नदी


“नदी सागरा मिळता, बाहेर येईना पुन्हा ! अशी शहाण्यांची म्हण – नाही नदीला माहेर“


पण आमचा पत्ता मात्र आमच्या नदीचाच. तसा आमचा गाव हा सोन नदीच्या काठावरचा, हि वाघुर नदीची उपनदी आहे, अजिंठा लेणीत उगम पावणारी नदी ती हिच. नदी गावाला चंद्रभागेसारखाच वळसा घालते (चंद्रकोरी प्रमाणे) आणि पुराचे पाणी वाढले कि त्या चंद्राचा पूर्ण सूर्य होतो. गाव बनते मग एक बेट. लोकांना मग रात्रभर जागवेल अशी हि नदी आहे. आता तिच्यावर वरती २ धरणे झाल्यापासून तिचे इतके रौद्र रूप नव्या पिढीने कदाचित पाहिले नसेल पण सगळ्यांना घरादारा सहित वाहून न्यायची ताकद ठेवते ती. हल्ली तशी संथ वाहते पण खूप जास्त पाऊस झाला कि थोडासा पूर येतो. नोव्हेंबर पर्यंत धार वाळायला सुरु होते. तिच्यावर २-३ कोल्हापुरी टाईप बंधारे आहेत त्यांच्यात पाट्या टाकून पाणी अडवले जाते. त्यात मासेमार छोट्या मासोळ्या पकडतात. फेब्रुवारी मध्य पर्यंत अगदी कोरडी ठाक. कितीही चांगला पाऊस झाला तरी मार्च ते मे महिन्यात नदीत ढुंगण धुवायला सुद्धा पाणी नसते.

तर आमची नदी पावसाळ्यातच खळखळ वाहते, तिच्या धारेत झेपायची (पोहायची) मजाच काही और आहे. कडकडीत श्रावणातले उन, पायाखालची मऊ रेती, हवेत गवत कापल्याचा वास (नदी थडीच्या शेतात निंदनी चालते मग ते कापलेल्या गवताचे भूगले नदीकिनारी फेकतात) गार गार वारा आणि स्वताला धारेत झोकून डोहां पर्यंत तरंगत जाणे हा आमचा आवडता उद्योग. लहानपणी पोहायला या नदीनेच शिकवले. सुरवातीचे दिवस, पोहायला येत नव्हते आणि पाण्यात डुंबायची खूप हौस. सगळे उलट्या सुलट्या उड्या मारत होते. मी पण आपला सामील झालो. कपडे काढले काठावर आणि निघालो गुडघा भर पाण्याकडे. रेती पाया खाली चुरचुरत होती. बारीक रेती आणि माती पायाखालून निसटत होती. एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत, गाणे म्हणत एकच कल्ला सुरु होता.  “सोड माझा हात मला पिणे दे, पाटलाच्या पोरी जरा इकडे ये”. सगळेच तर होते त्या क्षणात. मुलांचे टीपा टीपी चे खेळ सुरु झाले. नदीच्या डोह शेजारी एक उंच टेकाड होते त्यावरून सगळी चिल्ली पिल्ली उलट्या सुलट्या उड्या मारीत होती. छोट्या मंडळीच्या अंगात कपडे नसतच, काळे, लाल करधोडे आणि त्यात काहीवेळा अडकविलेले १० पैसे चमकत, नदीतून टेकडावर चढायला कुदळीने केलेल्या पायऱ्या पाणी पडून निसरड्या होत, मग तोल जाई – आपटत आणि सगळे फिदीफिदी हसत. धावत यायचे आणि बजरंगाला साद घालायची, “जय बजरंग बली, फोड दुष्मनकी नली, जय काली जय काली, कल्कत्तेवाली तेरा वार न जाये खाली ! असे काहीबाही आणि “तुले गंडरवून टाकीन छीनालच्या” पर्यंत दम छाक करीत एकमेकांमागे धावणारी मुले.

