बालपण
ढोरके म्हणजे गुरे चारणारी स्वछंदी मुले – राकट, दणकट अशी की बुककीने नारळ
फोडणारी, नदीतली
धामन ( सापाची एक जात ) रुमाला त गुंडाळून आणायची आणि वर्गात सोडायची. गुरुजी
यांना थर थर घाबरायचे कारण मारायचा परिणाम यांच्यावर शून्य, गुरुजींचे नाजुक हात मारून
मारून थकून जायचे, गुरुजी मग यांच्याच हाताने जहिरी नागीनच्या ओल्ल्या
फोकया मागवायचे आणि फोड फोड फोडायचे. नाना मोची असाच एक आढावू नमूना. एक दिवस धामन
घेऊन घरी आला म्हणला खारीक खोबरं आण नाहीतर सोडतो तुझ्या चड्डीत. माझ्या शाळेतील
सगळ्या खोड्या हा माझ्या आधी घरी येऊन आईला सांगायचा. गरीबाचा पोर म्हणून आई याला
जेवण वाढायची , आंबे
, ताक दयायची आणि हा माझ्यावर
नजरच ठेऊन असायचा. नान्या नेहमी सरकारी विहिरीवर झोपलेला असायचा, त्याची गुरे कोण आणि कसं सांभाळायचा
हे मला आजपण माहीत नाही. दिवाळीत हातात सुतळी बॉम्ब पेटवून हवेत फेकणे हा त्याचा
आवडता खेळ, आणि
त्या काळातील बॉम्ब म्हणजे बिना डेसिबल निर्बंधांचे असायचे, खर्यान अर्थाने बॉम्ब – डायनामाईट चे लहान भाऊ जणू.
हवेत त्याच्या जाळाने आवाजाने एक भीती पसरायची, त्या फोडणार्याथबद्दल एक
आदर पसरायचा. काला फत्तर मधल्या अमिताभची बेदरकार नजर, बिडी वापरुन तो डायमाईट
शिलगावायचा आणि तीच बेफिकिरी ह्या ढोरक्या मुलांमध्ये दिसायची. ते काही दिवस माझे
रोल मोडेल होते पण त्यांच्या इतका मार खायची क्षमता माझ्यात या जन्मात तरी येणार
नाही ही प्रगल्भ जाणीव मला त्या काळात पण होती.
गावात पाऊस पडायचा आणि चिखल व्हायचा.
वादळी पाऊस आणि वावधान आलं कि आम्ही पळत जाऊन साने बंद करीत असू, त्या छोट्याशा धवाऱ्या वर
पत्रा टाकून वर दगड ठेवायचा आणि पावसात भिजन्या आधी खाली उतरायचे. पाऊसाची आणि
पेरणीची चाहूल लागली कि खारी माती गाडाभर आणून गल्लीत पडलेली असे. रात्री शेतावरून
आल्यानंतर सगळे मिळून एकमेकांची खारी माती धाब्यावर टाकत असू. शिडी लाऊन , पाट्या फावडी वापरून ओळीने
एके एक हस्ते परहस्ते मातीची पाटी मिनिटात धाब्यावर पोहोचत असे, कधी कुणाला कुणाच्या कामासाठी
मोबदला घेतांना पहिले नाही फारतर एक कप चहा तो पण प्रेमाचा – कुठलेही गणित नव्हते ! एक
मोठे कुटुंबच होते जणू, अशावेळी आम्ही कंदील वापरायचो, वीज होती पण लोड शेडींग
नव्हते. वीज चोरी नव्हती कारण शेगड्या नव्हत्या, फारतर आकडा टाकून एक ४० वॅट
चा बल्ब वापरायचे. वीज जायची वादळं वाऱ्याने तेंव्हा सूर्यकिरण कंदील असायचे आणि
त्यांची वोगला काच घासून साफ करावी लागे राखेने, दिवेलागणीचा तोच उद्योग !
काही कंदील सालदार शेतात सोबत नेत. घासलेट भरून रेडी राहायचे. खरे म्हणजे
बाहेरच्या कुठल्याच गोष्टीवर कोणीच अवलंबून नव्हते. त्यामुळे गावाबाहेरून
कुणाकडूनही मदतीची अपेक्षा नसायची. पोलिसांना सुद्धा इकडे काही फिरकायचे काम
नव्हते, गावात
पोलीस पाटील होता आणि तो पुरेसा होता कायदा आणि सुव्यवस्थेसाठी. मी असे एकले होते
कि ब्रिटीश काळात, एकदा बीडात वन अधिकार्यांनी गावातील काही लोकांना पकडले, कारण ते जळणासाठी झाडे तोडत
होती. आता हे गावकरी उलट त्यांनाच मारून आले. त्यांनी तक्रार केली पोलीस आले, त्यांनाही मार खावा लागला.
