सरकारी विहीर


लोकहो १९८० मध्ये माझ्या गावात एक विहीर होती, (म्हणजे मला आठवते तेंव्हापासून, माझा जन्म १९७२ सालाचा) सरकारी विहीर ! नदीकाठी आणि बाजूला मराठी शाळा. त्या विहिरीवर सकाळी आणि संध्याकाळी सगळा गाव पाणी भरायचा, त्याला दोन बाजूने लोखंडी रहाट होते. मोठा कट्टा असल्यामुळे तिचा वापर दुपारून बसायला, गप्पा मारायला व्हायचा. बाजूलाच नदी ८-१० महिने वाहायची, परसाकडे जाणाऱ्या मित्रांची बसायची सोय म्हणजे हि विहीर (म्हणजे ज्याला लागलेली नाही तो इथे वाट पहायचा). इथून एकीकडे गाव दिसायचा आणि दुसरीकडे नदी, शाळा, शेताकडे जाणारा रस्ता. भैरोबाचा दगड आणि म्हसोबाचा दगड पण शेजारीच होते. नदीचा डोह आणि पोहणारी उनाड मुले नजरेच्या टप्प्यातच होती. उनाड मुलांना शाळेवर चीडीमारी साठी, अडल्या शेतकऱ्याला, शेतकामासाठी मजुर शोधायला  ही जागा उपयोगी पडे, तिथून एक रस्ता नदीकडे वळायचा. पाणी पिण्यासाठी आणलेली गुरे , म्हशी पाण्यात निवांत डुंबे पर्यंत ढोरके इथे बसून बिड्या फुकीत. मराठी मुलांची शाळा आणि तिचा गेट एका अंगाला आणि समोर चिले पाटीचा आखाडा (याबद्दल नंतर कधी तरी) !

तर त्या एका सरकारी विहिरीवर सगळ्या गावाचा पाणी प्रपंच चालायचा म्हणजे तश्या २-३ अजून विहिरी होत्या पण हि प्रमुख. गावात नळ नव्हते - म्हणून खड्डे नव्हते - म्हणून मोटारी आणि पाईप पण नव्हते, सगळं कसा सरळ कारभार. आंघोळ खाटेवर व्हायची म्हणून घमेलाभर पाणी खाटेखाली साठवायचे ते मग भांडी कुंडी साठी वापरले जायचे आणि नंतर तेच पाणी अंगणात सडा टाकायच्या कमी यायचे. प्रति माणशी पाण्याचा वापर हा काटकसरीने परंतु पुरेसा होता. सालदार कावड वापरून ४ खेपा करायचा त्यात सगळ्या कुटुंबाचे व्हायचे, सालदार सखाराम पाण्याला खूप जपायचा आणि त्याची आमच्यावर करडी नजर असायची, गारा-माती खेळून आम्ही पाणी सांडायचो ! गटारी नव्हत्या म्हणून मच्छर नव्हते, खड्डे खोदून सगळं सांड पाणी जमिनीत जिरायचे (ज्याला तुम्ही आज शोष खड्डे म्हणतात ते आमचे पूर्वज वापरत होते) आणि ज्या काही चाऱ्या होत्या त्या गल्ली ओलांडायच्या आधी वाळून जायच्या. गावचा शेण उचलायचा कॉन्ट्रॅक्ट एका फॅमिलीकडे असायचा म्हणजे ज्या काही जनावरांचे चालतांनाचे शेण पडायचे ते सगळे हे कुटुंब उचलून आपल्या खताच्या भुगल्यावर जमा करायचे. नंतर लिलावा नुसार वर्षाअखेर त्यांना रक्कम मिळायची. किराणा दुकान मोजून ४ आणि तिथे जातांना वायरची नाही तर सूती पिशवी न्यायची आणि सगळे सामान तो bio degradable पेपरात बांधून द्यायचा. गोडे तेलासाठी, राकेल साठी बाटली असायची आणि त्याचा वापर हा फार जपून असायचा. भात फक्त सणासुदीला आणि लग्नात पंगतीतच. लग्न वरात मराठी शाळेत ट्रक मधून किंवा ट्रॅक्टर ने यायची आणि श्रीमंत माणसांच्या लग्नाला एकादी अम्बॅसॅडर किंवा फियाट यायची. पाण्याचा वापर प्रमाणात होता आणि रासायनिक शेती नव्हती. बीजवाईचे वाण सांभाळून ठेवायचे आणि एकमेकांना फुकट द्यायचे. पडजीने एकमेकांना मदत व्हायची पेरण्यासाठी , बैल बारदाण्यासाठी. स्वयंपाकासाठी लागणारे जळण जंगलातून यायचे, आणि एका चुलीवर जी सकाळी ५ वाजता सुरु व्हायची , चहा, आंघोळीचे पाणी, दोन वेळेचा स्वयंपाक, आणि शेंगा, हरभरे सगळे भाजले जायचे. हि चूल दुपारी २ ला बंद व्हायची आणि नंतर ५ ते रात्री ११ पर्यंत विझायची. आल्या गेल्याची चहा , जेवणाचा तिने कधी कंटाळा केला नाही कारण ती अन्नपुर्णा होती. ती माय होती आणि तिच्या पदराने आपल्या परक्या मुलांचे अंग ती पुसायची. ९ वाजता मजूर शेतात न्याहारी करायचे आणि दिवसभराच्या कामाचे नियोजन व्हायचे. सूर्य मावळतीला गेला कि आठवायचे की घरच्या बकरीसाठी चारा गोळा करायचा राहूनच गेला आणि शेत मालकासोबत चालत चालत हसत खेळत घरी यायचे. दारुड्या १००० मध्ये १ होता, आणि त्याला समाजात स्थान नव्हते. योग्य आणि अयोग्य याची विवेक बुद्धी शाबूत होती.