नदीच्या पसरट भागात मी होतो आणि मित्र मस्त डोहात उड्या मारत होते, सूर पारंब्या सारखा खेळ नदीत रंगला होता. चढणी वरून वरती जायचे आणि डोहात उडी टाकायची, सरसपाट! खाली डोके वरती पाय, कोलांटी मारायची हवेतल्या हवेत, एक दुसऱ्याला आव्हान द्यायचे, हे करून दाखव ते करून दाखव ! आव्हान प्रती आव्हान. पकडा पकडी एकच गलका. कुणीतरी मला डिवचले काय घाबरतो ये इकडे, मी आहे घाबरू नको. नकळत माझे पाय तिकडे ओढू लागले. कमरेपर्यंत पाण्यापलीकडे / पुढे जायचे नाही हे ठरवले होते पण मनच ते ऐकते थोडेच, हळू हळू मी नकळत कमरे पर्यंत पाण्यात पोहोचलो.

“येरय थोडा पुढी ! आम्हू हाय ना, काय घाबरतो पोरी सारखा”. छाती पर्यंत पाण्यात चालायला जोर लागत होता. आता नदीची धार ढकलत होती. चालता चालता अचानक पाय खड्ड्यात गेला. नाकातोंडात पाणी गेले, जीव घाबरला आणि धार ओढायला लागली आत डोहात. गोल गोल भवरा आणि गटांगळ्या. आईग - आईग, बाजूलाच रवी पोहत होता, रवीने हाक एकली आणि बाहेर ओढला पाण्याच्या. त्याला गळ्याशी घट्ट मिठी मारली तो गुदमरायला लागला, अरे सोड सोड ..ढकलत ढकलत किनार्यावर घेऊन आला. माझ्या मित्राने माझा जीव वाचवला. कोणाला कधी सांगितले नाही, आईलाही नाही. कारण नंतर पोहायला सोडले नसते, स्वताचा अंदाज आला. त्यानंतर मित्रांनीच पोहायला शिकवले, अगदी स्वताला टेस्ट करण्यासाठी एकटा विहिरीत पोहलो. गावात पोहण्यासाठी काहीच लागत नाही. आली लहर - चला नदीवर. !

बहुतेक दुपारची वेळ निवडायची तेंव्हा सगळे मोठे झोपलेले असतात,लक्ष ठेवणारे म्हातारे आणि म्हातार्या सुद्धा वामकुशी घेत असतात. घरी चुगल्या करणारे सुद्धा नसतात, हळूच नदी कडे सरकायचे, कपडे रेतीवर काढायचे, आणि द्यायचे झोकून पाण्यात. वाहते पाणी, टीपा टीपी चा रंगलेला डाव. आताशा मला चांगले हात मारता येत असत, डोहात उड्या टाके पर्यंत प्रगती झालेली होती. दगडू खूपच पट्टीचा पोहणारा होता. पूर्वी ज्या आईबापाची मुले लहान वयातच दगावयाची ते मारुतीला नवस बोलायचे. देवा माझा मुलगा वाचू दे, त्याचा नवस फेडीन ! त्याचा नवस उतरेपर्यंत मग ह्या मुलाला शेंडी असे, पायात एक बहुधा चांदीचे कडे असे आणि त्याचे नाव दगडू ठेवीत असत. गावात अशे ३-४ दगडू होते. नवसाने झाल्यामुळे ते जन्माचेच लाडके असत त्यामुळे सगळे आगाऊच असत. तर हा दगडू  माझ्या एक वर्ष मागे होता. “जय बजरंग” म्हणून तो कितीही उंचावरून पाण्यात उडी टाकायचा. तळाशी जावून ठाक आणणे (तळा खालची रेती, दगड हातात धरून आणणे – पुराव्या साठी कि मी खाल पर्यंत जावून आलो). अथांग डोहात हे काम फारच धाडसाचे असे कारण तिकडे गाळात फसण्याची भीती असे. विहिरीत ३०-४० फुटावरून नाही तर विहिरीच्या शेजारी बांधलेल्या इंजिन घरावरून ते उडी मारत). ते पाण्या खाली गेले कि आम्ही सेकंद मोजत असू. पाण्याचे बुडबुडे त्यांच्या आगमनाची चाहूल देत असत. रवीचा लहान भाऊ राजू त्याचा प्रती स्पर्धी. पाण्यात डोळे लाल होईपर्यंत डुंबणे मग किनार्यावर रेतीत जावून पडणे. एक पंचा पुरेसा व्हायचा सगळ्यांना (१०-१२ जणांना) अंग पुसायला आणि कपडे बदलवायला. अंडरप्यांट पिळून डोक्यात घातली कि घरी येई पर्यंत वळून जायची.

