पडझड

 पडझड

गावात माझ्या लहानपणी काही मोजकीच घरे होती ज्यांची मुले शाळेत चप्पल घालून येत, ते सुखवस्तू होते. ७०-८० एकर काळीच्या जमिनी, राहायला चुन्याची हवेली वजा पक्की घरे, देवढीतले लाकूड काम घराला शिसम ची खांब आणि आरे असलेले धाबे, खाली शहाबादी फरशा. मोठ मोठे ओटे, त्यांना लावलेल्या घोडे बांधायच्या कड्या, पाण्याचे हौद, मोरीला असलेले धुण्याचे दगड. फक्त गुरे बांधण्यासाठीचे, पत्र्याचे छप्पर असलेले, पक्के वाडे. त्यांचे राहणीमान सुद्धा डौलदार असे. गुलाबी, लाल लाल पागोटे, कानात भीक बाळ्या, बोटात वेगवेगळ्या अंगठ्या, किमती चढावे. छोट्या छकडा गाडीत त्यांची सवारी शेतातील बांधा पर्यंतच जात असे. या मंडळींची मुले बहुधा व्यसनी होती. श्रीमंत आणि दरारा असलेल्या आई बापाची व्यसनात वाया गेलेली दुसरी ऐदी पिढी तिसर्या पिढीला भिकेला बसविते हा अनुभव मी घेतला आहे. त्यांच्या नातवांच्या लग्नात पहिल्यांदा गावात तमाशा आला. हे नातू मंडळी म्हणजे माझ्या वर्ग मित्रांचे लहान बंधू- बांधव. तमाशाला नाचणाऱ्या बाया आल्या, गणपतराव आले , तगतराव आले. आता पर्यंत रामजी बाबाच्या कीर्तनावर पोसलेल्या मनाला नवीन Food for thought Or Chicken soup for Soul मिळाले. शाळेच्या समोरील पंढरीत मोठा फड पडला, स्टेज सजले. टूप कांड्यांच्या प्रकाशात सारी पांढरी न्हावून निघाली. बामनाने तमाशा आणला न भूतो न भविष्यती अशी बातमी. त्या सगळ्या झगमगाटात आम्ही पण गेलतो तमाशा बघायला. गुबगुबीत बाया , लाली लावलेल्या गालांच्या आणि बाप्ये मंडळी नोटा दाखवून त्यांना नाचत नाचत उड्या मारून पैसे घ्यायला भाग पडत. बाई जवळ आली कि आणखी वर करीत नोट. बाई उड्या मारी, जागच्या जागी फुटबाल सारखी नाहीतर हाताला लटकत असे. वात्रट गावातील मुले बारीक चिमट्या घेत धुंगनावर. कुणाला सांगे बिचारी. “हमे तो लुट लिया मील्के हुस्न्वालोने गोरे गोरे गालोने काले काले बालोमे” इकडे काळू बाळूचे मराठी तमाशा यायला नंतर २० वर्ष लागली. हा बामनाचा पोरगा म्हणजे शान्त्या मामा जेंव्हा पेढीवर त्या काळात १०,००० चा आकडा लावायचा तेंव्हा पेढीवाला सुद्धा घामाघूम व्हायचा. (५० ५० कोस कीर्ती पसरलेल्या गब्बरसिंग ला पकडायचे इनाम त्या काळी ५०,००० होते यावरून तुम्ही त्याकाळातील अर्थ व्यवस्थेचा अंदाज लावू शकता.) मुंबई वरून आकडा फुटायचा मटक्याचा. रतन खत्रीचे नाव सारखे कानावर येई. हे सगळे उद्योग शेजारच्या गावात चालत. लोहारा हा आमच्या गावाचा मोठा भाऊ. तिकडूनच सारे ज्ञान प्रसारित होई.

          तर अशा मामाच्या मुलांचे शिक्षण आमच्या सोबत झाले. त्यांना सुरवातीच्या वर्गात सोडायला एक माणूस येई नंतर घ्यायला एक माणूस येई, ते घरून चटई आणीत, चटईवर बसत बाकी आम्ही सगळे विद्यार्थी सारवलेल्या जमिनीवर. त्यांच्या मामाच्या गावाला ते express एस टी ने जात. त्यांच्या कथा रंगतदार असत. तोंडाने घाटात चढणाऱ्या एस टी चा आवाज करून ते आम्हाला त्यांच्या सोबत आभासी जगात प्रवास करायची संधी देत. जसा जसा काळ पुढे सरकला तसतसा त्या गोजिरवाण्या मुलांच्या नशिबात गाव सोडून परागंदा व्हायची पाळी आली. बामनाने मातीमोल भावाने दारूत आणि जुगारात शेती विकली. गावात मजुरी करायची लाज आणि घरी भूक/लाचारी, मोठा मुलगा शहरात रिक्षा चालवायला निघून गेले. गोड गोजिरवाण्या मुली दाही दिशांना दिल्या गेल्या. ज्या घरात सोन्याचा धूर निघायचा तिथे पर्खात्यांच्या धुराने सगळी माडी काळी केली. रंग द्यायला कुणाजवळ पैसे? ज्या मुलाच्या बारशाला तमाशा आणला होता भुसावळ वरून, त्या मुलाने वयात आल्यावर गरिबी आणि बेरोजगारीला कंटाळून जीव दिला. व्यसनांचे पाप ज्याच्या नशिबात आले त्याची दुर्दशा व्हायला फारसा काळ लागत नाही. हळू हळू गावातील मोठमोठी खानदानी घरे बुडायला सुरवात झाली होती. जी गत बामणांची तिच गत मारवाडी कुटुंबांची झाली. कामा निमित्त, नवीन आकांशापायी, नवीन स्वप्नांच्या शोधात गावचा upper class स्थलांतरित झाला. सुंदर टोलेजंग हवेल्या ज्यात काचेची झुंबरे होती, दिवे दाण्या होत्या. पाण्याचे हौद होते, लाकडाचे कोरीव काम तर असे कि बघत राहावे. सागवानी लाकडात कोरलेला पोपट, केळीचा घड, वाघाचे मुंडके. गावाभोवतीची शेती, विहिरी, पाण्याच्या कुंड्या, गुरांसाठी पाणी पिण्याचे हाळ सगळे त्यांचेच होते. हळूहळू “कालाय तस्मै नम:” म्हणत बरीचशी कुटुंबे स्थलांतरित व्हायला सुरवात झाली. गावावर अतोनात प्रेम करणारे शोभाचंद काकाजी ज्यांच्या प्रेरणेने शाळा उभी राहिली- किती यातना झाल्या असतील त्या जीवाला ? ह्या मी अगदी पहिल्या वर्गात असतानाच्या घटना. काहींनी प्रयत्न केला तिथेच जम बसविण्याचा पण ते जमले नाही. विकासाचे वारे वाहायला सुरवात झाली होती. गावची मंडळी सुरवातीला छोट्या शहरात स्थलांतरित झाली, काही लोहारा गेले, सिल्लोड ला गेले, जामनेर, पाचोरा, जळगाव आणि औरंगाबाद , पुणे आणि मुंबई. पोटासाठी दाहीदिशा. मुंबई काय नवीन नव्हती पण कुटुंबातील एखादा जायचा आणि त्याची नाळ गावाला जुडलेली असायची, सणासुदीला तो घरी यायचा. इथे तर हळू हळू आख्खे कुटुंबच परागंदा झाले. कारणे बरीच होती कुणाला मुलांच्या शिक्षणासाठी जावे लागले, कुणाला शेतीत काही राम नाही, मजूर ऐकत नाही अस वाटे. कुणाला अधिक पैसे आणि व्यवसायासाठी शहरात राहणे गरजेचे होते तर कुणाला नोकरी धंद्यानिमित्त. काहींनी गावातील शेती आणि घरे विकून टाकली तर काहींनी नफ्याने दिली. जाणारा पाचोरा जावो किंवा जळगाव किंवा औरंगाबाद किंवा पुणे-मुंबई किंवा बंगलोर नाहीतर अमेरिका भावना सारख्याच असतात. प्रत्येकाला दसर्याला गावी जावून बाल कृष्णा ची पालखी खांद्यावर घ्यावीशी वाटतेच. मोठ्या खोडांचे आशीर्वाद घ्यावेसे वाटतेच. नाहीतर कोण ओळखतो तुम्हाला अगदी फोर्ड मस्तांग जरी असली तुमच्या घराबाहेर ?

