देवमाणूस


देवमाणूस




खूप दिवसापासून हे मनात होते की ह्या देव मानसाबद्दल चार शब्द लिहावे, मला सांगायचे होते की मा‍झ्या जीवन प्रवासात मला एक देव माणूस भेटला आहे आणि त्यांचे अतोनात उपकार आहे समाज मनावर, नव्या पिढीला त्यांच्या कार्याची तोंड ओळख देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न!

जिथे मस्तक टेकावेसे वाटावे असे पाय भेटण्याचे पण भाग्य लागते, मला ते लाभले आणि त्यांच्या बद्दल मला खूप दिवसापासून लिहायचे होते. आमचे बापु डॉ. करतारसिंग परदेशी, 1984 चे एमएस, मला बापू त्यांचे लग्न झाले ताई सोबत तेंव्हा पासून आठवतात. आम्ही 4-5 वी त होतो तेंव्हा, मोठ्या भावाने लग्नात त्यांची कट्यार मारली, त्याने टोपाझ च्या ब्लेडने कटयारीचा पट्टा कापला, कट्यार वाचवायच्या नादात भाऊचा ब्लेड त्यांच्या बोटाला लागला, रक्ताने हात माखला पण चेहर्‍या वर तेच मिष्कील हसू, वर्‍हाडी मंडळी आरडा ओरडा करत होती, फटके बसले असते पण बापुनी वाचविले ! बापुनी जीवनात खूप ठिकाणी वाचविले तो मात्र लक्षात राहिलेला पहिला प्रसंग. बहीण भाच्या मुळे वेळोवेळी त्यांच्या भेटी होत राहिल्या आणि त्यांचे व्यक्तिमत्व जवळून पाहण्यात आले. एक आदरयुक्त भीती नेहमीच असते त्यांच्या बद्दल. बापूंचा जन माणसातील वावर असाधारण आहे. त्यांना दैवी देणगी आहे समोरच्या च्या डोळ्यातील अडचणी वाचायची, मुळात त्यांना काहीतरी कळते आणि ते समोरच्याची वेदना त्याच्या डोळ्यात वाचतात. त्यांच्या, लहान मुलासारख्या स्वभावाचा हेवा वाटतो, अगदी निरागस असते सगळे, लोक स्वत:हून त्यांना आपले मानतात आणि सगळ्या व्यथा सांगतात. देवच आहे तो जमिनीवरचा. त्यांची ओळख करावी तर काही वेगवेगळे प्रसंग आहेत सांगायला...

एकदा मी पाचोरा हून बसने निघालो चाळीसगांव जाण्यासाठी, लालपरि नेहमी सारखी खच्चून भरलेली होती मला जागा मिळाली, बाजूला एक 5-6 वर्षाचा मुलगा होता आणि तो डोळ्या ने मला ओळख देत होता. मी सहज विचारले कितवित जातो, कुठे जात आहे वगैरे. संभाषणात कळले की ते मालेगाव जात आहेत, मुस्लिम कुटुंब होते त्याचे वडील ही संभाषणात भाग घेऊ लागले, ओळख निघाली की त्यांच्या एका मुलाचा पाय बापुनी दुरूस्त केला होता. त्याच्या शब्दांत, ओ तो भगवान है, अल्ला उन्हे लंबी उम्र दे ! तिथल्या तिथे त्याची सहज प्रार्थना मनाला स्पर्शून गेली.