तर त्या सरकारी विहिरीला पाणी होते , तिच्या बाजूला एक गुरं ढोरांसाठी पाणी साठवण्यासाठी बांधलेला हाळ होता. गाव तृप्त होता कारण फुकटे (राजकारणी) नव्हतेच. धान्य मळणी नंतर पहिला हक्क बारा बलुतेदारांचा होता, बामन पूजा करून त्याचा भाग न्यायचा, सुतार,चांभार,न्हावी,कुंभार, सोनार, लोहार सगळ्यांचे छोटे छोटे पोटापुरते हिस्से होते आणि शेतकरी राजा दिलदार होता कारण ज्वारी माउली हायब्रीड नव्हती. त्याला काही उणे नव्हते कारण त्याच्या गरजा कमी होत्या , तो काळ्या आईला ओरबाडत नव्हता. रानात झाडे होती , गावात झाडे होती, आमराया होत्या आणि झोका बांधायला चिंचा होत्या. वड होते, पिंपळ होते , निंब होते आणि सगळ्यांना सणावारी महत्व होते. सगळे कसे natural होते त्याला ऑरगॅनिक चा हॅश टॅग ची गरज नव्हती. खाणे शाकाहारी होते , श्रावण पाळत होते, चिकन गावरान होते आणि पै पावण्यासाठी होते, स्टिरॉइड च्या चिकन नव्हत्या आणि कोणाला डायबेटीस सारखा ऐदी रोग नव्हता, काम न करणाऱ्याला, घाम न गाळणाऱ्याला हा श्रीमंती रोग होतो. कोणाच्या घरी कोणी गप्पा मारायला जाऊ शकत होता आणि त्याच्यापुढे आग्रहाने पायलीभर शेंगांचा ढीग पडत होता. वाळके, काकड्या, शेंदाडया, कटूले गाठीला मिळत होते. ताक फुकट मिळायचे आणि त्यासाठी कोणी भांडी लपवायचा नाही. सगळे आपले होते आणि आपण सगळ्यांचे होते. सकाळी वासुदेव यायचा, डोंबारी यायचे , प्रत्येकाचा हक्क होता आणि सगळ्यांना पोटभर पुरेल इतके होते.... 
मग गावात फोन आला , black and white TV आला, अन्टेना आले त्यांनी पण काही फारसे बिघडले नाही, त्यांच्यासोबत रामायण आणि महाभारत आले आणि हळूच सौंदर्य साबण निरमाच्या जाहिराती कानी कपाळी आदळू लागल्या...काहीतरी बदलत होते पण आम्हाला कळत नव्हते आम्ही लहान होतो. लायीफबोय जाऊन लक्स, हमाम. आले अन बिटको दंतमंजन जाऊन कोलगेट आले. तुम्हारे पेस्ट मे नमक हाय ला टायीम व्हता कारण तेव्हा आम्ही नमक नेच दात घासायचो ! किराणा दुकानावर आता TV च्या वस्तूंची मागणी वाढायला लागली आणि दिलीप शेठ च्या दुकानात गर्दी वाढू लागली, तो खात्यावर पण द्यायचा. किती पण किराणा घ्या वहीत लिहून ठेवा. क्रेडीट कार्ड फार लवकर वापरायला शिकलो आम्ही कारण आमच्या गरजा त्यांनी वाढवल्या होत्या. आता आन्छां मामा मोचीचे गावात शिवलेल बूट आवडत नव्हते, Bata साठी आजोबाला शहरात घेऊन ५० रुपयाचा बूट घेतला तेंवा पहिले रक्त लागले तोंडाला