“आ गयो भाऊ ? कान्ह है ! काई चाल्यो फी, कता पोर्यान है , कत्तीम जाव वे ?

मलतो जा भो, आतो जा.  हामन त यत्ता दूर आ नाही सका तूच आजा तो जा मल्बकू !”

          परिवर्तन संसार का नियम है ! बरोबर आहे बर्याचशा देवढ्या मध्ये महाभारताचे कृष्ण अर्जुनाचे युद्ध भूमिवरचे चित्र आणि त्याखाली हे उतारे असायचे. “क्या तुम्हारा था जो तुमने खो दिया, तुम न कूछ लेके आये थे न लेके जावगे” सगळे परिवर्तन आजूबाजूला घडत होते आणि उघड्या डोळ्यांनी ते बघण्या पलीकडे हातात काय होते ? १९९८९-९८ मध्ये हे परिवर्तनाचे वारे त्या डोल्दृम च्या वार्याप्रमाणे जरा जोरातच वाहू लागले. त्यांनी आपल्या संस्कृतीच्या मुळ्या हलविल्या. ८ वर्षात ६ पंतप्रधान, बर्याचशांचा  कार्यकाल दिवसा मध्ये मोजता येयील असा. १९९१ च्या राजीव गांधी हत्त्येनंतर, देश खूप स्थित्यंतरं मधून गेला. राजकीय अस्थिरता, सोन गहाण ठेवणे, आर्थिक उदारीकरणाचे निर्णय. या सगळ्यांचा काहीतरी विचित्र परिणाम दूरगामी स्वरुपात झाला. उलटे सुलटे राजकीय आणि आर्थिक निर्णय, जागतिक बाजारीकरण, हे सगळे आपल्याला नवीन होते.

बाबू शेटची ४०७ ट्रक गावाला आणि शहराला जोडणारा दुवा होती. ती आली पण याच कार्यकाळात. सुरवातीला स्वत:च्या दुकानातील किराणा सामान, डीझेल च्या टाकी, युरिया च्या थैल्या, सिमेंट च्या थैल्या, आसारी ई. गावातील घर बांधायला लागणारे सामान आनण्यासाठी तिचा वापर व्हायचा. शाळेतला चुन्याचा घाना एव्हाना बंद पडला होता. नदीची वाळू आणि गढीची माती, चुना कालवून पूर्वी घरे बांधली जायची. धाब्याचे लाकूड काम मिस्त्री स्वत: करायचा त्यासाठी लागणारी लाकड बिडातून यायची. आता गरजा काळानुसार बदलायला लागल्या होत्या सिमेंट शहरातच मिळे. ४०७ जळगावला सागर भवन जवळ उभा राही. शहरात बाजारासाठी जाणारे त्याला सांगून ठेवत आणि तो त्यांचे सामान गावात आणून सोडत असे. संध्याकाळी ७ वाजता तो सागर भवन सोडीत असे. तोपर्यंत ढेपचे पोते, सिमेंट, आसारी, डीझेल असले सगळे सामान तिथे सोडावे लागे , कधी कधी संध्याकाळची एस टी हुकलेले आम्ही त्या गाडीने घरी येत असू. दुरुस्तीला आणलेले पंप सेट, पीटर मचीन, नवीन घेतलेल्या इलेक्ट्रिक मोटारी, पाईप, मोटारींचे फुटबाल, फ्लान्झा, PVC solution. शेती नकळत आधुनिकतेकडे झुकत होती त्याला कारणीभूत म्हणजे गावात आलेले काही प्रगतीशील शेतकरी. जुने ते सगळे भंगार या आततायी विचारसरणी वर सुरु झालेली आमची आधुनिक शेती लवकरच डबघाईला आली. १९९० मध्येच आम्ही केळीवर ठिबक सिंचनाचा सेट बसवून टाकला. उलटे आणि आततायी प्रयोग भोवले ते सांगणे नको. एका दमात पपई लाव, डांगर लाव, मिरच्या, वांगी, हायब्रीड बी बियाणे लाव, पाईप लायीनी टाक उत्पन्न कमी खर्च अधिक. आजोबांची जुनी पद्धती बाद करत आमचेच खरे असा ढोल वाजवत सगळी शेती कर्ज बाजारी झाली. आमचे अनुकरण इतरांनी केले, कुणी सावधपणे केले कुणी अंधपणे केले. सगळेच काही वाईट नव्हते, काही ठिकाणी फायदाही होता, जीवनमान सोपे पण होत होते उदा. पीटर मचीन ने नदीचा छोटा खड्डा उपसणारे आजोबा आणि शेतभर पाईप आणि मोटारींचे जाळे पसरविणारे आम्ही यात फरक होता तो व्यवहार ज्ञानाचा. आजोबांचा खर्च कमी आणि उत्पन्न जास्त होते. आमचा खर्च वारेमाप आणि उत्पन्न तेवढेच होते. आजोबा स्वत: शेतात असायचे, मजूर वर्ग मोजकाच होता आम्ही घरून शेती करायची. आजोबांना जीवनाचा अनुभव आणि धर्माची साथ होती आम्ही चवचाल अर्थव्यवस्थेचे पहिले बळी होतो. सोसायट्यांचे कर्ज झाले, शासनाच्या सगळ्या योजना वापरून झाल्या उदा. फळ बाग लागवड, ह्या बँकेचे कर्ज, त्या बँकेचे कर्ज ई. त्या ८ वर्षात इतके बदल पहिले कि मागील २० वर्षात इतके शेतकरी का आत्महत्त्या करतात याचे अचूक उत्तर मी सांगायचा प्रयत्न करेन, त्यासाठी उपायही सुचवेन, त्यासाठीच तर आहे हा पुस्तक प्रपंच.

