मनोगत

खूप दिवसापासून वाट पाहत होतो, पण मला पडलेल्या प्रश्नांचे उत्तर सापडत नव्हते ! स्वतःशी केलेला वाद, संवाद, पुस्तकांमध्ये धुंडाळले, थोरा मोठ्यांचे सल्ले घेऊन पहिले, तत्वज्ञानात शोधले  पण सगळीकडे भेटले मातीचेच पाय. आज अचानक वाट सापडली, उत्तर सापडले आणि म्हटले चला लिहून काढावे. परत हा विचार पण आला कि मी नाही सांगणार तर कोण सांगेल! कुणासाठी तर जगासाठी ! स्वतःचे नाव पण नाही , उगीच इगो ग्रॅटिफिकेशन नको (म्हणजे माझीच कशी लाल). काळजी घेतली आहे कि जिथे तिथे "मी/माझे/आमचे" डोकाऊ नये पण शेवटी मनच ते ! ओखारी करणारच, तर अशा ठिकाणी कृपया बाळबोध समजून माफ करावे हि विनंती.

शेतकऱ्याचा पोरगा मी, दोन आयुष्य जगलो ! रानाचे आणि शहरांचे, मजुरीचे आणि कॉर्पोरेटचे, भारताचे आणि इंडियाचे. मराठीतच लिहीन हा अट्टाहास कारण मायबोलीची ताकद इंग्रजीला नाही. शब्द देव आहेत म्हणून त्यांनी उगी यावे आणि काळजाला भिडावे. मी ओझे वाहीन, परब्रह्म व्यक्त होतील आणि ते भेटतील थेट तुमच्या हृदयाला. काही चुकले तर माझे, काही वर्मी लागले तर ते पांडुरंगाचे.”

आता नाही तर मग केंव्हा सांगेन ? म्हणून म्हटले लायन किंग च्या रफिकीसारखे "Its Time" !

बर हा राफिकी कोण ? तर हा एक “स्वयंघोषित” जंगलाचा फिलोसोफर म्हणजे आपला आपणच तत्वज्ञानी ! याला काळाचे पाय ओळखता येतात. एका रस्ता भटकलेल्या सिंहाच्या पिलाला (सिंबाला) तो त्याचे हिसकावलेले राज्य परत घ्यायचा कानमंत्र देतो. त्याला स्वताची ओळख करून देतो. बरीच वर्ष रस्ता चुकलेल्या त्या तरुण आणि परागंदा झालेल्या सिंहाला तो म्हणतो “Its time", to go back to where you belong” (आताच वेळ आहे, जे धर्माने / निसर्गाने तुझे आहे ते मिळव) जब जागे तब सबेरा या नात्याने आजच वेळ आहे, परत जे आपले आहे ते मिळवायची. हे लिहितांना कसला लिहायचा अनुभव नाही, नवकवी नाही कि लेखकपण नाही पण पांडुरंगाचे काम असल्याने तो सुचवेल तसे लिहावे, आपण फ़क़्त ओझे वाहायचे. याचा एक फायदा असा आहे कि चुकलो तर काही हरकत नाही, हरण्यासाठी काही नाही आणि जिंकायसाठी तर सगळे जग माझे आहे (बनी तो बनी, नही तो अब्दुल गनी). तर मग नमनाला घडा भर तेल न खर्च करता आणि याचे त्याचे आभार न मानता सरळ मुद्द्यावर येऊ या का? खर म्हणजे आभार मानायचे झाले तर ती एक वेगळी गाथा होईल. जे जे आज मी माझे म्हणतो (शरीर, मन, ज्ञान,संपत्ती) सगळी कुणीतरी दिलेली आहे, माझा असा फक्त अनुभव आहे.

या कथेतील कुठलीच पात्रे काल्पनिक नाहीत, त्यांचा माझ्या जीवनाशी, स्थळ काळाशी गहिरा आणि खोल संबंध आहे! हा माझा संवाद आहे माझ्याशी, माझ्या गावाशी, माझ्या मित्रांशी, नात्यांशी. जगणे सोपे कसे करता येईल याचेच हे चिंतन आहे आणि नव्या तरुण मित्रांना देण्यासारखे हेच तर आहे माझ्या जवळ. हा संवाद पण अशा वेळी लिहिला जात आहे कि चाळीशी ओलांडली आहे, आपण आता मागच्या सीटवर बसावे आणि आपल्या पेक्षा लहान मित्रांना गाडी चालवू देणे. ते सगळे आता आपला आदर करतात, त्यांच्या विश्वात मला स्थान देतात हेच मोठे ऋण आहे. येणारे दिवस भयंकर स्थित्यंतराचे असतील, गरीब अधिक गरीब होईल आणि माणुसकी नागवली जाईल. अडाणी आणि मूर्खांचे पोस्टर लागतील आणि सारेच दीप कसे मंदावले आता! याचा प्रत्येकाला साक्षात्कार होईल तेंव्हा हे पुस्तक त्यांना दिलासा देयील कि हा क्षण इतका वाईट नाही. देशाचा बाजार व्हायच्या आधीही हा देश अभावात पण आनंदात नांदत होता.

आपण वाढतो वयाने, मनाने, अनुभवाने त्यात कितीतरी लोकांचे योगदान असते. निसर्ग वाटत असतो भरभरून आपण त्याचे दान अडवून ठेवतो, ते पुढे सरकविले नाही तर ते आपल्या आत वाढते कॅन्सर सारखे. देत राहावे ज्याचे त्याला, आपण सुखी तर कुटुंब सुखी, कुटुंब सुखी तर गाव सुखी आणि गाव सुखी तर देश सुखी अशी चढ्या क्रमाची धाटणी असते. हे देन लागतो मी माझ्या गावाचे, त्याचे त्याला देतो आहे. त्याच्या मुलांना कदाचित मार्गदर्शन झाले यातून तर भरून पावलो.

Comments

Popular posts from this blog

चिलयपाटी

नदी

मसनखडी आणि चुनीलाल गवळी

देवमाणूस

नाना

एसटी

नांगरणी

मराठी मुलांची शाळा, कासमपुरे

ओळख