     मला किमान 3-४ वेळा तरी हा अनुभव आलेला आहे. कुणाची आई, कुणाचा भाऊ बापुनी बरा केलेला असतो आणि ती ओळख पट‍वताना त्यांच्या डोळ्यात एक कृतज्ञतेची चमक असते, सार्वजनिक जीवनात इतके असाधारण योगदान कुणाचे नसेल. त्यांना खूप जन ओळखतात. चाळीसगांव ला अगदी कुठल्याही दुकानावर मी एक ट्रिक वापरतो, इतकेच सांगतो की मी बापुनच्या घरी हे सामान नेत आहे आणि मला आपोआप योग्य माल आणि भाव मिळतो घासाघिस करावी लागत नाही. आदर मिळतो तो वेगळा ! आपल्या व्यवसायाने लोक आणि परलोक सुधारणारा इतका मॉडर्न संत अजून तरी मी पाहीला नाही. नदी, वृक्ष, संत, परोपकार साठी असतात हे वाचून होतो, बापु सोबत अनुभवलं. वयाच्या 75 वी त रोज 150-200 जणांना तपासणे, विचारपूस करणे, ट्रीटमेंट करणे आणि त्यांच्या अडचणी सोडविणे आणि आवश्यकते अनुसार घरून डबा, मोफत औषधी देणे आणि काहीना तर चक्क भाड्याला सुद्धा पैसे बापुच देऊ शकतात. देव माणूस हा फार छोटा शब्द आहे त्यांच्या कार्याचा आवाका घेण्यासाठी. बापु माणसांवर नि:स्वार्थी प्रेम करतात, त्यांना सगळी खबर असते आणि समोरचा पैसे बुडविणार आहे हे सुद्धा माहीत असते तरी ते फसतात, पाऊस नाही का माळराना वर पण असाच पडतो, त्याच्या ठिकाणी कुठे भेदभाव असतो. डॉक्टर हा व्यवसाय, पण अडलेल्या व्यक्तिस मदत करणे हाच त्यांचा खरा धर्म आहे. त्यांच्या कडे येणारे पेशंट हे मजूर वर्गातील, आर्थिक विवंचनेत असणारे असतात, कुणी विहिर खोदत असताना पडलेला असतो, पायाची माती तशीच असते, कुणाला बैलाने उपटलेले असते, भाड्या पुरते पैसे जमवून आलेले असतात, अंगावरचे कपडे मळलेले असतात. कुणी विडी ओढतो, कुणी तंबाखू खातो सगळ्या गुण दोषा संहित बापू त्याना स्वीकारतात, समजवितात. कुणी मारामारी करून आलेले असतात, कुणाला पोलिस सोडून जातात, कन्नड घाटात अपघातात सापडलेले परगाव चे असतात. बापूना कधीही भेटायला गेले तर ते opd त असतात. त्यांना खूप बोलायचे असते, पण खोळंबलेले पेशंट बघून आपल्याला अवघडल्या सारखे होते. ते अॅक्सिडेंट हॉस्पिटल म्हणजे मानवतेचे मंदिर आहे आणि आश्रय आहे किती तरी जीवांचा.

त्यांचे तरुण वर्गावर बारीक लक्ष असते, बस स्टँड च्या टपरीवर टाइम पास करणारे सगळे लोकल भाई बापूना येतांना बघून सिगरेट, गुटख्याच्या पुड्या फेकतील किंवा लपायला जागा शोधतील, भांडण सोडविणे हा त्यांचा एक गुण आहे. समाजाच्या मीटिंग मध्ये बापू तेच तर करतात, बापू मन जोडतात, बापूना प्रत्येक लग्नात, मौत, बारसे, वास्तु शांती जावेच लागते, ग्राम पंचायत, सोसायटी चे बिनविरोध इलेक्शन बापूच करतात. बापूना नाही म्हणणे खूप जड जाते, अशा देव माणसाला कोण नाही म्हणणार ? झोप लागत नाही, अंतरात्मा धिक्कारतो ! समाजाची बरीच गावे स्वभावा प्रमाणे दोन तटा मध्ये विभागलेली असतात, त्यांच्या हाणामारी, कोर्ट कचेरी, शेता-बांधाची, भाऊ-बंदकीची भांडण ! सगळे बापुनकडे सुटतात. त्यांच्या विविध पैलूवर प्रकाश टाकण्यासाठी हा लेख प्रपंच.
बापुनचा जन्म (पळसखेड्याचा ?) त्यांची आई जानकाबाई उंच, रुबाबदार आणि कर्तबगार व्यक्तिमत्व होती त्या स्वभावाने मायाळू होत्या, जन माणसावर प्रेम करायची अशी मायेची साधी माणसे होती ती. बापूंचे शेती कम शिक्षण 7 वी पर्यन्त वाडे, नंतर त्यांच्या गावातील बरेच जन धुळे इथे होते, त्यांच्या सोबत धुळे, नंतर अमळनेर आणि मग पुणे असे पुढे सरकले. बापूना खूप लोकानी मदत केली असे त्यांच्या बोलण्यातूनच कळते आणि बापुनी तोच मदतीचा आणि लोक कल्याणाचा वसा पुढे चालविला. त्या पिढीचे अंतर्मन सुदृढ होते. बापुनी जीवन संघर्ष पहिला, एक वर्ष शिक्षण सोडून शेती केली, एक वर्ष जातीच्या दाखल्या विषयी च्या अन्यायाला तोंड देत सकल परदेशी समाजाचा VJNT चा मार्ग मोकळा केला, पुण्यात ससून आणि संचेती असा प्रवास. त्या काळी VJNT च्या सीट रिकाम्या राहायच्या, आपला हक्क शासनाशी भांडून मिळविणारे बापू आपल्या समाजा साठी “बाबासाहेबच” आहेत. पुणे येथील संचेती हॉस्पिटल चा कारभार सांभाळणारे बापू मोठ्या सरांचे (डॉ संचेतीचे) लाडके होते. बापुनच्या भाषेत म्हणायचे तर ते काही फार ब्राइट स्टुडेंट नव्हते पण कष्टाळू होते. कुठल्याही कामाला त्यांनी कधी नाही म्हटले नाही, अपंगांसाठी त्यांनी नवा वॉर्ड सुरू केला, संचेती सर त्या काळातील आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व आणि बापू त्यांचे विश्वासू शिष्य होते. त्यांचे सहकारी डॉ अजित दामले, डॉ बलदेव बिघाणे, डॉ राजीव अरोरा, डॉ इलेक्ट्रिकवाला (पोलिओ वॉर्ड) यांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

