ओळख
सगळ्यात प्रथम तुमची ओळख करून देतो आमच्या गावच्या
नदीशी कारण ती आमची रक्तवाहिनी आहे, हा गाव आहे एक पुराण पुरुष त्याला समजून
घेण्यासाठी तुम्हाला पहिले आम्हाला समजून घ्यावे लागेल. गाव बनतो त्यातील माणसांनी, त्याला आकार मिळतो तिथल्या चाली रितींनी, मग ओळख
करून देतो आमच्या सरकारी विहीरीशी, शाळेशी, मित्रांशी त्यातील लोकांशी आणि खेळांशी.. तुम्ही म्हणाल हे तर आमच्याही
गावाला आहे. बघा नीट विचार करून उत्तर द्या.. तो गाव आता फक्त मनात आहे आमचा आणि
तुमचा काय, दोघांचाही गाव हरविला आहे आणि त्याला शोधून
काढण्यासाठी पहिले तो कसा होता हे समजून घ्यायला नको ?
पण मग तुम्हाला आमची भाषा शिकावी लागेल, शिव्या शिकाव्या
लागतील. आमची Terminology आमचे खेळ आणि इतर उद्योग समजून
घ्यावे लागतील. ही कथा १९८० ते १९९० च्या काळातील आहे, हा
अनुभव मात्र आपल्या सगळ्यांचा सारखाच आहे. तुम्हाला कदाचित तुमचा हरविलेला सुखाचा
धागा यात मिळेल. आपल्या गावात वेगवेगळे कथानक आहेत आणि वेगवेगळी पात्रे आहेत, आता काळाच्या ओघात ती सगळी वाहून गेलीत पण त्यांचे ठसे मानस पटलावर आजही आठवणींचा
सुगंध बनून दरवळतात. ह्या सगळ्यांनी कळत नकळत आपल्या सगळ्यांना घडविले. कालचा गाव
वेगळा होता – काळ वेगळा होता – गरजा आणि त्या पूर्ण करणारी साधने वेगळ्या स्वरुपात
असतील पण प्रेम मात्र आजही तेच आहे.
निघताना
गळा का दाटून येतो ? डोळ्यांच्या कडा का पानवतात ? ओढ आजही
तीच आहे की. श्रावणातील संध्याकाळ आजही तीच आहे – पाराची घंटा आजही तशीच वाजते.
दवंडी पण तीच आहे आणि त्याच्यामागे ओरडणारी बाळगोपाळांची टोळी पण तीच आहे की. घरे
– गल्ल्या - माणसे बदलली आहेत पण ठसका आजही तोच आहे. आपल्याच दिवंगत मित्राचा नातू
नकळत त्याचे बालपण लेवून धावत जातो समोरून तेंव्हा कळते अरे हा तर परत आला
की. या सगळ्यातून उलगडेल माझा गाव. या
कथेला काही सुरवात नाही आणि शेवटही नाही, हा काळाचा अनादि
अनंत प्रवाह आहे आपण त्यातल्या लाटा. प्रत्येकाला गावासाठी काहीतरी करावेसे वाटते, पण नेमके काय करावे आणि कुठे करावे याचाही आपण विचार करू. कुणी कदाचित
दोन डुबक्या मारून येईल भूतकालात या निमित्ताने, आणि त्याला
मग आठवेल स्वदेस चे गाणे …
“मिट्टी की है जो
खुश्बू, तू कैसे भुलाएगा तू चाहे कहीं जाए, तू लौट के आएगा…”
Comments
Post a Comment