डोके न वापरता नवीन साधने आणली, स्वत:ला आधुनिकतेचे बिरूद लावूनही शेवटी डोक्याला हात लावायची पाळी का आली त्याचेच हे चिंतन. नवीन पाण्यासाठीच्या मोटारी आणल्या, त्यासाठी लागणारी वीज आणली, वीज आणायच्या आधी खांबे आणले, त्यासाठी साहेबांना पार्ट्या दिल्या १०० च्या ठिकाणी १०००० खर्च झाले. एक नवीन पार्टी कल्चर उदयाला आणले. त्यासोबत दारू आली, राजकारण आले. गावाची शांतता ढवळली गेली. आता क्या मोटारी मेंटेन करणे म्हणजे वायरमन आले, त्यांना वर खाली करणे, विहीर बांधणे, पाईप जोडणे उत्पन्न राहिले बाजूला आणि इतर खर्च वाढला. सामान आणायला मग लागते मोटार सायकल, त्यासाठी लागतात हुकमी माणसे, मग  हि हुकमी माणसे लावलेल्या सवयी नुसार हातचे राखून फाळके मारतील, त्यांना लागते संध्याकाळ झाली कि दारू. याला पाज - त्याला पाज. उगीचचे project management गळ्यात पडले. ठिबक संच तर बसविला पण त्याला हाताळावा कसा याचे नियोजन कुठल्याच नार्याला माहित नाही. नदीचे पाणी त्यात टाकून शेवाळाने सगळे ड्रीप चोक केले.

बँकेचे २ लाखाचे कर्ज करून दुसऱ्या वर्षी टाकले सगळे माळ्यावर, ठिबक च्या नळ्या टाकल्या लिंबाच्या झाडावर, नाहीतर त्याला उंदीर कुरतडणार ! खरच गरज होती इतक्या सगळ्या गोंधळाची ? बंकेचे व्याज काही थांबत नाही. मग आले शेतकरी राजाला गळफास लावणारे कृषी सेवा केन्द्र. ज्याला १० वी पास व्हायची अक्कल नाही अशा शिक्षणात वाया गेलेल्या पोराला बापाने कढून दिलेला हा व्यवसाय. हा देणार गरीब शेतकर्याला काय लावावे आणि किती लावावे याचे शिक्षण. देशाच्या क्षितिजावर agricultural multinational चा उदय. राशी २, वायवन हि नावे कानावर पडू लागली. दिवाळीत फटाके आणावी तसे पेरणीत व्याजाचे पैसे काढून आणलेले बी बियाणे (शेकडा १० म्हणजे १०० रुपयाला महिन्याला १० रुपये व्याज जगातली अशी बँक जिला तारण काहीच नको ती फक्त रक्त शोषते ) मग अधिक उत्पन्नासाठी आणलेले yield, फवारणीचे पंप, किडी साठी लागणारे इंडोसुल्फान, रोगोर, थायमेट. बिना डोक्याचे कृषी अधिकारी आणि विकत घेतलेले कृषी पंडित आणि त्यांची विद्यपीठ. सगळ्यांनी मग खेळ मांडला. आधीच डबघाईला आलेला शेतकरी “मरता क्या नही करता” न्यायाने आता काय तर नंतर काय अगदी वाटेल ते. (तुम्हारे टूथ पेस्ट मी नमक है ? सारखे) सांगेल ते product, मिळेल त्या भावाने विकत घेऊ लागला (व्याजाच्या पैशांनी) आजूबाजूचे जे करतात ते जर तुम्ही केले नाही तर मागे राहून जायची भीती (हि मेंढरांच्या झुन्डीची मानसिकता अगदी शिक्षितांना सुद्धा सोडत नाही). काळा बाजारात मिळालेले बियाणे किती गुणवत्तेचे असणार ? कृषी केंद्रांनी , बियाण्याच्या कंपन्यांनी यात उखळ पांढरे करून घेतले. वारेमाप वापरलेल्या रासायनिक फवारे आणि खतांनी जैविक विविधता धोक्यात आणली, पाणी जमीन अशुद्ध झाले. इतर देशात हाकलून दिलेली monsato आपल्याला कशी चालते? त्यापेक्षा ८ वर्षात ६ पंतप्रधान बदलविणाऱ्या देशावर खरच लोकशाही राज्य करते कि भांडवलशाही चे हित जपणारी Monsato किंवा तिने राजकीय lobby केलेली अमेरिका ? इतक्या लांब कशाला जाता असले प्रश्नही कधी तुम्हाला पडलेत यापूर्वी ? याचा अर्थ आपल्याला अंधारात ठेवून आपले शोषण केले जाते. (“गुलामाला तो गुलाम असल्याची जाणीव करून दया पुढचे तो स्व:त पेटून उठेल आणि स्वत:ला मुक्त करेल )

