नाना


आमचे नाना म्हणजे चार आयींचे एकुलते एक पोर, त्यांचे नाव मल्हारी असल्यामुळे त्यांना मित्र होळकर म्हणत. मोडी लिपीत लिहायचे आणि वाचू शकायचे. वजन ३५ किलो असेल फारतर वय ६० ते ६५ च्या घरात. नानाशी माझे भांडण आणि तह ह्या दोनच पातळीवर संवाद चालत असे. मी त्यांना नेहमी एकेरीच उल्लेख करीत असे. गावात एक लायब्ररी होती, ज्याने पुस्तक नेले तो परत आणून द्यायचा नाही त्यामुळे ती बंद पडली. त्या लायब्ररीतून पुस्तक आणून वाचने हा आमचा दुवा होता. नानाचे पुस्तक मी चोरून वाचायचो त्यामुळे नानाची प्रायव्हसी डिस्टर्ब व्हायची. नानाची एक पेटी होती, त्या पेटीत सगळ्या गावाचे भूत, वर्तमान अन भविष्य बंदिस्त होते. त्या पेटीची किल्ली नेहमी त्याच्या कमरेच्या करधोडाला तो बांधून ठेवीत असे. त्याच्या २ कपाट होत्या आणि त्या सगळ्यांना दाबली कि लाक होणारी कुलुपे होती, सातवी पर्यंत मी त्यांना तारा ने उघडायला शिकून गेलो होतो. नाना राजकारणी,त्यांना खूप मान होता, सगळे त्यांना काका म्हणत. सगळ्यांची भांडणे निस्तरायला सगळ्यांना मात्र तो लागत असे. मरिओ पुझो च्या ग्वाड्फादर सारखा. त्याची इमानी माणसे होती त्यांना तो कामाला लावायचा आणि सगळ्यांची खबर ठेवायचा. त्याच्या देव्हडीत म्हणजे हॉलमध्ये नेहमी चप्पल बुटांचा खच असे. मंदिरात दिसणार नाहीत इतके. त्याच्या अवती भोवती नेहमी कोणीतरी असे आणि त्यांना पाणी आन, चहा आन हे माझ्या डोक्यावरच. काम असले कि चांदोबा नाहीतर माझ्या कानांवरून मला चिडवत असे. ५ पैसे १० पैसे देऊन तो आम्हाला काम सांगायचा नंतर आम्ही त्याच्या गल्ल्यावर डल्ला मारायला शिकलो होतो. लेमन गोळ्या, आसमान तार्याच्या गोळ्या पेटीत खाली लपून ठेवायचा, गोमाशी हा त्याचा आवडता खेळ. बेसावध बसलेल्या मुला मुलींच्या उघड्या मांसल मऊ मांडीवर चटदिशी जोराची चापटी मारून त्याचा लचका चिमटीत घेऊन कुणालाही रडवणे हे त्याचे आवडते उद्योग. त्याने गोरगरिबांवर खूप प्रेम केले असे आई म्हणते. त्याला कुणाशी भांडतांना मी पहिले नाही. त्याचे networking जबरदस्त होते. तालुक्याला, जिल्ह्याला , सरकारी दप्तरी , कोर्टात त्याची खूप वट होती. प्रचाराला येणारे पहिले त्याच्या घरीच यायचे. 
नानांची भरपूर शेती म्हणजे १५० एकर, गावाच्या १० टक्के भागात नानाची घरे (गल्लीच्या दुतर्फा त्याचीच घरे, एक टोकातून , म्हणजे घराच्या एका दारातून आत शिरले कि गल्लीच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या दारातून बाहेर पडता येत असे). येणाऱ्या पाहुण्यांना घर, शेती दाखवणे हा त्याचा आवडता छंद. येणाऱ्या, जाणार्यांना हाक मारून बोलाविणे , विचारपूस करणे, गप्पा मारणे, सतत चहा पिणे किंवा शोफ, सुपारी खाणे. नाना कामात असला म्हणजे चोपड्या लिहायचा , आणि त्याला हाक मारली कि खेकसायचा काय आहे? किंवा त्याची पेटी पटकन बंद करायचा - आम्ही पेटीचे झाकण पकडून त्याला ओढायचो. पेटी हि आमचा कुतूहलाचा विषय होता. लहान मुलांना जे नाही सांगितले तिथे ते हमखास जातात. जशे जशे त्याचे वय झाले तसे तो आम्हाला किल्ल्या देऊन त्याच्या वस्तू आणायला सांगायचा तेंवा मात्र आम्ही कधी त्याच्या वस्तूंना हात लावला नाही. जबाबदारी आपल्याला इमानदार बनवते (म्हणून चोरांच्या हातात किल्ली द्यायची, ते कधी चोरी करत नाहीत) 