आमच्या ताई आणि बापुनच्या पत्नी डॉ. सुशीला ताई ह्या काळात शिक्षण घेत होत्या, नवीन भागातील गोखले नगर चा त्यांचा संसार, चि. गौरव चा जन्म, तुटपुंजा पगार आणि संसाराची जबाबदारी. 48 तासाच्या शिफ्ट मधून बाळाला पाजण्यासाठी जेवणाच्या सुट्टीत ताईचे चालत घरी येणे, असे सर्व सामान्याच्या वाटेचे संघर्ष त्यांनी सोसले आहेत म्हणूनच त्यांना असामान्य होता आले. बापुनच्या सासूबाई गं. भा. सिताबाई परदेशी, कासमपुरा यांचे ह्या संघर्षात खूप मोठे योगदान आहे. डॉ गौरव च्या जडण घडणीत त्यांचा मोठा प्रभाव आहे. सीता आई ही विपासनेत तापलेली साध्वी आहे, त्यांचे सगळ्यांच्याच आयुष्यात योगदान आहे. आमच्या सगळ्यांच्या जीवनात जे काही चांगले आहे त्यावर त्यांचा प्रभाव आहे.

संचेतीत हवे तसे स्वातंत्र्य होते, काम होते, आदर होता पण बापूना गावाची गोडी, त्यांना देवाला वेगळे घडवायचे होते ते गावी परत आले आणि समाज कार्याचे काम करू लागले. भाड्याच्या इमारतीत एका मजल्यावर अॅक्सिडेंट हॉस्पिटल सुरू झाले. पैसे नव्हतेच मुळात, अनंत अडचणी, कौटुंबिक जबाबदारी, भावा बहिणच्या मुलांचे शिक्षण, नोकऱ्या, लग्न, आजारपण.. पण बापू कुटुंबा पलीकडचे होते. फार लवकर त्यांनी सामान्य जबाबदाऱ्या पार पाडून मोठ्या जबाबदाऱ्या उचलायला सुरवात केली. चाळीसगांव ला मेडिकल हब करणारी ही पिढी होती बापू पहिले ortho, ताई पहिली anaesthesia ची ही जोडी, अनंत अडचणी सोसून जन कल्याणाचे काम करत होती. त्यांना यात डॉ नरेश देशमुख, डॉ मधू निकुंभ, डॉ सुभाष निकुंभ यांची मैत्री आणि सहकार्य लाभले. बापुनी रोटरी क्लब तर्फे अपंगांसाठी बरीच कॅम्पस आयोजित केलीत, ह्या सगळ्या व्यापात त्यांनी समाजासाठी परदेशी बोर्डिंग चे पुनर्जीवन केले. तिला कागदोपत्री आणली, संस्था स्थापना केली. बापुनी परदेशी बोर्डिंग वाचविली, वाढविली! जुन्या काळी (१९५०), समाजाची मुले चाळीसगावी बोर्डिंग मध्ये राहून शिक्षण घेत, त्या संस्थेची एक वेगळी परंपरा आहे, नामांकित विद्यार्थी तिथून घडले. आमचे मावसा स्टेशन मास्टर जामनेर हे त्यातीलच एक. त्यांच्या तोंडून ऐकले होते बोर्डिंग बद्दल, काळाप्रमाणे गरजा बदलल्या, लोक खोल्या करून राहू लागले आणि बोर्डिंग ची गरज कमी झाली, पण त्या