पिक्चरची टाकीज
आमच्या गावात आणि शेतात सगळीकडे काळी माती आहे. तिचा सुवास
Eternity / clevin clein पेक्षा १० पट छान आहे फ़क़्त तो बाटलीत भारता येत नाही.
त्यासाठी मातीत खेळावे लागते. एकदा आम्ही ब्यांड पार्टी काढायची ठरवली. सगळे खेळ
असेच कुणाच्या डोक्यातून निघत आणि त्यांची एकदम अंमल बजावणी होत असे. ब्यांड साठी
आम्हाला छोट्या मोठ्या पीठ गाळायच्या तुटलेल्या गाळण्या लागत. तेंव्हा पत्र्याच्या
मजबूत आणि मोठ्या गाळण्या येत. तिची जाळी तुटली म्हणजे घरात हट्ट करून किंवा
जुन्या अडगळीच्या कपाटातून त्या आम्हाला मिळत. ते अडगळीच भुयारी कपाट इतके मोठे
होते कि त्यात घुसतांना राकेलची चिमणी घेवूनच घुसावे लागे. त्यात वेगवेगळ्या
टाकावू वस्तू , आया बायांनी आमच्या डोके दुखीला कंटाळून लपविलेल्या वस्तू सापडत.
तो आनंद वेगळा असे. गाळण्याची रिम आमच्या ढोलाची रिम बने. सुरवातीला आम्ही नेहमी
छोटे मॉडेल बनवत असू. छोट्या गाळणी च्या रिम ला काळ्या चिकन मातीचा गारा लावायचा.
त्यावर न्यूज पेपरचा कागद चिटकवायचा. दोन्ही हाताच्या तळव्याने त्या कागदाला ताणून
बसविले कि तिला उन्हात वाळवत ठेवत असू. हिला आम्ही डफडी असे नाव दिलेले होते.
डफडीला फार जपून वाजवावे लागे त्यासाठी झाडूच्या काडीचा वापर होत असे. पण हि नाजूक
असे लहान भावंड किंवा कुत्सित मित्र हिला वाजवून वाजवून फोडून टाकत.
नंतर आम्ही शोध लावला प्लास्टिक च्या
कागदाचा. युरिया च्या थैल्या किंवा थायमेट चे प्याकिंग साठी आलेल्या प्लास्टिकचा
कागद या कामासाठी वापरला जाई. त्यासाठी चालनी मोठी लागे तिच्या रीम्ला भोकं पाडून
त्यात धामण (मोठी जाड पोते शिवायची सुई) ने सुतळी वापरून एका छोट्या रिंग भोवती
गुंफण करावी लागत असे. नंतर तुरखातीच्या काड्या वापरून ती सुतळी आवळली कि
प्लास्टिकचा कागदही आवळला जाई, सगळ्या बाजूने असे केले कि तो कागद ताणला जाई. ढम
ढम चा खरा आवाज येई, त्यासाठी वाजवायला लागणारा टोल चामडे वापरून बनविन्या पर्यंत
आमची मजल गेली. कुठल्याही गोष्टीला तिच्या पूर्णत्वाकडे नेल्याशिवाय आमचे समाधान
होत नसे. अशा छोट्या मोठ्या चाळन्या वापरून छोटे डफ ते मोठे ढोल बनविल्या गेले.
घरात आणि गल्लीत त्यांचे आवाज घुमू लागले. त्यावर मग लाल रंगात “मर्मट ब्रास
ब्यांड,कासमपुरा” हे टायटल पडले. एका प्रोफेशनल ब्यांड मध्ये असलेल्या सगळ्या
प्रकारच्या डफ,ढोल,टिमकी ची नक्कल करण्यात आली. त्रिकोणी बनविली आसारी वापरून,
खुळखुळे बनविले बेलाच्या पोकळ फळांपासून आणि जत्रेतील जाड फुग्यान मध्ये बारीक
रेती टाकून, कुठून कुठून डोके चालत असे कुणास ठावूक. सगळे सुपीक होते. मग अडचण आली पिपाण्या आणि
ड्रेस बनवायची. वडाची गाडी भरून पाने तोडली त्याना पत्रावळी सारखे टोचून त्यांचे
टोप, अंग खांद्याचे पट्टे बनविले गेले. लिंबाच्या पानांचे आणि लिमबोल्याचे साज
चढविले गेले. ज्वारीच्या धांडयाचे टेरपून पिपाण्या बनवायला कामात येत असे. त्यांचे
माईक, तारच्या गाडीला पृष्ठाचे भोंगे बनवून स्पीकर बनत. मास्टर च्या गाण्याची
announcement फारच नाटकी ढंगाने होई. सगळे प्रोटोकाल पाळले जात. तोंडाने पी पी चा
आवाज करून सुरु होत एक से एक बढकर फर्माईश. “सोड माझा हात मला पिणे दे, पाटलाची
पोर जरा इकडे ये” यात नुसता ब्यांडच नाही तर नाच्या सुद्धा असे. साडी घालून
नाचणाऱ्या राजूची धमाल, बहिणीच्या चोरलेल्या बांगड्या आणि कर्णफुल घातलेल्या,
घुंगट मधल्या राजू वर सगळे चान्स मारत. गल्लीतले शेजारी कुतूहल मिश्रित आश्चर्य ने
पहात. गोंधळ इतका वाढे कि त्याला एका छोट्या उत्सवाचे स्वरूप येई. साजो सामान,
गाना बजाना तल्लीन होवून होई. सुरवातीला सूर चुकत मग नंतर सगळे सुरात होई. गुलाबाई
च्या टिपर्यांचा वापर होई. हीच ब्यांड पार्टी कधी टाळ मृदुंग वापरून भजनी मंडळ
होई. एकनाथाचे भारुड, गवळणी आणि भोवतालच्या बाबा लोकांच्या कीर्तनाचा फार प्रभाव
होता आमच्या शैलीवर. भजनी मंडळाचे कधी तमाशात रुपांतर होई ते आम्हालाही कळत नसे.