मग कुणीतरी शेंदाड शिपाई निरोप घेऊन यायचा, तुला अर्जंट घरी बोलाविले आहे, म्हटले आहे कि पुढे करून आन नाहीतर तुझी आई ज्वारीचा धांडा घेऊन येत आहे (बडवायला). उगी तमाशा नको म्हणून कपडे घालायचे आणि धूम सुटायचे. नान्याने घरापर्यंत बातमी पुरवलेली असायची. 

आई : का रे कुठे गेला होता ?
मी: कुठे नाही , पांढरीत खेळत होतो मित्रां सोबत !
आई : मी तर एकले कि तुम्ही नदीवर होते म्हणे ?
मी: नाही, तर !
आई : दाखव करगोटा ?
मी : ते होय, हात पाय धुवायला गेलो होतो आपला ...करगोटा वाळवून घरी येण्या इतके हुशार तर
आम्ही नक्कीच होतो.

पुरात पोहायची डेरिंग नाय झाली कधी, तरंगू शकतो पाण्यावर आणि स्वताला वाचू शकतो. पण पाण्याचा नांद नाही करायचा एवढे शिकलो. पुरात ओंडकी, सामान, बकर्या वाहून याच्या पूर्वी, नदी रौद्र रूप धारण करायची तेंवा सगळा गाव रात्री जागा राहायचा. 
“कर कान्ह्तोडी आयो पाणी ? फरशी तोडी आयो कि?”(कायरे पूर कुठपर्यंत आला? फरशीपर्यंत आला का?)
फरशी म्हणजे गावाची पहिली पायरी. १-२ दिवस पूर ओसरत नसे आणि पूर्ण वेढा पडल्यामुळे गावाचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटायचा, तेंवा लोक जुन्या गोष्टी सांगायचे कि मामा मामीने नदीची खणा -नारळाने ओटी भरली तेंवा कुठे ती शांत झाली. धाब्यावर जाऊन पुराची गंमत पाहणे हाच पर्याय असे कारण मोठी माणसे अशावेळी आमच्यावर कडक लक्ष्य ठेऊन असायचे. कोळीची मुले म्हणजे एकनाथ, बाबू हे बिनधास्त त्या पुराच्या पाण्याशी खेळायचे. कोणी वेड्याने डेरिंग करून उडी टाकलीच तर त्याला वाचवणे हेच त्यांचे काम. नदी अशावेळी तिरपी ओलांडायची असते त्याला धार कापणे म्हणतात. समजा जमले नाही धार कापायला तर नदी ओढत पुढे मग सात- बाण्यावर न्यायची तिथे मृत्यू अटळच कारण तो सगळा खडकाळ भाग. एकदा असाच एक दुर्दैवी जीव वाहून गेला तो मात्र हाती लागला नाही. पोळ्याचे बैल धुणे, बैलाची शेपूट धरून नदी ओलांडणे हे ओघा ओघाने आलेच. गोठान वर जायचे म्हणजे प्यांट, चप्पल डोक्यावर ठेऊन जावे लागायचे.

