नदी
“नदी सागरा मिळता , बाहेर येईना पुन्हा ! अशी शहाण्यांची म्हण – नाही नदीला माहेर“ पण आमचा पत्ता मात्र आमच्या नदीचाच. तसा आमचा गाव हा सोन नदीच्या काठावरचा , हि वाघुर नदीची उपनदी आहे , अजिंठा लेणीत उगम पावणारी नदी ती हिच. नदी गावाला चंद्रभागेसारखाच वळसा घालते (चंद्रकोरी प्रमाणे) आणि पुराचे पाणी वाढले कि त्या चंद्राचा पूर्ण सूर्य होतो. गाव बनते मग एक बेट. लोकांना मग रात्रभर जागवेल अशी हि नदी आहे. आता तिच्यावर वरती २ धरणे झाल्यापासून तिचे इतके रौद्र रूप नव्या पिढीने कदाचित पाहिले नसेल पण सगळ्यांना घरादारा सहित वाहून न्यायची ताकद ठेवते ती. हल्ली तशी संथ वाहते पण खूप जास्त पाऊस झाला कि थोडासा पूर येतो. नोव्हेंबर पर्यंत धार वाळायला सुरु होते. तिच्यावर २-३ कोल्हापुरी टाईप बंधारे आहेत त्यांच्यात पाट्या टाकून पाणी अडवले जाते. त्यात मासेमार छोट्या मासोळ्या पकडतात. फेब्रुवारी मध्य पर्यंत अगदी कोरडी ठाक. कितीही चांगला पाऊस झाला तरी मार्च ते मे महिन्यात नदीत ढुंगण धुवायला सुद्धा पाणी नसते. तर आमची नदी पावसाळ्यातच खळखळ वाहते , तिच्या धारेत झेपायची (पोहायची) मजाच काही और आहे. कडकडीत श्राव...