पिकांचे एक चक्र होते शिवारात, हरबरा पेरला कि जमिनीला ३ वर्ष लागणारे नत्र निसर्ग करून ठेवायचा. त्या बेवाड वर घेतलेले दुसरे पिक बिना युरियाचे येई. पिकाचे रक्षण करणारी आणि खाणारी अशी दोन प्रकारची कीड असते. आपण जेंव्हा फवारतो तेंव्हा दोघांना मारून टाकतो. शरीरावरही आपण तेच करतो कि (भरमार anti biotic घेतोच कि आताशा ampicillin 250 चा काही उपयोग होत नाही augmentin 650 3 times a day द्यायला गावठी डॉक्टर कचरत नाही). गोळ्या गरम पडतात बाबा मान्य आहे पण जखम कोरडी झाली कि नाही, मग पोट खराब झाले जन्माचे तरी काही हरकत नाही ?

मोटारी आल्या आणि पाण्याचा इतका उपसा झाला कि विचारू नका. शेतात फुट बारी देतील पण नदी-विहिरी आटवतील शेजार्याला पाणी मिळाले नाय पाहिजे. आजोबाच्या नैसर्गिक शेतात ४८ किलोचा केळीचा घड निघायचा त्याच जमिनीत आमच्या काळात १८-१९ ची रास मिळाली कि आम्ही स्वत:ची पाठ थोपटून घ्यायचो. त्यासाठी आजोबांना खर्च नव्हता. उत्पादन मोजके पण दर्जेदार होते आणि विशेष म्हणजे कुणावरच ते अवलंबून नव्हते. व्यापारी अशा उत्पादनासाठी आजोबांचे पाय धरत शेतात काटा करायचे (वजन मोजायचे ) आणि आम्हाला मात्र त्याच्या दुकानाच्या चकरा मारायला लावायचे. हा सगळा बदल जीवनाच्या सर्वच क्षेत्रात शिरला. “ये दिल मांगे मोर” हे चोरांचे घोषवाक्य जीवनाचे सूत्र झाले कि विनाश फार लांब नाही. आजोबांच्या गरजा कमी होत्या. जीवनमान उंचावणे म्हणजे २री च्या पोराला चष्मा लागणे व्हय ? कि ग्लास भर दुध पिवून ३ वेळा संडास ला जाणे (पचविता न आल्यामुळे )? कि रोज BP or Diabates च्या गोळ्या खाणे (उच्च निच्च रक्तदाब, मधुमेह, anxiety)? गावातील कुणालाही ४० किलोचे पोते उचलता येत असे अगदी बारक्या सारक्या वयात आलेल्या मुलाला सुद्धा. गव्हात gluten नव्हते का पूर्वी ? steroid दिलेल्या चिकन रोजच खाणार्याचे काय होयील ?

पिकांचे एक असे चक्र असते. वेगवेगळ्या बेवाडावर वेगवेगळी पिके जोमाने येतात. त्यांचे कीड नियंत्रणाचे हि एक शास्त्र असते. जमिनीचा पदर सहा इंचाचा तीच खरी दुधाची साय. ट्रक्टर चा नागर फुटभर खोल जावून ह्या सायीचे मातेरे करतो. जमीन कडक होते ती वेगळी. हे सगळे अनुभवाचे ज्ञान आमच्या जवळ नव्हते, मुळात आम्ही अति उत्साही शेतकरी होतो. झटपट चा instant पद्धतीला अनुभवाची जोड नव्हती. सगळीकडे बदल होत होते. आमचे भावनिक जग पण bollywood प्रमाणे बदलत होते. मुकाबला पासून सुरवात करत आमची टुरिंग टाकीज साजन पर्यंत कधी आली तेच कळले नाही. आमचे कपडे, बूट बदलले. लोहार्याचा दिलखुश टेलर old fashioned वाटू लागला. जळगाव च्या फुले मार्केट मध्ये असलेला Lords Collection आधुनिक वाटू लागला. पवन क्लाथ सेंटर चे कापड आणि दिलखुश टेलरचे शिवणकाम आमचे ८०% खर्च वाचवायचे ( नुसती कापड नाही तर त्या अनुषंगाने येणारी इतर चैन, उधळपट्टी) एकदा डोक्याचे वायरिंग झाले कि तिथे शहाणपण काम करीत नाही. अशा वेळी सल्ले देणारा मूर्ख वाटू लागतो. त्याचा मनस्वी तिटकारा येतो. टुरिंग टाकीज मधील करमणूक हलकी वाटायला सुरवात झाली. शहरात सुद्धा मेट्रो च्या चैनी यायला सुरवात झाली होती. सोफे आणि वातानुकुलीत थिएटर चा उदय होत होता. सिनेमा समाजमनाचा आरसा आसतो. देव धर्माचे सिनेमे मागे पडून देश भक्तीचे, टोळी युद्धाचे, लव्ह स्टोरी ची मिसळ मागे पडून खलनायक, डर सारख्या सिनेमांची गर्दी वाढू लागली. दारू-बिअर हे मागच्या दारातून दिवाणखान्यात आले आणि समाजमान्य झाले आता पुढच्या दाराने राजरोसपणे बायका पुरुषांबरोबर दारू पिवू लागल्या अजून निरांजानावर सिगरेट पेटविणे बाकी होते. तेवढी विकून खाल्लेली नव्हती. योग्य अयोग्य ज्याचे-त्याचे, ज्याने-त्याने ठरवावे. स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. लेखक म्हणून मला जे भावले तेच लिहीन. तीन वेगवेगळ्या जगांचा अनुभव घेतलाय, बाईने काय अन माणसाने काय दारू प्यावी कि नाही हे व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. विषय एवढाच कि “your freedom to swing hand freely in the air ends where tip of my nose begins”