अशी हि रौद्र नदी हळू हळू शांत व्हायची, पाण्यातले गढूळ पण जाऊन निर्मलता यायची. तिच्या पात्रात खेळण्यासारखे सुख नाही - मित्रानो वरच्या धरणांनी हा आनंद आपला हिरावून घेतला. जगातला कुठलाचा ५ स्टार स्विमिंग पूल तिची नखाची पण बरोबरी करू शकत नाही. मग यायचे गणपती विसर्जन, गावात तेंवा रस्ते नव्हते. अमेरिकन cowboy movies मध्ये जो चिखल गावात दिसतो अगदी तसाच निर्मल चिखलाचा आपला गाव होता. बाहेरून आले कि पहिले पाय धुवायचे पन्हाळच्या पाण्यात ठेवलेल्या ड्रम च्या पाण्याने. बहुतेक आम्ही तेंवा पायात काहीच घालायचो नाही कारण परागोन स्लीपर तोपर्यंत आलेल्या नव्हत्या आणि चामड्याच्या वस्तू चिखलात खराब व्हायच्या. नेचर थेरपी आमचे रोजचे जीवन होते. कधी काटे टोचले तर ते बहुतेक चिखलात सडलेले असायचे आणि पायात शिरून नायटा करायचे. दुपार- संध्याकाळी बहुतेक काट्याने काटा किंवा सुईने काटा काढणे हे उद्योग असायचे. त्यातही काहींचे कौशल्य पाहण्यासारखे होते. पायातील काटे हि फावल्या वेळात काढायची असतात हाच आमचा समज होता कारण त्यासाठी पाय धुऊन, गोट्याचा (भिलावाचा) चटका घ्यावा लागायचा. काही दिवस लंगडत लंगडत चालल्या नंतर कळायचे कि आता तुपाने भाजलेले नागीलेचे खायचे पान बांधावे लागेल रात्री झोपतांना, किंवा रुईचीक चे दुध टाकावे लागेल, हे काम घरातील सगळ्यात प्रेमळ व्यक्ती आम्ही झोपेत असतांना करायची, सकाळी उठल्यावर पहिले काम म्हणजे त्या सुजलेल्या आणि पिकलेल्या तळपायाला दोन बोटात दाबून आतला पु काढायचा आणि त्यासोबत तो खुडलेला काटा पण अलगद वर यायचा , समुद्र मन्थनातील त्रीशुळा सारखा. हळद लावायची आणि एकदोन दिवस चिंधी बांधायची, पायाला पाण्यात बुडवायचा नाही अगदी आंघोळ करतांना सुद्धा. 
हल्ली हॉस्पिटल वाले तर लोकल (anasthesia) देऊन surgery करेल वर augmentin 650 mg, twice a day अशी ५ दिवसाची treatment देयील. बाकी टेस्ट करायला लावेल त्या वेगळ्या. कन्सल्टफी ४०० आणि १२०० च्या औषधी आणि टेस्ट मिळून दोन हजारात सहज घालतील.
काय झाले आम्हाला ? इतके वाईट आहे आमचे घरगुती उपाय ? इतके बावळट कसे झालो आम्ही ? कसे वायरिंग केले आमच्या डोक्याचे यांनी पद्धतशीर ? मला नवल वाटते कि माझ्या शाळेत मुख्याध्यापक सोडले तर कुणालाच चष्मा नव्हता. आता चष्मा असणे म्हणजे बुद्ध्याङ्क जास्त असल्याचे लक्षण असते म्हणे. प्रगती म्हणतात याला (ते आपले लिविंग स्टँडर्ड हो ! – जीवनमान उंचवले आहे म्हणे ) कारण प्रगतीची व्याख्या त्यांनी ठरवली आहे ज्यांनी आपल्या डोक्याचे वायरिंग केले आहे , तुमच्या जवळ तेवढे डोकेच नाही, नाही का?