बोर्डिंग ला सहकारातील भ्रष्टाचारा पासून बापुनी वाचविले आणि वाढविले. गावो गाव समाजात फिरून तिच्यासाठी निधी उभारला, त्यातले ५०% पैसे तर बापूंचेच असतील. त्याचा काही हिशोब नाही. पैसे आणि बापूंचे गमतीशीर नाते आहेत, पैसे देताना ते हिशोब ठेवीत नाहीत आणि निसर्ग त्या बदल्यात त्यांना बेहिशोबी प्रेम देतो. नगराध्यक्ष अनिल दादा सोबत ची मैत्री, स्वातंत्र्य सैनिक डॉ न. र. चव्हाण संस्थापक राष्ट्रीय विद्या प्रसारक यांचा स्नेह, अशा समाज कार्याला वाहिलेल्या व्यक्तिमत्वाने मग राजकारणात ठसा उमटविला नाही तरच नवल ! बापू विविध नामांकित शैक्षणिक संस्था (राष्ट्रीय शिक्षण प्रसारक, चाळीसगांव, महात्मा गांधी विद्या प्रसारक, कजगाव), बेलगंगा कारखाना, परदेशी बोर्डिंग, वाडे फ्रूट सोसायटी, ग्राम पंचायत आणि जिल्हा परिषद सदस्य अशी पदे सांभाळून बाजूला झाले, अडकले नाही कुठेच, त्यातच त्यांचे मोठे पण आहे.

शिक्षणाचे महत्व त्यांच्या इतके कुणी अनुभवले नसेल, बालपणी वडिलांसोबत बैल गाडीने, गाडी भाड्यासाठी वाडे ते पुणे मार्केट यार्ड असा गाडी बैलाचा प्रवास ज्या लहान मुलाने अनुभवला आहे त्याने किती अडचणी पाहील्या असतील ही कल्पनाच केलेली बरे. वडील वारले आणि त्यांना वाचविण्यासाठी काही करता आले नाही ही जखम खोल वर गेली. आईने जबाबदाऱ्या पेलायला शिकविले आणि घरच्या पुरते बापू नाही राहिले, ते समाजाचे झाले, सगळ्यांचे झाले. कुणीही उठावे आणि बापूना अडचणी सांगाव्यात, शिक्षणाच्या अडचणी तर त्यांनी इतक्या लोकांच्या सोडविल्या आहेत की मी गंमतीने त्यांना सांगतो बापू तुम्ही किती तरी माणसांची झाडे जगविले आहेत नाहीतर ती सगळी विखरून गेली असती जीवनाच्या वादळात. समाजात तर गणती नाही इतक्या, पण बाहेरच्या राज्यातील एका मुलीचे संपूर्ण इंजीनियरिंग चे शिक्षण बापुनी केले आणि तिच्या लग्नाला पण जाऊन आले. मी पण त्यानीच वणव्यातून वाचविलेले एक झाड आहे !

बापु रागवतात तेंव्हा हसू येते ! दारू पिऊन लग्नात बॅन्ड समोर नाचणारे जेंव्हा लग्नाचा मुहूर्त टाळायला लागतात तेंव्हा घोड्या संहित नवरदेवाला मंडपात बापू 2 च मिनिटांत नेतात. नवरीचा बाप कृतज्ञतेने पाहत असतो. दारुड्या मंडळी चा नाईलाज होतो, पण ते बापूंचे एकतात.