“आला थंडीचा महिना, झटपट शेकोटी पेटवा ...” ढोलकी घुमविणे म्हणजे कसब होते. तर हे
असे सगळे चालू असताना आमचे विज्ञान प्रयोग पण चालू असत.
आमच्या मामाच्या माजघराला एक दार होते,
त्याला छोटे भोकं होते. कुणीतरी हे शोधून काढले आणि पिक्चर ची टाकी कुणातरी सुपीक
डोक्यात जन्मली. या माजघराला उजेड येण्यासाठी एक साने होते. ते झाकले कि काळा
कुट्ट अंधार सहज होत असे. इतका दाट अंधार
कि भर दुपारी सुद्धा बाजूचा चेहरा दिसत नसे. या खोलीत आम्ही सहसा लपालपी खेळताना
जात असू. ती बहुतेक कपडे बदलविण्यासाठी जुन्या म्हतार्यानी बनविली होती. एक
बांबूचा कपडे ठेवायचा मोठा आडवा पोल होता. त्याला लटकून आम्ही खालून ते साण्याचे
गज पकडत असू. थोडक्यात ती खोली खरच अभूतपूर्व होती. सिनेमा साठी लागणारा बहिर्वक्र
भिंग आमच्याकडे कुठून असणार आम्ही एक ४० वाटचा बल्ब घेतला त्याच्या मागील भागाला
जिथे होल्डर मध्ये बसते तो, सरोटा चे खालचे टोक मारून हळूहळू कलेकलेने फोडायचे, इतकी
काळजी घ्यायची कि काचेचा बल्ब आणि तो अलुमिनिउम चा होल्डर वेगळे होता कामा नये.
बर्याच वेळेला तो अरगोन कि नेओन ग्यास त्या फिलामेंत सहित मोकळा होई आणि फट असा
आवाज होवून ग्लास हातात फुटत असे. तिथे घाई कामाची नाही अगदी निष्णातपणे आम्ही
त्या बल्ब चा आतला भाग पूर्ण पोकळ करीत असू. त्यात पाणी भरले कि झाला भिंग काच.