मग मुख्यालयातून मोठी गाडी आली, मग कुणीतरी म्हटलं कि “भारत माता कि जय म्हटले तर
तुम्हाला सोडून देतील” मग काय गाडी गावातील सगळ्या माणसांना धुळ्याला घेऊन
गेली महिनाभर जेल मध्ये होते. तर अशा उपदव्यापी लोकांच्या मार्गात शासन यायचे
नाही. पंचक्रोषीत काही गावे नावाजलेली होती त्यात आमचे गाव होते कारण सगळेच
राजस्थानातून आलेले होते आणि तीच गावाची भाषा आजही आहे. वाऱ्या वावधानाने पत्रे उडायची
आणि आम्हाला मुंडकी उडाल्याच्या कथा सांगून मोठी माणसे घरात बसवून ठेवायची आणि
स्वत मात्र चुलीजवळ बसून चहा ढोसायची, बिड्या ओढायची. बिडीच्या वासात आम्हाला
भुताखेतांच्या गोष्टी ऐकायला मिळायच्या. आमच्या लहानपणी मुलांना फ़क़्त भूत, चुडेल, बिना मुन्डीचा आणि घोडेस्वार
भूत, हडळ, मुंजा हेच कंट्रोल करायचे.
मुलांच्या बालमनावर काय परिणाम वगैरे चा विचार लांबपर्यंत कुणाला शिवायचा नाही.
त्यामुळे असे झाले कि रात्री धाब्यावर झोपायला जायला आम्ही खूप घाबरायचो आणि जो
पहिले जाऊन झोपायचा त्याला म्हणजे खूप डॉन समजायचो. बहुतेक घरातला सगळ्यात छोटा
शेंदाड शिपाई ज्याला फारशा ह्या कथा माहित नसत, हाच आमचा लीडर असायचा. छाती
काढत तो असा चालायचा कि विचारू नका. अशावेळी म्हणजे आम्ही वरती धाब्यावर लोळलेले
असतांना जर लाईट गेली तर सगळे बालगोपाल ३ सेकंदात खाली उतरायचो. १ सेकंद समजायला, १ सेकंद उतरायला (अकरा
पायऱ्या, हुसेन
बोल्ट कुठेच बसत नाही) आणि १ सेकंद एकमेकांच्या अंगावर उड्या मारल्यामुळे सावरायला
लागायचा. एकदा रात्री ११ वाजता सगळे tv वर अनहोनी (भुताची सिरीयल)
बघत होतो. एपिसोड संपल्यावर tv बंद करायची कुणाची हिम्मत होत नव्हती. सगळे tv आणि ट्यूबलाईट चालू सोडून
पळून गेलो. रात्री शेजारच्या शेतात मुंजा चा दिवा चालतांना दिसायचा, छाती ठोकून सगळे साक्ष
द्यायचे कि प्रत्येकाने त्याला पाहिलेला असायचा. पूर्वी जेंव्हा मुली आखाजीला झोके
बांधायच्या तेंवा रात्री चुडेल त्यांच्या सोबत झोके खेळायला यायच्या आणि गर्दीत
त्यांचा चेहरा कुणाला दिसू द्यायच्या नाही. कुणीतरी त्यांना पायावरून ओळखल्याचे
छाती ठोकून सांगायचा, त्यांचे पाय म्हणे उलटे असतात. आता दोन मुली
झोक्याच्या एकेका पन्ध्यावर बसतील तर पायाने एकमेकांचे पंधे त्यांना पकडावे लागतात
आणि उलट्या पायाची मुलगी समोर बसली तर ! बापरे ! रामसे बंधूच्या खापर पंजोबाने
सुद्धा इतकी डेंजर स्टोरी लिहिली नसेल. माझा मामा शेजारच्या गावावरून मटन आणायचा
तेव्हा त्याला एक बिना मुन्डीचा घोडेस्वार रस्त्याच्या दुसर्या बाजूने साथ
द्यायचा. स्लीपि हालो चे कथानक बहुतेक आमच्या गावावरूनच उचलले असावे. भुते बिड्या
मागतात हा तर प्रत्येकाचा क्लेम होता, मटणाचा डब्बा शेतात कोणी नेत नसत. भुताने
घोमसाळने हा कॉमन प्रोब्लेम होता. लग्नामध्ये बायकांच्या पंगतीत उशिरा चुडेल
जेवायला यायच्या. अंधाराची भीती मुलांना यामुळे खूप होती. आम्ही जेंव्हा १०-१२ वी
ला गेलो तेव्हा मसनातून बिडी पेटवून आणायच्या पैजा लागायच्या पण कुणाला भूत दिसला
नाही कि हडळ. आम्ही काय भूतांपेक्षा कमी नव्हतो.