नानाच्या देवढीत सगळ्यांचे फोटो होते, सगळ्या नात्यातल्या मुला मुलींचे , नातवांचे , त्याच्या आजोबा पणजोबांचे ( ते सगळे तेंवा परग्रहावरचे वाटत). आपल्याच आईला , फ्रॉक मध्ये बघितल्यावर कसे वाटते ? मामाचा बंदूक घेतलेला फोटो म्हणजे रडणाऱ्या लहान मुलाच्या हातात दिलेली बंदूक आणि रडणारा मामा. बैल जोडीचे , नानी माहेरी जातानाचे फोटो तिच्या बंदोबस्तासाठी एक हत्यारी पुरुष सोबत असायचा ३०० तोळे सोने घालणाऱ्या म्हातारीला कोण नाही उचलणार ? नानीचे माहेर म्हणजे एक वेगळी कथा आहे, आयीला बोटावर मावश्या मोजताना मी प्रत्यक्ष बघितले आहे, म्हणजे नाशिकचा त्रंबकेश्वर, वेरूळचा घृष्णेश्वर च्या थाटात ती मावश्या मोजायची , पण तिचा मामा एकच होता आणि तो ह्या सगळ्या बहिणी भाच्यांवर खूप प्रेम करायचा. नानाकडे बंदूक होती , तलवारी होत्या, तशी माणसे होती. त्याचा वापर करायची गरज त्याला कधी पडली नाही. गावावर त्याचे प्रेम होते आणि विशेष करून बौद्ध वाड्याचा तो लाडका होता. लग्न प्रसंगी त्यांची उपस्थिती विशेष असायची. त्यांचा एक मित्र होता आणि ते लोहारा गावाचे देशमुख होते. एकदा त्यांच्या बरोबर बैल गाडीने गेलो होतो, किती गप्पा मारायचे दोघे म्हातारे मला २-३ वेळा दुध पाजून झाले. दुपारचे गेलेलो आम्ही मग रात्री घरी आलो. नानाच्या बिल्डिंग वर जायला मला परवानगी लागत नसे, मुळात मी त्यांना फारसा जुमानीत नसे. जो कोणी कुलूप लावेल त्याची मास्टर कि मी बनवून टाकीत असे. दरवाजाने माझी वाट अडवली तर मी बाल्कनी चा वापर करत असे. गुपचूप जाऊन नानाला दचकवने हा माझा आवडता खेळ. मांजरीच्या चोर पावलांनी जाऊन त्यांची पुस्तके पळवणे हे माझे उद्योग. ते मला किंवा मी त्यांना कंट्रोल करू शकलो नाही. म्हणतात न जावयाचा पोर अन हरामखोर. त्याच्या नातूंना तो पुस्तकाचे कव्हर लाऊन द्यायचा मग मी पण शिकलो त्यांच्याकडूनच, आणि त्याच्या समोर बाकीच्यांना कव्हर लाऊन द्यायचो. पेपर आला म्हणजे त्याला सगळ्यात पहिले हवा असे आणि मुलांचे पान वाचल्याशिवाय मी त्याला कधी पेपर दिला नाही. पेपर लपवायचा दुष्टपणा पण मी नक्कीच केला असेल. आता शीतयुद्ध म्हटले म्हणजे त्यात सगळेच आले. 