एकाला बाहेर उन्हात पिटाळले कि तो आरसा घेवून बसायचा आणि आरशाचा फोकस घरात त्या
दाराच्या छिद्रावर मारायचा. काही काही इमानदारीत फोकस मारायचे आणि तिथूनच “दिखरे
है कि ? दिखरे है कि करायचे (दिसतंय का
दिसतंय का), नीट फोकस मारण भंगीका ! बाहेर आयो त थारी नारफाती फोड दालन्गो ( नीट
फोकस मार नाहीतर बाहेर आलो तर तुझी हनुवटी फोडून टाकीन) काही अति हुशार त्या आरशाला मागून दगडाचा टेकू
लावून फोकस adjust करून आत यायचे. म्हकू भी देखब देव, म्हकू भी देखब देव (मला पण
पाहू दया, मला पण पाहू दया) छिद्राच्या इकडच्या भागात पाणी भरलेला आणि पोकळ केलेला
काचेचा बल्ब असायचा, त्याच्या फोकस कडील भागात फिल्म उलटी पकडून लावली कि सुलटे
चित्र पडद्यावर परावर्तित व्हायचे. दिख्यो दिख्यो म्हकू मोटो बो आन बाई भी दिखी
(दिसले दिसले मला , जाडा माणूस आणि बाई पण दिसली), यासाठी पडदा म्हणजे नानाचे धोतर
असे आणि त्याची आंघोळ झाली कि तो त्या खोलीत कपडे बदलवायला आणि धोतर घ्यायला येत
असे. बाहेरून दार वाजवणारा नानाला कल्पना नसे पोरांनी त्याच्या धोतरचा खेळ मांडलाय
म्हणून. अशावेळी फटके हमखास बसत. दर
उघडल्यावर १८-२० चिमणी पाखरे उडताना बघून त्याला त्याच्या वडिलांची आठवण येत असे
कि इतक्या लहान खोलीतून इतके कसे बाहेर येवू शकतात. त्या गोंधळात जो त्याच्या
हातात सापडला त्याला त्याचे कसब वापरून म्हातार्याला हुलकावणी द्यावी लागे मग
आर्धा तास त्याचा पराक्रम आमची करमणूक करीत असे. आम्ही सतत अशा पिक्चर च्या साईट
च्या शोधात असू, कधी वरच्या माळ्यावर कधी दुसर्यांच्या घरी. आमचा निकष म्हणजे उजेड
परावर्तित करता येणे, अंधारी खोली आणि दाराला भोकं. चांगल्या दाराला भोकं
पाडण्याचा पराक्रम हि करून झाला, त्याचे
फटके वेगळे. इतक्या अफलातून आणि आजकालच्या भाषेत संशोधक बुद्धिवान मुलांच्या
वाटेला फटके हे अज्ञानी पालकांमुळे येत असत. पण ती काळाची गरज होती नाहीतर
चंद्रावर पहिले माकड (माणूस नाही) आम्हीच उतरविला असता. सतत काहीतरी शोधून काढणे
नवनवीन खेळ करणे यामुळे आमच्या पालकांचे आम्ही खूप नुकसान केले. आईचा नेहमीच एक
डोळा आमच्यावर असे त्यामुळे तो तिचा स्वभाव बनून गेला. आजही ती ते टाळू शकत नाही.
माझ्या मुलांना तिची ती लुडबुड आवडत नाही पण कुणास सांगतील बिचारे?
ह्या सगळ्या साईट शोधण्याला आम्ही एक दिवस कंटाळलो आणि
महाराजांसारखे स्व:टाकीज चे स्वप्न पाहिले. सुरवातीला prototype म्हणून आम्ही
वर्गमित्र बामणाच्या रतिलाल चे घर निवडले, लत्याचे आईवडील त्याच्या बहिणीच्या
गावाला गेलेले होते आणि त्याच्या घरासमोरच एक ओट्यावर अपूर्ण घराचे बांधकाम होते,
लागणारा कच्चा माल तिथेच होता आणि नदी १०० मीटरवर होती. आंधळा मागतो एक आणि देव
देतो दोन !
३-४ मित्र मिळून टाकीज बांधायला सुरवात झाली, ४X५ फुट साईझ
ची खोली बांधकामासाठी सुरवात झाली. विटा तिथेच होत्या, चिखल तयार करण्यासाटी
लागणारे पाणी आम्ही नदीवरून आणायला सुरवात केली. शाळा सारवताना हे असे पाणी आम्ही
नेहमीच आणायचो त्यामुळे लागणारा दांडा आणि बादली लात्याच्या घरातूनच घेतली (बादली
नदीत भिरकावयाची नाही ह्या बोलीवर) २ दिवसात टाकीज उभी राहिली. लत्याच्याच
पडलेल्या भिंतीची माती वापरली. एक वीट सोडून दिली तर मोठे भोकं होते हे शिकलो मग
त्याचा आकार छोटा केला. बांधकाम वाळायला २ दिवस द्यावे लागले आता प्रश्न आच्छादनाचा,
त्यासाठी गावातील घरांप्रमाणे धाबे तयार केले. काड्या कडबा, प्लास्टिक चा कागद,
माती, लिंबाची पाने परत माती, पाणी जाण्यासाठी लागणारी पन्हाळ. सगळे कसे फक्कड
जमले बघा. हा हा म्हणता दिवस उजाडला उद्घाटनाचा. लत्याच्या घरात भज्यांचा बेत
ठेवला. लागणारे सामान दुकानावरून/घरून आणले. चूल पेटविली आणि तेलाची कढई ठेवली,
उभे राहिले कि तेल जास्त आटते हा समज कुणीतरी आमच्या डोक्यात टाकला होता. उभे
राहायला सक्त मनाई होती. तळतांना उभे राहणार्याला “उभी नको रहू न छीनाल्का, ऐकावे
लागे. एकेक करून कांदा भाजी, मिरची भाजी चे घाणे निघू लागले, मीठ कमी है कि र ?