तर, अशा ह्या नदीच्या काठी, कधी कधी रात्री खूपच गूढ वाटायचे. खळखळ वाहणारी धार, वातावरणात एक प्रकारची शांतता म्हणजे पावसाचे दिवस असल्याने भरून आलेले आभाळ पण पाऊस न पडायची तगमग. यावेळी जीव गुदमरतो. कधीही पुराचा लोंढा येऊ शकतो, किंवा आभाळ ढग फुटी होऊन अचानक बरसू शकतो. पाण्याला ओढ पण वरती कसे शांत दिसायचे. नदीच्या पुरापासून गावाचे संरक्षण करणारी एक भिंत होती. कुण्या जुन्या जमान्यात बांधलेली गढी सारखी भिंत. एकदा असा महापूर आला तेंवा पाण्याच्या लाटा तिने झेलल्या. डोहाच्या अगदी बाजूलाच होती ती. मुले मग त्या भिंतीचा वापर करून नदीत उड्या मारायचे. गावाची नदी म्हणजे त्याचे गीत असते. सगळेच तर येतात तिथे आणि तृप्त होऊन जातात. अविभाज्य घटक असते ती गावाच्या स्थिरतेचा. नदीच्या काठावरचे घर म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी नदीवर येणार. कपडे,भांडी धुणी , आंघोळी, गुरा ढोरांना पाणी, डुंबणार्या म्हशी , बैल धुणे , ट्रक्टर, मोटार सायकली धुणे. कुंभार किंवा बेलदाराना मी रेड्याला पखाली लाऊन पाणी भरतांना पहिले आहे. तेंवा गावात झाडेही भरपूर होती आणि घरे सगळी धाब्याची आणि मातीची असल्यामुळे त्यांना लिपून पोतारणे हे सगळे माती काम करावे लागायचे. त्या घरात प्राण होता ते सजीव होते, ते बोलायचे , भिंतींना पोपडे आले म्हणजे समजायचे कि आता यांना पोतार्ण्याची गरज आहे. रंग नव्हते , गेरू किंवा चुना आणि नील वापरून वेगवेगळी नक्षी काढली जायची. माझा मामेभाऊ नारायण हा एकलव्यासारखा स्वघोषित चित्रकार होता. राम-लक्ष्मण- सीता-हनुमान असे त्याचे चित्र , लग्नातले पूजेचे नवरदेव-नवरीचे मंदिर, निलीचा वापर करून त्याचे चित्र सजायचे. सगळी नैसर्गिक रंग आणि त्याचे चितारणे. काय हरविले आम्ही सिमेंट च्या घरात ? हे घर काहीच सांगत नाही. बोलत नाही, उन्हाळ्यात भट्टी सारखे ताप-ताप तापते. मातीच्या घराला मातीचा वास होता आणि त्याचे तापमान नेहमी आमच्या शरीराला साजेसे असायचे. दर पंधरा दिवसात कोणीतरी हे काम करतांना दिसायचा. लागणारे बक्कळ पाणी नदीवरून यायचे. कुणी वारला तर स्मशानात जाळल्यावर, तिसर्या दिवशी त्याचे दात आणि थोडी हाडक नाशिक ला गोदावरीत जायची पण बाकी सारी राख आणि महत्वाचे हाडके नदीतच मिसळायची, स्मशान शेजारीच होते, शेवटचे पाणी प्रेताला नदीत बुडवलेल्या रुमालानेच पाजायचे. ती आई होती तिचे महत्व अनन्यसाधारण होते. आमच्या नदीत २-३ शेवड्या होत्या, म्हणजे विहिरी असतात ह्या नदीच्या पात्रातील, नदी कोरडी झाली तरी त्यांना प्यायचे पाणी असते अगदी कडकडीत मे महिन्यातसुद्धा (वाटर टेबल वर होता – तोपर्यंत बोरिंग ने शोषण सुरू झालेले नव्हते). वाहत्या नदीचे पाणी पिण्यासाठी सरळ कोणी भरत नाही त्याएवजी झिरा खोदतात. नदीच्या पात्रात एक छोटासा फुटभर खोल खड्डा ज्यात सुरवातीला गढूळ पाणी असते नंतर काचेसारखे नितळ पाणी. हा कुणीही, कधीही हाताने खोदू शकतो. नदीत खेकडे पकडणे, छोटे ढोक पकडणे, भिलांच्या मासोळ्या ढापणे हे असे उद्योग चालत. म्हणजे गावात करमत नाही असे सांगणारा मूर्ख भेटलाच नाही. दसर्याच्या १५ दिवस अगोदर सगळे घर स्वच्छ करणे सक्तीचे कर्म कांड होते त्यानंतर कुलदैवत ची पूजा होऊ शकायची. घरातील सगळ्या गोधड्या, झावरी, पडगरे, उशा, तक्क्यांच्या , लोडांच्या खोळी, भांडी, पिंप आणि सगळे बारदान (यात सगळे काही आले) नदीवर धुण्यासाठी येत. ह्या सगळ्या वस्तूंना वाहते पाणी , लखलखीत उन दाखवले म्हणजे कसले आलेय ढेकुण आणि चिलटे ? सगळी शुद्धता, सगळे मांगल्य होऊन जायचे तिच्या पाण्यात. हे सगळे धुण्याच्या कामात आम्ही मदत करायचो, आईच्या आजूबाजूला खूप पोहायचो. मित्रांनो दिवसभर पात्रात पडून राहायची गंमत शब्दात नाही मांडता येत !