पाण्याच्या मोटारीसोबत स्टार्टर आले, विहिरीचे पाणी कमी जास्त झाले म्हणजे ती मोटार खाली किंवा वर चढवावी लागे. त्यासाठी ३ ठिकाणी मोटारीचे fondation करावे लागे. वेगवेगळ्या उंचीवरून ती पाणी ओढत असे. उंचीनुसार तिचा फोर्से ठरत असे. या कामासाठी २-३ मजूर आणि एक खात्रीचा वायरमन लागत असे. जर चुकून वेळेत मोटर काढायला उशीर झाला तर विहिरीचे पाणी वरती येवून तिला पाण्यात बुडवीत असे. अशा बुडलेल्या मोटारचे वेगळे कौतुक करावे लागे. तिला उघडून रात्रभर तिच्यात २०० वाट चा लाईट टाकून तिला शेकणे, चुकून कोणी स्टार्टर चे बटन दाबले तर मग अशा जळलेल्या मोटारीला भरायचा खर्च, मोटार rewinding च्या दुकानाच्या चकरा माराव्या लागत. अशी दुकाने शेजारच्या मोठ्या  गावी असत किंवा गावात असली तर तिचा कारागीर बेभरवशाचा असे. जितक्या जास्त मोटरी वाढल्या तितके काम वाढले, तितके पैसे वाढले आणि संध्याकाळी दारू पिणारा excellent brain चा अमर भाऊ दिवसपण प्यायला लागला. हाच भाऊ रोज रात्री पांडव प्रताप किंवा हरी विजय ची पोथी वाचायचा. त्याचे मराठी आणि संस्कृत चे ज्ञान इतके छान होते कि माझ्या डोक्यातील बरेचशे शब्द हे त्याचीच देणगी आहे. अमर भाऊ सर्किट बघून स्वत: रेडीओ तय्यार करू शकायचा. सर्किट बघून त्याने वाकी-टाकी बनवला होता. अशा सुंदर मनाच्या आणि डोक्याच्या माणसाला दारू कशी चिटकली आणि तिनेच त्याचा अंत केला. गावात अशा हिर्यांची वानवा नव्हती. मोटर काढणारा भागचंद भाऊ ला वेगळे वरदान होते. तुम्हाला कदाचित खरे वाटणार नाही पण तो लाईन चेक करण्यासाठी कधीच टेस्टर वापरायचा नाही. फक्त बोटाने स्पर्श करून त्याला कळायचे कि फेज चालू आहे कि बंद. श्वास रोखून तो पाण्याखाली जावून मोटारीच्या fondation च्या नट-बोलट मोकळ्या करायचा. कितीही रात्री-सकाळी यांना उठवा ते नाही म्हणणार नाही अर्ध्या झोपेत अर्ध्या दारूत यांनी केलेली कामे पाहून तोंडात बोटे घालावीत. त्यांना पकडायच्या पण ठराविक वेळा होत्या. संध्याकाळी हे कुणाच्याही बापाला सापडत नसत. यांचा attitude असा कि “तू राजा तुझ्या घरचा, इथे तर मीच आहे” एकदा यांनी काम मनावर घेतले कि निश्चिंत होवून जावे, पण चुकून सामान आणायला लोहारा गेले तर मग रात्री दारूतच भेटत.

आर उको काई होयो, म गयो साळी फ्लान्झ लेब, त वा कटार्याकी दुकान साळी बंद हि. फी काई करबको, त म वापस आब नाक्ल्यो, त म्हकू वा - या काई नाव गड्या उको ( ह्या क्षणात तो तुम्हाला जी टोपी घालायची त्याचा विचार करत असतो मग त्याचा मूड पाहून तुम्हीच त्याला नाव सुचवायचे आणि स्वेच्चेने ती टोपी घालून घ्यायची) वानिकी मुन्गषा मुडाको (मुंगुस तोंडाचा) , चुत्काको नाव भी याद नाही आ रहे है.

अशा वेळी नाव महत्वाचे नसते. तो आला त्याने तुम्हाला तोंड दाखविले आता त्याला उद्या कसे न्यायचे  याचा विचार नाहीतर दोन दिवसात तुमची मोटार पाण्यात बुडणार. ह्या लोकांना ज्याला हाताळता आले तो जगातील कुठल्याही माणसाला हाताळू शकतो. इतके volatile material कि क्षण्क्षणात बदलणार, छोट्या गोष्टींवरून जन्मभराच्या गाठी मारणार. जितके वांड तितकेच प्रेमळ. खोडकर, अशा खोड्या काढतील कि कारण नसताना तुम्हाला चकरा मारवतील. सामान आणायला लोहारयाला पाठवतील, न लागणारे सामान मागवतील. तुम्ही उन्हा तान्हात थकून येईल तितक्यात दुसरीकडे पळून जातील.

थारा पाव दखा महारा बाप, पाय पडलेवू म थारा पण वा म्हारी मोटार नकाल. वा डूब गई त म थारो काई उपट लेवू

त्याच्यापुढे संपूर्ण शरणागती आणि त्याच वेळी दाखवलेला राग काम करायचा. किंवा दुसरा मार्ग म्हणजे त्याला कुठल्याच गोष्टीला नाही म्हणायचे नाही. पैसे मागितले तरी कामाबद्दल बोलायचे नाही, काम केले नाही तरी काही नाही. २-३ दिवसात तो स्वत: येवून काम करून जाणार. त्याच्या मागे फिरले तर फिरवणार. इतके इमानदार कि तिजोरीच्या चाब्या यांच्याकडे सोपवून गेले तरी काही टेन्शन नाही. जीवना विषयी इतके निरासक्त कि फक्त संध्याकाळची सोय असावी. मनकवडे तर इतके संवेदनशील कि तुमच्या डोक्यातील विचार वाचून सांगतील.  ते वेगळेच बेने होते. रात्री-बेरात्री अडचणीच्या जागांमध्ये असलेले स्टार्टरचे खांब, मोटारीचे, पडक्या विहिरींचे माती धसलेल्या जागांचे , जमिनीत करंट उतरलेल्या प्रसंगी हे असे फिरायचे कि काही वेगळे नाही. साप मारणे यांना मुंगी मारण्या सारखे,

“आर बाबा व्हान जनावर बठेल हो, एक धीस्मिस म गंडरायो सालाकू म्हणजे आपण काई घाबरा कि काई ? एक न एक दन जानोच है , वा लाईट दाखा नीट, साळी मन पेल है आन थकू चढ गयी कि काई?