झडीच्या दिवसात मजुराला काम नसे पण त्यामुळे कुणाची उपासमार झालेली मी पहिली नाही. झडीच्या दिवसात एकमेकांना सांभाळून घ्यायची पद्धत होती. नानाकडे नेहमी पायली / शेरभर धान्य द्यायची रीत होती. नाना घरूनच शेती करायचे, कधीतरी छकडा गाडीत बसून गेले तर बांध, बंधारे फिरून यायचे. त्यांना मजुरांनी कधी फसवले नाही. धनगरांवर ते खूप प्रेम करत. धनगर वाडा गावात आला कि ते सगळ्यांना नावानिशी ओळखत, ते पण प्रेमाने त्यांना आजा म्हणत. नाना म्हणायचे पै-पाहुणे खाऊन जातात पण हि माझी धनगर देऊन जातात.त्या वाड्यामुळे नानाची शेती खूप पिकायची, त्यांना व्यसनही नव्हते. नानाला ते जातांना धनगरी कुत्री, चामड्याचे धनगरी जोडे देऊन जात. नांदगाव कडून येणारी हि मंडळी आणि आमचे ऋणानुबंध होते. लांबची पण हक्काची अशी हि नाती होती. आता ते पण पांगले, बरच हरवील हो ह्या बाजारात. तालुक्याच्या गावाला किंवा जिल्ह्याच्या गावाला ते आठवड्यातून ३ वेळा तरी जायचे. एकदा घाईत आईची पांढरी साडी धोतर समजून नेसून गेले, सगळे कोर्ट फिरून आले, मग काय मला तर चान्सच मिळाला नानाला कमीत काढायचा. त्याने मला माझ्या आजोबा बद्दल काही चिडवले कि मी त्याला म्हणत असे कि तू तर साडी घालून सगळीकडे फिरतो, तुझी काय बरोबरी बाबा !” 
झडीच्या दिवसात, म्हणजे जेव्हा शेतात वाफ नसते (चिखलामुळे काम करता येत नाही) अशावेळी चुलीजवळ गप्पा मारायच्या, जुन्या आठवणी ताज्या व्हायच्या, शेतातील सापांच्या, नागमनीच्या सुरस कथा ऐकायला मिळत, मधेच आन्धन मिळालेल्या रेडीओ वर और सुनो बहिणो और भायीयो इस सप्ताह का पादान नंबर २ का गाना अमीन सयानी चा आवाज चेहऱ्यावर हसू फुलवीत असे ! बिनाका गीतमाला चे नंतर सिबाका झाले ! सगळे काही बदलत होते. गावात घरांचे असे एक क्लस्टर होते कि एका कुटुंबाच्या शेतीवर ४-५ कुटुंबे अवलंबून होती, तोच त्यांचा पोषण करता. धर्माचा बाप. कुणी मोठा नाही कुणी लहान नाही. लहानपणी आगावूपणा केला तर आमचे सालदार आम्हाला धमकावयाचे. ते  कानाखाली वाजवायचे म्हणून आम्ही नियमांना टिकून राहायचो. गावातील थोर माणसे म्हणजे गावाचे पैलू होते, पैलू हरवलेला गाव भोंडा वाटतो. खुजा वाटतो. घरातील मोठे माणूस मेल्यानंतर असेच वाटते नाही का ?  नाना वारले तेंव्हा त्यांची किंमत कळली नाही आज ती जाणवते “लाख मेले तरी चालतील , पण त्यांचा पोशिंदा मरायला नको” त्यांची जागा घेण्या इतपत कोणी मोठा झाला नाही त्यामुळे तो गाव पोरका झाला. बाप मेलेल्या मुलासारखा...   

Comments

  1. Sunder.... Apratim blog
    Inspired line jababdari alyavar imandar banato

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

चिलयपाटी

नदी

मसनखडी आणि चुनीलाल गवळी

देवमाणूस

एसटी

नांगरणी

मराठी मुलांची शाळा, कासमपुरे

मनोगत

ओळख