एकदा सकाळी-सकाळी शिवलाल भाऊ हाक मारत आला, अरे आपल्या गावाला मारुती वाहून आला आहे. खूप मोठा आहे आकाराने, त्याला काडी टोचली कि रक्त येतेय ! त्या तिकडे शेताकडे उंबराखाली. शिवलाल भाऊ म्हणजे भगत, ३५ शी चा असेल, ठेंगणा पण मजबूत. श्रावण महिन्यात त्याच्या आणि पूर्ण वर्षभर फक्त गुरुवारी गोराबाई च्या अंगात यायचे, म्हणजे तसे अजूनही होते बरेचशे बारके सारके भूत, चुडेल येणारे होते, पण हे विशेष ! त्याच्या अंगात आले कि त्याची मिरवणूक निघायची, हातात लोखंडी साखळी, जिची जडण घडणच जखमा करण्यासाठी असायची , हा उघडा पोतराज एका पायावर लंगडी खेळत पुढे आणि सारा गाव त्याच्या मागे, कुणी लिंब उतरवतोय , कुणी भंडारा (हळदीचा) उडवतोय - सगळे अंग साखळीच्या वाराने रक्त बंबाळ झालेले, खंडोबा यायचा याच्या अंगात. सारा गाव खुंदळून मग तो मामाच्या देव्हार्यात आडवा पडायचा - साष्टांग नमस्काराच्या मुद्रेत. किंवा नदीत डुंबायचं त्याला शांत झाला म्हणायचे. संपूर्ण वर्षभर जो खालची मान वरती करत नाही, ज्याला कुठलेही व्यसन नाही. घर-शेत-काम-जेवणे-झोप च्या पलीकडे नाही तो त्या दिवशी सर्वांवर कडी करायचा. आता मारुती बघण्यासाठी खूप गर्दी झाली, कुणी नारळ, कुणी रुईचीक च्या फुलांचा हार, वेगवेगळ्या अफवा अशावेळी हमखास पसरायच्या. देवा भूतांचा खूप पगडा होता जन मानसावर , प्रत्येक सणावाराला म्हसोबा, भैरोबा, खंडोबा, मातामाई, चातुश्रींगी, करपाल , हनुमान, काली माई , गणेशा यांचे दिवस असायचे, ते कमी कि काय लोहार्याचा पिरोबा , बीड मधला ऋषी महाराज, नागझिरी , तपेश्वर असे बरेच देवस्थाने होती. 
तर हा मारुती वाहून आला म्हणून सगळीकडे चिंता पसरली. आता मी लहान होतो म्हनुन आम्हाला जाऊ दिले नाही पण नंतर बरेच एकले कि २-३ ट्रक्टर लाऊन सुद्धा मारुती हलत नव्हता, साखळ्या तुटल्या , मोठे दोरखंड तुटले. मारुतीत किती शक्ती असते तुम्हाला माहित नाही. लोकांना वाटत होते कि त्याला उभे करायचे आणि देवळात आणायचे पण ते काही शक्य झाले नाही. त्याची तिथेच पूजा झाली आणि नंतर तो असाच परत पुढे वाहून गेला. 