सगळ्या गावाची माहिती असे त्यांना, दाखवत नसत. इतके गुणी बाळ पण अवगुनीच जास्त. एकेक करून दारू पिवून गेली ह्या मित्रांना. त्यांची गोजिरवाणी मुले, लागली देशो धडीला. त्यांच्या आठवणी बेचैन करतात, डोळे भरून येतात. हे सगळे ज्या अज्ञानाच्या अंध:कारापाई झाले त्याचे मी ज्ञानाने समूळ उच्चाटन करेन, त्यासाठीच तर लिहितोय. दिवसाच्या लाईन चे काही खरे नाही, आजही गावातील बरेच जण आकडे टाकतात त्यावर मग शेगड्या चालायच्या. बहुतेक ज्यांचे मीटर आहेत, त्यांनी ते बंद करून ठेवलेले असतात. शेगड्या,गिझर,वातानुकुलीत यंत्रणा राबव वीजबिल १५० च्या वर येणार नाही. मात्र भरणा करण्यासाठी रात्रीच जावे लागेल. रात्री प्रत्येक शेतात कोणीतरी असेल, जागा असला तर ठीक नाहीतर फुटबारे (पाणी सोडून द्यायचे उताराच्या दिशेने आणि घरी येवून झोपायचे मोटर जळली तर शेतकार्याची). जेंव्हा भोवती कर्जाचे फास दिसतात तेंव्हा झोप लागत नाही. इतर जातात मग आपणही जावे. सगळा प्राण शेतात असतो, माल आज काय तर उद्या काय दिसतो, कालोटीवर आलेली पिके, तरतरीत जोमदार पिके बघण्यासारखे सुख नाही. हाडाच्या शेतकर्याला कळते त्यांची भाषा. नियंता आपल्या हाताने निर्मिती घडवून आणतो.