बाजाराचे, आजोबाने हट्ट पुरा केला, त्याला काय माहित नातवाला ५००० चा बूट पण स्वस्त वाटेल एक दिवस? (आता त्यांनी मोचीस नावाचे रिटेल चैन सुरु केलेत बघा शहरात!) गावातील व्यवहार एव्हाना शहराकडे वळू लागले होते, तरी अजून केळीच्या बागा होत्या. १९९२ मध्ये भारताने सोने गहाण ठेवले, कॉम्पुटर शाप कि वरदान यावर डोके फोडून झाले, मंडल आयोग, खुली बाजारपेठ, फक्त कापसाचीच पेरणी, फवारे, ठिबक, उत्पन्न वाढवणारी औषधे, थायमेट, रोगोर, एन्डोसल्फान, यूरिया, डीपी ह्या नव्या शब्दांनी आमचे विश्व व्यापले. कृषी विद्यापीठांमध्ये यांचा प्रचार आणि प्रसार शासनानेच केला, चोरांचे दिवस सुरु झाले होते पण आम्हाला काय माहित कि आम्हाला आमच्याच शासनाकडून संरक्षणाची गरज होती. हरित क्रांती , धवल क्रांती अशा गोंडस नावांखाली सकाळ संध्याकाळ रेडिओ , TV वर मेरा देश महान , shining India , आणि काय काय जिंगल सुरु झाल्या. मार्केटिंग प्याकेजिंग चा तो पहिला अनुभव. कापसाचा भाव होता किलोला ला १८-२० रुपये आणि पेट्रोल चा १४ रुपयात बाटली (गावात घेतली तर- किराणा दुकानावर आता पेट्रोल ठेऊ लागले होते, पंपासाठी तालुक्याला जावे लागायचे आणि २० रु लिटर. पेट्रोल लागायचे फवारणीच्या पंपासाठी, एक - दोन फटफट्या होत्या गावात राजदूत, बुलेट आणि इंड-सुझुकी. 
           आमची पाण्याची गरज थोडी होती आणि सरकारी विहीर ती पूर्ण करायची. आमची भूक वाढली, लोकांची संख्या वाढली, दुरुपयोग वाढला आणि आम्ही आळशी झालो, आहे त्या पाण्याचे मोल राहिले नाही – जे नाही त्या मागे धावत सुटलो. मग जे हातात होते ते कोमेजून गेले. पाण्याचा वापर जपून होता कारण गरजा कमी होत्या. आता विहीर कोरडी ठाक आहे तिच्यात भोवतीचा राडा रोडा भरला आहे ती एका खड्ड्यासारखी दिसते. तिथे आता कुणी बसत नाही कारण बसायचे कट्टे ढासळून आता वर्ष झालीत. नव्या मंडळींना तिचे हे वैभव कसे कळावे ? तिकडे कुणी कुत्रे ही फिरकत नाही बाजूला पाण्याचा कधीतरी भरणारा हाळ आहे पण त्यावर गप्पा मारायची सोय नाही. उन्हाळ्यात जेंव्हा त्याची खरी गरज गुरा ढोरांना असते तेंव्हा तो शासना सारखा कोरडा असतो. विहीर स्वावलंबी होती - विहिरीला स्वत:चे पाणी होते. पाण्याचा हाळ परावलंबी होता. आमचेही तेच झाले नाही का ?

Comments

Popular posts from this blog

चिलयपाटी

नदी

मसनखडी आणि चुनीलाल गवळी

देवमाणूस

नाना

एसटी

नांगरणी

मराठी मुलांची शाळा, कासमपुरे

मनोगत

ओळख