आमच्या गावात एक गोराबाई नावाची आजी होती. तिला मुलबाळ नव्हते, तिला सवत होती आणि ती तिच्या मुलांवर इतके प्रेम करायचे कि बरेच दिवस आम्हाला माहीतच नव्हते कि तिला स्वताचे मुल नाही म्हणून. तिचा गुरुवारी रात्री ८:०० ते ९:३० दरबार भरायचा, संपूर्ण वर्षभर. ती अंगात आले कि पुरुषी आवाजात बोलायची, पालथ्या मांडीवर हात टेकवून गजानन मुद्रेत बिड्या प्यायची, नवर्याला एकेरी बोलवायची आणि तत्कालीन कुठल्याही समस्येसाठी उत्तर द्यायची. गंमत म्हणजे हिंदी बोलायची. विशेष म्हणजे हे भगत लोक कुणाकडूनही पैसा मागायचे नाही. काही वेळा लग्नाच्या मिरवणुकीत डफ च्या आवाजाने, ताल-लयीमुळे काही बायका घुमायला लागायच्या. गडबडा लोळणे , हातवारे करणे ई. हे खूपच सामान्य होते. घडाभर नदीचे पाणी डोक्यावर ओतले म्हणजे हे सगळे शांत व्हायचे.  नदीवर रेती घ्यायला कधी कुणी आजही ट्रक्टर लावत नाही, नदीतून गोटे आणून त्यांना आम्ही घडवायचो, तेच आमचे गोटे. काचेच्या गोट्या आम्हाला तितक्या आवडायच्या नाही. गोटा घडवणे हि एक कला आहे. ते एक मेहनतीचे काम आहे, योग्य दगडच घडवता येतो. बरेचशे ठिसूळ फुटून जातात. तारांच्या गाडीत आम्ही सगळे टोळ भरून आणायचो, दिवाळीचे मोठे फटके सुरवातीला नदीच्या पात्रात फुटायचे.
“नदीची रेती म्हणजे पोलीस असतो पाण्याचे रक्षण करणारा, सूर्य नावाच्या चोरापासून!”
पुण्या मुंबईलाच काय पण छोट्या मोठ्या आणि तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या गावात देखील बांधकामासाठी जी रेती उचलली गेली तिने आपल्या तोंडचे पाणी पळविले. वरती धरणे झालीत सिंचनाच्या नावाखाली जितका पैसा इथे ओतला गेला आणि भ्रष्टाचार केला गेला त्यापेक्षा जास्त दु:ख म्हणजे आमच्या वाट्याचे पाणी शहरातील दारूच्या कारखान्यांना गेले, प्यायला पाणी नाही तर बिअर प्या म्हणे (भाकरी नाहीतर केक खा सारखे). मोठ मोठी धरणे तिचे पाणी अडवून ठेवतात तर मग खालची जीव सृष्टी फुलायची कशी ? आताशा नदीला पूर येतच नाही. बाजारू मिडीयाने त्यांचीच लाल केली – म्हणे राष्ट्र निर्माण ! घंटा. पाणी अडवल्यामुळे मग सुरु झाले राजकारण, पाणी लवाद, फोडा एकमेकांची टाळकी. इतके धरणे बांधून सुद्धा तुम्हाला पाण्यासाठी दाही दिशा का फिरावे लागते? इतक्या उपसा योजना आणून सुद्धा स्वातंत्र्या नंतर ७० वर्षांनी तुम्हाला पाणी मिळू नये पिण्यासाठी ? मोगलाई यांच्यापेक्षा नक्कीच चांगली होती. तुमचे पाणी गेले शहरात आता तुम्ही पण पाठोपाठ शहरातच येवून बसलात कि ! पण काम काय करता तुम्ही इथे ? विस्थापिताचे आणि झोपड पट्टीचे जीवन. जीवनाचे गाणे तेंव्हाच हरविले जेंव्हा तुम्ही यांना मूक परवानगी दिली (तुमची पर्वा कोण करतो म्हणा – तुम्ही विस्थापितांपेक्षा हि दुर्दैवी आहात) बरे ते सोडा शेती सिंचनाखाली कुणाची आली ? धान्यापासून