                    जसे महिने उन्हाळ्या कडे सरकतात तसतसे नदीचे,विहिरीचे पाणी आटायला सुरवात होते. नदी शेवाळते, म्हशी त्यातही मजा करतात. ढोरकयांना त्या पाण्यातही कधी गुम्ड्या झालेल्या पहिल्या नाही. नागिणीची फोकी मारल्याशिवाय म्हैस हि कधी त्या पाण्यातून उठली नाही. आताशा संडासला जाणार्या व्यतिरिक्त कोणी नदीकडे फिरकत नसे. विहिरीचे पाणीही २-३ तासात आटून जाई. मग ती रिती विहीर पाण्याने परत भरायला एक रात्र आणि एक दिवस लागे अशावेळी आम्ही लावलेली केळी वाचवायचा प्रश्न दत्त म्हणून पुढे उभा ठाकला. गावात प्यायला पाणी नाही आनि मोठ्या दादाने ९५०० केळीची खोडे लावलेली. ते हिरवे पिक बघून काळीज तुटायचे, मग ठरविले कि केळी जगवायचीच! ठिबक सिंचनाचे सेट बसविलेले होतेच. आता प्रश्न पाण्याचा, विहिरीत तर इनमिन २ तास पंप चालू शकेल इतकेच  मग शेजारी शेतकर्यांना विनंती केली, त्यांच्या विहिरीत ८ दिवसांनतर पाणी आयचे, त्यामुळे त्या रित्या पडलेल्या होत्या. सगळी शेते आधीच ट्रक्टर ने नांगरलेली. त्यामुळे त्या विहिरींचा त्यांना काही उपयोग नाही. रोज सकाळी ५ ला उठून शेतावर जायचे, हस्ती स्प्रिंकलर चे ९०-१०० पाईप डोक्यावर एकेक करून आपली विहीर ते शेजार्याची विहिर असे पसरवायचे. त्यांचा हिशोब ठेवायचा. काही पाईप जुने, गळके, काहींचे रबरी व्हायसार गेलेले. नांगरलेल्या शेत हे उद्योग सकाळी ५ ते दुपार होई पर्यंत चालायचे. ऊन ४७ डिग्री च्या पुढे, शेतात कामाला मजूर मिळत नसे किंवा मिनतवारीने आला तरी पारख पर्यंत काम करण्याच्या बोलीवर येवून पळून जात असे. मग एकेक पाईप ओढून, ताणून जोडायचा त्याच्या जॉईट वर पाणी गळू नये म्हणून सुतल्या, कापड, कचकड्याच्या पिशव्या, सायकलच्या ट्यूब चे रबर बांधायचे. असे करता करता दुपार व्हायची मग मोटार चालू करून पहायची. त्या मोटारींच्या फ्लान्झा कमकुवत असल्यामुळे त्यांचे फुटबाल पाणी सोडून देत असे. मग फुटक्या लोखंडी बादलीने विहिरीतून पाणी काढायचे, वरती येत येत ती अर्धी होत असे, तिच्यात आधीच गोळा करून ठेवलेला शेन चिवडून चिवडून टाकायचा एक घट्ट मिश्रण तय्यार झाले कि ते पाईप मध्ये पहिले ओतायचे, त्यानंतर पटापट ३-४ बादल्या पाणी सपसप काढून त्या पाईप मध्ये ओतायचे. तो पाईप आडवा असणार आणि तुमच्याकडे फनेल नसणार मग एक हाताने चंबू करायचा एक हाताने बादली पकडायची अर्धे पाणी पाईप मध्ये अर्धे पाणी जमिनीत. तापलेल्या लोखंडी पाईप चे चटके पण ओठांवर हसू, सूर्याकडे बघून इच्कायचे. ओ तूनही मायना ताप रे तू बाटोड, आमले नाही फरक पडस. हे पाणी भरून पाईप मध्ये टाकले कि धावत पळत मोटारीच्या उघड्या स्टार्टर ला तुर्खातीच्या काडीने टोचायचे. हात शेणाने, पाण्याने भरलेले असत. मग तो वाजला तर बरे नाहीतर टाकलेली मेहनत त्या कमजोर फ्लान्झ मधून गळून जायची. “एकी मैया कू इकी त” फुटबाल काढणा पडेन बहुतेक, दुपार डोक्यावर आणि निर्णय घ्यायचा. हे फुटबाल इतक्या खोलवरून काढणे म्हणजे ३-४ माणसांचे काम, त्यापेक्षा आणखी एक प्रयत्न करून बघू , परत तीच प्रोसेस “येरे माझ्या मागल्या...” जर पाईप जड झाला आणि विशिष्ट आवाज आला तर आभाळ ठेंगणे होत असे. २-३ वेळा उलट्या करून मग मोटार शुद्ध पाणी फेकत असे, हे सगळे लाईन असली तर. शुद्ध पाणी थोडावेळ चालू करून कुंडी भरायची न जाणे परत त्या फुटबाल ने आई घातली तर ? विहिरीतून पाणी काढण्यापेक्षा कुंडीतून टाकणे सोपे पडायचे. ५ मिनटात कुंडी भरली कि मोटार बंद करायची. प्रत्येक विहिरीपाशी कुंडी असेलच याची काय शाश्वती? मोटारीचा पाईप आपल्या अंथरलेल्या पाईप लाईन ला जोडून परत मोटार सुरु करायची, ह्यावेळेला पाईप मध्ये पाणी असल्याने ती पटकन पाणी फेकायची. अर्धे ओले अर्धे कोरडे पाय घेवून पळतच पाईप लाईन चेक करत पाण्याबरोबर धावायचे, झुन्झायचे. पायात त्यावेळी धनगरी बूट असत. त्या बुटांचा पाय कितीही मोठ्या ढेकला वर पडला तर काही प्रोब्लेम नाही. मैदानावर शर्यतीत धावणाऱ्या धावपटू सारखे मला त्या नांगरलेल्या शेतात धावता यायचे. पोटर्या काम्बिसारख्या कडक झाल्या होत्या. फुटलेली पाईप लाईन On the fly दुरुस्त करायची ओढून, ताणून, पाचर ठोकून.  आणि मुक्कामाच्या विहिरी पर्यंत यायचे. त्यात पडणारे पाणी पाहून ओठांवर एक जिगर बाज हसू यायचे, आणून दाखविण ९००० केळी तुमच्या जिद्दीवर. सीताई धावपळ बघायची, हसायची तिचा चेहरा पहिला उन्हाचे चांदणे व्हायचे. आता चालू दया ती मोटार बंद करू नका, जितक्या वेळ चालेल तितकी. लाईन हाय तो पर्यंत चालू दया. पण त्या कयुमची विहीर आटणार नाही न ? जिथून पाणी उचलतो आहे ती विहिरीतले पाणी संपले तर मोटार जळायची भीती, एव्हाना पोटात भुकेचा आगडोंब उसळलेला असे. तुम्ही जा पुढे मी येते हि मोटर बंद करून. तिला एकटे सोडून यायला जीवावर येई. भर दुपारी शेतातून चालत घरी यावे, उन्हाच्या झळ डोळे चिरत असत. कान गरम होत डोके गरम होई. बागायतदार रुमाल डोक्याला आणि कानाला बांधून निघावे लागे. रस्त्यात, गावात चीट पाखरू हि नसे, american cow boys चा उन्हाळा बहुतेक म्हणून मला आवडत असावा. घरी सगळे उताणे झोपलेले असत, आम्ही त्यांच्या भाषेत मूर्ख होतो.  “आले कामदार” बेमुर्वत, निर्लज्ज, कोडग्या आणि लाचार तोंडातून निघालेल्या शब्दांची गोळी काळीज पोखरून जाई तिला समता भावाने गिळून, हाताने वाढून घ्यायचे आणि जेवायचे. जेवण संपे पर्यंत सीताई पोहोचलेली असे. चांगली चालली लाईन तासभर. दुपारचे दोन वाजलेले असे. एवढे पाणी ९००० केळीला ठीबक वर सुद्धा फार तर ४ तासासाठी पुरेल. म्हणजे दुपारून आणखी एक विहीर हुडकावी लागेल. सकाळची सारी उस्तवार एक ते दीड तास दुसर्याच्या विहिरीत महिनाभर पूर्वी साचलेले पाणी उपसून आपल्या विहिरीत टाकण्यासाठी होती.

सीताई म्हणायची  “थोडे झोपून घ्या भाऊ, उन उतरले कि जाऊ” जमिनीवर पडल्या बरोबर मी घोरत असे २-४ तासाची झोप झाली कि परत शेतावर जावून दुसर्या विहिरीचे पाणी आणण्यासाठी तेच उद्योग परत करायचे. परत ११० पाईप बिछ्वायचे, परत शेनपानी, परत नांगरलेल्या शेतावरून धावणे. दुपारच्या वेळेला अंथरतांना हे पाईप इतके चटके देत कि विचारू नका. ४७ डिग्री चे पाईप चे पाणी उचलतांना पायावर पडले कि चटके बसत. सूर्य देवा बद्दल एक खूपच खोवर नाते होते, त्याचा राग नाही यायचा. आजून ताप बघू तू जास्त कि मी ! जेंव्हा उन असते सावलीला तेंवा मी कशाला शोधू सावली त्या पान गाळलेल्या झाडांमध्ये ? उन्हात कविता फुलायच्या. “दुक्खानो दया धीर असा कि करून मुजरा म्हणेल ईश्वर, तुझे दुक्ख शाश्वत माझे देवत्व क्षणभंगुर”   