उन्हाळ्यात
सगळे गल्लीत खाटा टाकून झोपायचे. नाल्या उघड्या असल्या तरी स्वच्छं असायच्या. जागो
जागी शोष खड्डे होते आणि पाणी जपून वापरल्यामुळे तुंबत नसे. त्या तुंबलेल्या
पाण्याला गल्लीत शिंपडण्यासाठी काशी मामी वापरायची. माणिकचंद/विमल नसल्यामुळे
प्लास्टिकचा कचरा नव्हताच. चारी काढण्यावरून हमखास भांडणे व्हायची. एक पत्र्याचा
टोकदार भाग चारी खरडण्यासाठी वापरला जायचा, त्याच्या सोबत लहान
मुलांचा “गू” भरण्यासाठी वेगळा ढीब्रा असायचा, सगळे उकिरड्यावर फेकले
जायचे. खराटा,
फडया,
केरसुणी,
संडासचे डब्बे,
ढीब्रे,
चारी कोरायचे पत्रे आणि कोंबड्या झाकायचे खुराडे – डाले यांनी अंगण भरलेले असायचे.
रात्री इलेक्ट्रिक च्या पोलवरचा लाइट इतका मंद असे की तो बहुतेक किड्यांच्या
घिरट्या च्या कामाचा होता असे वाटते. बरेचशे तर आमच्या निशाने बाजीला कामी आलेले
असत. खाटेवरून नक्षत्र अगदी स्पष्ट दिसत.आकाश दर्शनासाठी आम्हाला बायनॅक्युलर ची
गरज पडली नाही. रात्रीचे नक्षत्र Orion आमच्या भाषेत “व्याधाचा बाण” आणि Great Bear ल
आम्ही “चोर खटले” म्हणत असू. आमच्या यादीत
भूगोलातील ध्रुव तारा असे आणि म्हातारे आम्हाला “पहिला शुक , दूसरा शुक “ दाखवत. धुमाचे
आजोबा दिवसाच्या कुठल्याही प्रहराला डोळे मिटून घड्याळा इतकी अचूक वेळ सांगत असत.
आज हे सगळे कोडे वाटते पण तेंव्हा ते सत्य होते. ज्यांना उशिरा उठायला आवडे ते
धाब्यावर झोपत कारण सकाळी उठल्या बरोबर शिवलाल भाऊ खराटा हातात घेत असे. झाडलोट, शेणपाणी या शब्दांना खरा
अर्थ होता त्या जगात. सूर्याचे कोवळे ऊन घरात शिरे पर्यन्त सगळ्या मोठ्या माणसांची
आंघोळ झालेली असे.अंगणात शेण सडे, रांगोळ्या पडत. सगळे खरे होते सेल्फी साठी नाही.
सुट्टी बघून देवचंद मामा न्हावी यायचा आणि सगळ्यांची बारीक हजामत करायचा. आमच्या
सगळ्या राजेश खन्ना, अमिताभ इस्टाईल त्याच्या गुडघ्यात डोके फसले की मिलिटरी
इस्टाईल होवून जायच्या. आम्हाला हवा असे बिटल कट आणि तो करायचा घमेली कट. (उलटी
टोपली किंवा आजच्या भाषेत मशरूम कट) तासाभरात सगळ्यांच्या हजामती आणि एकासोयणे
आंघोळी झाल्या की आम्ही खेळायला मोकळे आणि आया बाया रांधायला. तो देवचंद मामा आला
की मोठे बंडखोर बंधु पळून जात त्यांना बाहेर गावी सलून मध्ये मिथुन कट करायची असे.
आम्ही त्याला शिव्या देत तो मोठ्या प्रेमाने स्थितप्रज्ञ राहून एकेकाची भादरत
असे.
Comments
Post a Comment