दारू बनविणाऱ्यांची ! तुमची आमची नाही. त्यांच्या वाईनरीजची सोय झाली तुमच्या पोर बाळांना काय मिळाले दारू आणि तिचे दुष्परिणाम. नदीतून रेती उपसणारे माफिया निर्माण झाले त्यांनी सूर्य नावाच्या डाकूला मोकळे रान मिळाले. सगळी घरे आता गळत नसतील कदाचित पण ती झाली आहेत कॉंक्रीट ची जंगले. मना माणसावर त्याचा हा परिणाम झाला कि लोक एका बादलीभर पाण्यासाठी एकमेकांचा जीव घेऊ लागले. खरच इतक वाईट आहे आयुष्य ? इतक स्वस्त व्हावे त्याने ! नैसर्गिक जीवनाचा ऱ्हास आपण केला मोकळी नदी सोडून आपण नळावर अवलंबून राहावे ! अरे माझ्या गावाचे गीतच पळविले चोरांनी. आधीच नदीत पाणी नाही वरतून भरमार कीटक नाशके वापरून शेती सगळी विषारी झाली, थोडे फार पाणी पडले तर त्या विषाने आपला वाटर टेबल चार्ज होतोय, इतकी भीषण परिस्थिती आहे कि गावात सुद्धा हेमा मालिनी “आर ओ” बसवा म्हणते.
५०० रुपयाने टाकी भर पाणी तीथे उन्हाळ्यात विकत घ्यावे लागते. जिथे शेतात काम नाही त्याने कसे घ्यावे पाणी विकत? जे हुशार होते ते शहरात पळून गेले, जे कुठलेच काम करू शकत नाही ते शेतात राहिले परिणाम शेतीचे काम हलके झाले. जिथे पिकविण्यासाठी सगळ्यात जास्त डोके चालविण्याची गरज आहे, जिथे निर्मिकाच्या बरोबरीने प्रज्ञा असावी  तिथे कोण आहेत तर जे शाळेत , नोकरी , धंद्यात फेल झालेले. त्यांना मग लुटणे अधिकच सोपे झाले. १० वी नापास, बापाच्या जिवावर पोसलेला कृषी केंद्राचा विक्रेता त्यांना तज्ञ सल्ले देवून मोठ मोठे विषारी नाशके विकू लागला. बर ह्या राष्ट्र निर्मात्यांनी जी धरणे उभी केली तिचा फायदा त्यांनाच कारण गावात लाईन असते कुठे, फार उदारपणे मायबाप सरकारने वीज माफी केली आहे. ८-८ तास लोड शेडींग जिल्ह्याच्या ठिकाणी आहे कारण जनतेने ते स्वीकारले आहे.
पाणी देवू शकत नाहीत, वीज देवू शकत नाहीत, शिक्षण देवू शकत नाहीत, रस्ते टोल भरून वापरावे लागतात. शेतमालाच्या भावावर यांचा कंट्रोल (PDS) असाच कि यांचेच खिशे गरम व्हावेत.नदी आटली तेंव्हा बहुतेक मना माणसातील जिव्हाळा हि आटायला सुरवात झाली. नदी रक्तवाहिनी आहे शेताची ती कशी आटू शकते ? बायपास करता येतो का धरणाचा ?

कदाचित हे तिथेही दीड लाखाचा स्टेम विकत घ्या म्हणतील. आमची नदी आता आटली आहे, त्यामुळे आमचा water table खाली गेला आहे, परिणामी आम्ही पाण्याला मोहताज झालो आहोत. नदीच्या काठी उन्हाळ्यात सुद्धा जीवन फुललेले असे, खूप झाडे आणि पक्षी, झुळू झुळू वाहणारी बारीक धार  नदी गारवा राखून ठेवी लाही लाही झालेल्या जीवासाठी. आमची नदी सागराला भेटायला निघाली पण तिला रस्त्यातच शासनाने अडवून ठेवले आहे, तिला माहेर नसेल कदाचित पण ती आमचे माहेर होती. आमचे माहेर तिच्यासोबत हरविले कि. आमचा पत्ता तिच्या काठीचा, कुठे शोधावा तो गाव?

Comments

Post a Comment