद्दल काही ऐकले नाही. 


शनिवारी अर्धा दिवस शाळा कारण तो बाजाराचा दिवस असे. महिना अखेर घट संमेलन (group meeting) ची सुट्टी, बाकी मग सणावारी सुट्टयाच सुट्टया. शनिवारी आम्ही शाळा सारवायचो, म्हणजे मुलांनी गावातून शेन आणायचे, नदीतून पाणी आणायचे आणि मुलीनी ४-५ जनी मिळून संपूर्ण वर्ग आणि व्हरांड्याचा भाग सारवायचा. दोन मित्र बांबूचा दांडा पकडून , मध्ये बादली टांगून गावभर फिरून शेन आणायचे. २-३ खेपा मारल्यानंतर मग आम्ही हातपाय धुवायला नदीवर जायचो आणि येतांना पाणी आणायचो. नदीवर जाताना कितीतरी लांबून लोखंडी बादली नदीत भिरकावायची, ती बर्याच ठिकाणी चेपलेली असायची. पाणी आणून दिले कि वर्गातील गुरुजींचे टेबल, खुर्च्या बाहेर सरकवायचे. वर्ग वाळला कि परत रचून ठेवायचे. 

सांगा कुणी केलय इतके प्रेम शाळेवर

 

रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारी सगळा वर्ग शेणाने सरावल्यामुळे, लख्ख चमकायचा. नवीन आठवडा सुरु व्हायचा. पावसाळ्यात मात्र नदीला पूर येण्याच्या भीतीने दुपारी लवकर शाळा सोडून द्यायचे. आमचे काही मित्र नदी पलीकडच्या गोठण वर राहायचे. ते प्रकृतीने आमच्या पेक्षा जास्त रानटी होते ( रानातले फुले) त्यांच्या पलीकडे भिल्ल वस्ती होती. गुरुजी शेजारच्या गावातून यायचे. दुपारी ते बहुधा शाळेत डबा खायचे पण ४ वाजता त्यांच्या चहासाठी ते वर्गणी गोळा करून आम्हाला गावात सामान आणायला पाठवायचे. जैन गुरुजींची किराणा दुकान होती, बहुधा त्यांची पत्नी सांभाळायची. आम्हाला सगळे गुरुजी वर्गणी करून पैसे द्यायचे आणि जैन गुरुजी त्यांच्याच दुकानावरून सामान आणयला सांगायचे. चहा, साखर, दुध, काही गाय छाप पुड्या ई. जेव्हा ताई (सगळ्या गुरुमाताना गाव ताई म्हणायचा) माहेरी जायच्या तेंव्हा गुरुजी आम्हाला घराची किल्ली द्यायचे. माकडाच्या हातात मशाल दिल्यावर काय होऊ शकते ? आम्ही सामान आणायचो आणि आम्हाला गुरुजी मार्किंग करून ठेवतात हे सुद्धा माहित होते, तरी शिताफ़ीने बिस्कीट,खारीक, खोबरे, गुळ, गोळ्या,शेंगदाणे यांचा स्टोक मार्किंगसाहित खाली व्हायचा. परत जाऊन गुरुजींची चहा बनवायची, रॉकेल च्या स्टोव्ह वर. पातेले घासायचे, कप बशा विसळयच्या. चहा मुद्दाम जास्त बनवायची मग स्वत पण प्यायची. परत भांडे धुवायचे. 
इतकी सेवा कुणी केली असेल गुरुजींची

सागर गुरुजी खूप मारायचे. प्रत्येक गुरुजींची मारायची एक पद्धत होती जैन गुरुजी वर्गात येताच टेबलवर घड्याळ काढून ठेवायचे, बाह्या वरती केल्या म्हणजे समजायचे कि आता बल्की ला फोडतीलच. त्यांची शक्ती २-३ मुलांमध्ये संपून जायची. मुल थोडावेळ रडल्या सारखी करायची मग विसरून जायची. गुरुजीचा सूड घेतला जायचा, प्रत्येकाच्या वेगळ्या पद्धती होत्या. कुणी सायकलची हवा सोडून, कुणी चावट गाणे म्हणून, कुणी चार चौघात चिडवून, शिव्या देऊन पळून जायचे. मुलगा किती डेरिंगवाला आहे हे तो गुरुजीला कसे नडतो त्यावरून ठरायचे. 

कधी तालुक्यावरून इन्स्पेक्शन ला साहेब यायचे तेंवा गुरुजी किती गरीब असतात याची प्रचीती यायची. २-३ हुशार मुलांनाच सारखे पुढे करून काम निभायचे. सांग बाळ भारताच्या पंतप्रधान कोण ? मुख्यमंत्री कोण, शिवाजी राजांच्या गुरुचे नाव ई. आम्हाला रामकथा होती दुसरीत, आणि ईश्वर माझ्या सोबत बसायचा, मछ्या,भिम्या,धुम्या,लत्या,लाख्या, रम्या,म्ह्वन्या,बल्की,गणपत,साधना,सुषमा हे सगळे बालमित्र. शाळेत इंग्रजी चिंच होती तिचे आकडे आम्ही फक्त दगड मारून अचूक पाडायचो. गणपत यात पटाईत होता, त्याचा नेम खूप अचूक होता. कोणी आवर्जून गलुल आणयचा. 
एकदा लत्या शेंगोळयाच्या जत्रेत तमाशाला जाऊन आला. रम्या, मव्हन्या पण बहुधा जोडीला होते. आल्यावर आम्ही वर्गातच फड लावला. ६ जन कोंडाळे करून बसत असू आणि गुरुजी वर्गाबाहेर किंवा दुसर्या वर्गावर गेले कि आमची लावणी सुरु होत असे आली कुठ गावाला, गेली कुठ गावाला, लुगडी शोधायला डोक खाजवा कि” (नंतर मोठे झाल्यावर कळले कि, गेली कुठ गावना, बोलल्याबिगर राव्हना, बुजली या कानाची भोकं न खाज वाकी ) लत्या एका कानावर हात ठेऊन , पाय दुमडून उभा राहत असे, आम्ही आपापल्या पत्र्याच्या जर्मालच्या (aluminium) पेट्या वाजवण्यात दंग होतो. लावणी रंगात आली होती अन शिट्ट्या, टाळ्या नि उत आला होता आणि अचानक गुरुजी वर्गात आले, सगळ्यांना धु धु धुतला पण मग आम्ही नवीन उपक्रम राबवला. 

सिनेमाची टाकी बांधायचा ...

Comments

Popular posts from this blog

चिलयपाटी

नदी

मसनखडी आणि चुनीलाल गवळी

देवमाणूस

नाना

एसटी

नांगरणी

मनोगत

ओळख