थोड्सोक दाल. मस्त बन्या है र ! लत्याचे बेसन पीठ संपले. आता टाकीज कडे वळलो.
तुफान हाणामारीने भरलेला, शत्रुघन सिन्हा आणि धर्मेंद्र यांचा, सोबतीला हेमा, रेखा
असतील नसतील त्या सगळ्या असा जत्रेतील थाटात,
“घाई करा, गर्दी करा, आज दुपारी २ वाजता. अलाउन्स केले गेले. गावात पाटी
फिरली, सुरजमल पांडेजी यांच्या घरासमोर मुलांची गर्दी जमविली. २ लिखण (फोशी ) १
लिखण (कडक) असे एन्ट्री तिकीट. ४-५ जणांना बसता येई एकावेळी मांडीला मांडी लावून,
घाम इतका निघे कि (हॉट स्टीम बाथ) होई, मुंडी बाजुकू कर नही त भाग ह्यांस (कुणाची
तरी मान किंवा डोके फोकस च्या मध्ये आले तर त्याला धमकी मिळायची) ५-५ मिनिटाचे
८-१० शो व्हायचे. लिखणानी डब्बा भरून जायचा. तो गल्ला मी माझ्याजवळ जपून ठेवायचो.
रोज शाळा सुटल्यावर दुपारचे शो व्हायचे, ३ वाजता परत शाळेत जावे लागे. गावावरून मग
लत्याचे आई वडील परत आले आणि त्याला मार बसला, समोरचे घरवाले भांडायला आले तो भाग
वेगळा (त्यांच्या चालू घरात आम्ही टाकीज उभी केल्यामुळे) मग त्या दिवसापासून
लत्याकडे जाणे बंद. पण टाकीज चा किडा वळवळ करायचा. एक बांधकामाचा अनुभव गाठीशी
होताच, मग आम्ही बालीच्या वाड्यातच (खळा) नवीन टाकीज बांधायचे ठरविले. यावेळी मजूर
सगळे गल्लीतील होते. विशेष म्हणजे हा बाडा गावात असून गावाच्या बाहेर होता.
त्याच्या बाजूला शेत असल्यामुळे तिथल्या विहिरीवरून पाणी आणणे सोपे जायचे. लागणार्या
विटा पाहुण्याच्या शेतातून आणल्या जायच्या त्यासाठी ताराची गाडी वापरायची,
काम हे काम नव्हतेच आमच्यासाठी तो एक खेळ होता. २ दिवसात
चोरलेल्या विटांचा ढिगारा उभा केला आम्ही. लपत छपत, लहान मोठे सगळेच त्या भट्टीवर
जावून विटा आणायचो. राखोलीला कसे गुंग्वायचे हे आम्हाला माहित होते. बाडा आणि शेत
मध्ये एक काटेरी कुंपण होते, त्याने कितीही काटेरी झुडपे आणून लावली तरी आम्ही
त्याला उरून पुरायचो. काट्याच्या फान्गेवर bat टाकून तिला ओलांडायचे मग एका हाताने
तिला ओढून लहान मंडळीला पार करायचे नंतर तेच मॉडेल वापरून परत बंद करायला विसरायचे
नाही. थ्रील होते, टीम वर्क होते, कल्पकता होती आणि मार खावून कोडगे झालेली पाठ
होती. आमचे आपापसात भांडण होई मग गलका वाढे, काही वेळा रडत रडत तक्रार करण्यासाठी
घरी येत असू. अशावेळी मोठे भाऊ नमते घेत कारण घरून आई किंवा मामा फटके देण्यासाठी
साईट वर यायची शक्यता असे. इथेहि ४ दिवसात टाकीज उभी केली. काम संपवून घरी आलो कि
चिखलाचे हात पाय धुण्यासाठी घरातील पाण्याचा वापर होई त्यामुळे दिवसा घरातील
बाथरूम ला कुलूप लावले जाई. पाण्याचा वापर हा जपून असे. पिक्चर च्या टाकीज चे हे
मॉडेल भक्कम होते. हि खोली उंच होती आणि तिच्यात आम्ही हवा खेळती राहील याची काळजी
घेतली होती. आता नानाची धोतरचा तुकडाच आम्ही लांबविला होता, त्याला बरेच दिवस
कळलेले नव्हते कि अचानक त्याची धोतर लहान कशी झाली म्हणून ! ज्या नानाला आखा तालुका आदराने सन्मानाने दचके
तो आम्हाला दचकत असे. आमच्या खेळाचे काही टाईम टेबल नव्हते, कुणाच्या सुपीक डोक्यातून
काहीहि निघाले तरी ते अमलात आणले जाई.
Comments
Post a Comment