बापूंचे पेशंट पण एकेक नमुने असतात, त्यातून त्यांचे आजन्म मित्र तयार होतात. काही तर अशी आहेत की “तू होणगा तेरे घर का राजा, इधर तो मैच”. ती सगळी मंडळी भाग्यवान आहेत त्यांना बापुनचा सहवास लाभतो. खान चाचा, 30 वर्ष एसटी चालवून रिटायर झाला आणि मग कुठल्यातरी प्रसंगातून त्याला बापुनी सोडविले आणि तो त्यांचा झाला, कायमचाच. बापू सोबतची मानसे इतरांना कदाचित आवडत नसतील कारण ती सगळी सडेतोड आणि अॅटीट्यूड वाली आहेत, त्यांच्या कामात निपुण आहेत, प्रसंगी बापूना पण ज्ञान शिकविणारी आहेत. खान चाचा असाच, गरज पडेल तसे ड्रायव्हर कम रिसेप्शन कम अकाऊंट चे काम सांभाळू शकतो. खूप प्रेम करतात हे सगळे त्यांच्या विठ्ठला वर. मी त्यांना गंमतीने नवरत्न म्हणतो, बापू माळेतून ओवलेल्या दोऱ्यांचे काम करतात आणि ही टोकाच्या स्वभावाची मानसे एकत्र येऊन काम करतात. बापुनची स्वयंपाकीण जनाबाई अशीच, टाकून दिलेल्या तिला त्यांनी आयुष्यभर आई सारखे सांभाळले. त्यांचा मेडिकल चालविणारा नितीन, लॅब सांभाळणारा शिरीष, हॉस्पिटल साफ करणारी माऊली, मला आठविते तेंव्हा पासून हीच मंडळी आहेत. ही सगळी टिम कमालीची शांत आणि खडतर परिश्रम करणारी आहेत. त्यांचे मित्र डॉ सुभाष निकुंभ खूप फटकळ आहेत बोलायला, पण सत्य सांगतील. प्रसंगी बापूना सुद्धा कडक शब्दात बोलतील पण अनुभवाने अफलातून आहेत. ही मैत्री आजीवन आहे कॉलेज पासूनची, खूप प्रेम करतात एकमेकांवर. बापू म्हणजे आधुनिक कर्णच, त्यांनी वाटावे आणि ताईने जपून ठेवावे असे पहिल्यापासून आहे. देव पण विचार करून जोड्या बनवितो, आमची ताई त्यांना गैर फायदा घेणाऱ्यान पासून वाचविते नाही तर बापुनी सगळेच वाटून टाकले असते.

बापू जितक्या सहजतेने एसटी त (लालपरीत) चढून तिकीट काढतात आणि इतरांचे पैसे-तिकीट पुढे पास करतात, तेंव्हा हेवा वाटतो की आपल्या पिढीला हे का जमले नाही आपण का अडकून पडलो एका आभासी वलयात. लग्नात पंगतीला जावे आणि बापू बसण्यासाठी खुर्च्या आणि टेबल लावायला लागतात तेंव्हा सगळ्या गंमत बघणाऱ्यांची धावपळ होते. प्रमुख अतिथी असलेले बापू इतके साधे कसे असू शकतात ? बापू कधी-कधी कामा निमित्त त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील जुनियर मंडळींना भेटायला जातात, पण रिसेप्शन मध्ये बाकी पेशंट सारखे वाट बघत बसतात, मग कुणाला तरी cctv मध्ये दिसते, आणि तो येतो धावत. कुठेच मोठे पणाचा तोरा नाही, त्यांना प्रत्येकाच्या व्यस्त पणाची जाणीव आहे, प्रत्येकाला ते आदर भावाने वागवितात.