ओठांवर गाणी असायची इतरांना ओळखू येणार नाही इतके tanning  झाले होते. पायजमा, धनगरी बूट आणि बागायतदार रुमाल. इतकी आग होती आत कि मी स्वत:ला कर्णच समजत असे. मृत्यंजय वाचल्याचा परिणाम दुसरे काय ! दुसरी विहिरीला पाईप टाकून मोटार चालू करता करता संध्याकाळ होई. मावळतीचा सूर्य छीपी वाल्याच्या विहिरीवरून बघतांना आजचा दिवस सत्कारणी लागल्याचे समाधान असे. विहिरीत पाणी पडे त्याच्या आवाजाची आणि संध्याकाळच्या हवेची एक लय होती. आभाळ किती तरी रंगांची उधळण करी. सगळे मनात असते उन म्हटले तर उन सावली म्हटली तर सावली. बूट काढून तळवे बघावे तर सुत्तळ पायाला चिटकलेले असे. धनगरी बुटाने २ महिने साथ दिली, देवाने त्याला धनगरा मार्फत त्यासाठीच पाठविले होते. माझ्या सोबत कधी आलटून पालटून राजू किंवा लखन असे. रात्री उशिरा पर्यंत थांबून दुसरी विहिर आटवून आपली छीपी वाल्याची विहीर भरायची. दुसरी विहिरीचे पाणी आटले कि अंधारात ती मोटार बंद करायची, बांधावर आर्ण्याची आणि बाभल्या ची दाटी असे. सापाची खूप भीती वाटे. पाणी थोडे सेटल झाले कि ४५०० केली साठी लागणारा एक फाटा खोलून ठिबक ची मोटार चालू करायची आणि रात्री ८:०० पर्यंत घरी पोहोचायचे. जेवण करायचे आणि गच्चीवर मिळेल तिकडे अंग टाकायचे. लोकांना जेंव्हा संध्याकाळची हवा लु वाटे तिथे मस्त डाराडूर झोपायचे, सीताई ११:३० ला रात्री उठवायची. आंतर्मानातून हाक यायची भाऊ उठता न कि त्या राजुले सांगू, चाबी स्टार्ट ट्रक्टर सारखा मी टुणकन उडी मारून उठायचो. राजू एक पारख भर काम करायचा परिणामी तो संध्याकाळी जागा असायचा  तो किंवा लखन परत कंदील किंवा चार्ज ब्यातरी घेवून आम्ही निघायचो शेताकडे जायला. सेल ची ब्यातरी चांगली असते पण तितके पैसे नसत मसाल्यासाठी (सेल साठी). कंदील, काठी, ओढलेली लुंगी असे निघायचे. अंधारापेक्षा सापांची भीती वाटायची. रस्त्याने कुणीही नसायचे अशावेळी. अर्धवट झोपेत, दिवसभरच्या श्रमाने थकलेल्या आणि  मरगळ लेल्या मनाने मोठ्या अनिच्छेने निघायचे. रस्त्यात एक आंब्याचे जुने झाड लागायचे. लहानपणापासून ऐकलेल्या भुतांच्या स्टोर्या नेमक्या तिथेच  आठवायच्या. तिथे अंधार गडद असे आणि एखादे घुबड पहार्यावर असे. बारके सारके साप कितीवेळा पायाखाली येत येत राहून जायचे. चार्ज वाल्या ब्याटरी नेमक्या अशावेळी लूज कनेक्शन मुले बंद पडायच्या. किंवा अचानक त्या डीम व्हायच्या. हवेने कंदील विझत, गडद काळोखात कसेतरी शेतावर पोहोचायचे. लाईट दिसला कि हायसे वाटायचे. लाईन आहे किंवा नाही याचा तो पुरावा म्हणून लाईट लावलेला होता. लाईन असली म्हणजे आपली मोटर चालू असायला पाहिजे. अशा अंधारात केळीत शिरून मध्यभागी चा व्हाल्व बदलावा लागायचा. ठिबक ने अर्धी केली ओलाव्लेली असे आता उर्वरित ४५०० खोडे ओलिताखाली आणण्यासाठी हा व्हाल्व स्व:त येवून फिरवावा लागे. मजूर बारक्या सारक्या कामासाठी दिवसा कदाचित भेटू शकतील पण रात्री अपरात्री शेतावर कोण जाईल ? त्यातल्या त्यात खेड्यात भुते जरा जास्तच असतात.  ओल्या जमिनीमुळे केळीत थंडावा असतो त्या आश्रयाने बरेच सर्प मुक्त फिरतात. नागमनीच्या गोष्टी आठवत पण कधी दिसला नाही. बरोबर १२ वाजता, बिना पैजेचे आम्ही केळीच्या मध्यभागी असू. फाटा बदलविणे असे ह्या कामाचे नाव होते. त्यानंतर विहिरीत ब्याटरी मारून अंदाज यायचा कि सकाळ पर्यंत भरणा झाला तर आपण हे केळी वाळण्या पासून वाचवू शकतो. दिवसा मग झडपा लावायचे काम असे, केळीत गरम हवेने झाडे कोमेजू नये म्हणून बाहेरून गवताच्या किंवा तुर्खातीच्या झापड्या लावायचा, गाजर गवत ई. लावून तिचे संरक्षण करावे लागे. गावात जेंव्हा प्यायच्या पाण्याचे हाल होते तेंव्हा आम्ही जिद्दीने ९००० केळी आणली.  त्या केळीच्या जीवावर ठिबक आणि ट्रक्टर चे घेतलेलं कर्जाचे पाश ढिले केले. पुढे ४-५ वर्ष लागले त्या कर्जातून बाहेर निघता निघता... या कामाने एक आत्मविश्वास दिला कि कुठलाही अनुभव नसला तरी हरकत नाही मनात जिद्द आणि हाडात मेहनत पाहिजे. अशक्य काही नाही. हसणाऱ्यांची तोंडे आम्ही आमच्या कर्तुत्वाने बंद केली. असे २ महिने चालले, पाउसाने उशीर केला आमचे हाल जास्तच बेहाल झाले. संपूर्ण यश आले नाही पण कुठे तरी, काही तरी प्रमाणात “आपुन नाही तो कौन ?” हा विश्वास प्रबळ झाला.

Comments

Popular posts from this blog

चिलयपाटी

नदी

मसनखडी आणि चुनीलाल गवळी

देवमाणूस

नाना

एसटी

नांगरणी

मराठी मुलांची शाळा, कासमपुरे

मनोगत

ओळख