बापू जेव्हा काही भूतकाळातील अनुभव सांगतात तेंव्हा त्यात कसला ही उदात्तीकरण किंवा मसाला नसतो, सगळे असे सरळ असते, स्वत:चे अपयश, कमतरता नाही लपवत कधी. त्यांचा जीवनाकडे बघण्याचा एक प्रॅक्टिकल अप्रोच आहे. एकदा पुण्यात आम्हा मुलांना म्हटले तुम्हाला एकदम भारी ठिकाणी जेवायला नेतो, पार्टी देतो, आम्ही खुष कुणी ब्ल्यू डायमंड तर कुणी ली मेरीडियन चे प्लान करू लागले, रिक्शा थांबली तर बाहेर बोर्ड “आवारे मटण खानावळ” नाक मुरडत आत शिरलो, बाकावर बसून जेवायला लागले. पण जेवण कमालीचे चवदार होते आणि त्यांनी तेच प्रॉमिस केले होते. विशेष म्हणजे बापू शाकाहारी आहेत, पण बाजूला बसून मटण खाणाऱ्यांचे वावडे नाही, मानवता धर्म ज्याला कळला आहे तो फालतू अवडंबर पासून मुक्त असतो.

निसर्गाने पण बापूना भर भरून दिले. बापुनची दोघी मुले खूप गुणी आहेत, स्वकष्टाने मेरिट मध्ये पोस्ट ग्रॅजुएट डॉक्टर झालीत, कुठेच पैसे भरावे लागले नाही. डॉ गौरव मेडिकल आणि कॉम्प्युटर मध्ये कमालीचा प्रगल्भ आहे, त्याला ही गरीबा विषयी ची बापुनची आत्मीयता कळते, बदलत्या काळात जेंव्हा वैद्यकीय क्षेत्रात सागळीकडे बाजार झाला आहे, त्याला तारेवरची कसरत आहेत. जूनी तत्वे सोडता येत नाही, काळा प्रमाणे बदल नाही केला तर नष्ट होऊ ची भीती आणि आहे त्यात संवर्धन करणे, आपली जनसेवेची स्वप्ने साकार करणे, वडीलांच्या चार पाऊलं पुढे जाऊन नाव कमवावे, या मागे त्याने झोकून दिले आहे. सून बाई डॉ सारिका नामवंत रेडियोलोंगीस्ट आहेत. मुलगी डॉ स्वरदा आईच्या पावलांवर पाऊल ठेवत anaesthetist आहे, नांदेड ला, जावई डॉ प्रशांत दिल्ली aims चे न्यूरो सर्जन आहेत. नातू आरव मात्र त्यांना खूप थकवितो, तो बोलायला लागल्या पासून मेडिकल च्या क्लिष्ट टर्म्स शिकला आहे. सगळ्या हाडांची, मज्जा तंतूची नावे तो सांगतो, त्याचे क्रेडिट त्याच्या आजीला जाते.

बापूंचे वाचन खूप आहे, भारतातील, राज्यातील विविध ठिकाणा विषयी त्यांना कमालीचे ज्ञान आहे. त्यांच्या सोबत फिरताना मजा येते. इतिहास, आत्मचरित्र, सामान्य ज्ञान, आर्थिक, सामाजिक प्रश्न याबाबत त्यांना प्रचंड माहिती असते, प्रवासात कुठे मुक्काम पडला तर लिफ्टमन, वेटर, सेक्युरिटी सगळ्यांना चहा पानासाठी पैसे वाटत असतात बापू, कधी गप्पा मारतात, कॉमेडी करतात. कुणालाही आपलेसे करून टाकतात. तिथे पर राज्यातील भाषेचे बंधन आडवे येत नाही. सभोवतालच्या जीवन विषयी ची त्यांची आस्था कमालीची आहे.

मी काही लेखक नाही, मला जे भावले ते सकारात्मक मी लिहिले आहे ते सर्वांनाच आवडेल असे नाही काही दुमत असेल तर ते बापूंचे आहे, यात काही उणिवा असतील, काही उल्लेख नजर चुकीने राहिले असतील तर तो माझा दोष आहे. बापू खूप साधे आहेत, त्यांच्या घरी जाताना दारावरची बेल वाजवताना, त्यांच्या चप्पल कडे लक्ष जाते आणि एक विचार डोकावतो, वाटते ही चप्पल चोरून न्यावी आणि ठेवावी देव्हार्‍यात. असा देवमाणूस असू शकतो हे नव्या पिढीला सांगता येईल भविष्यात.


Anil Chanda Bangalore

Comments

Popular posts from this blog

चिलयपाटी

नदी

मसनखडी आणि चुनीलाल गवळी

नाना

एसटी

नांगरणी

मराठी मुलांची शाळा, कासमपुरे

मनोगत

ओळख