ओटी आणि बीज

 संध्याकाळी पडून गेलेला तुफान पाऊस , शेतात वाफ असेल कि नाही हि चिंता पण पेरायचा उत्साह अगदी लहान मुलासारखा.

चलो - निकलो , व्होयो काई , कर अभी व्होयो नही थामारो ? काई थंडो मान्डो है थामारो.

चला निघा, झाले का तुमचे ? अजून झाले नाही ! अरे कसले निवांत राव ? अरे आटोप राजा लवकर जीव जातोय माझा इथे, सगळे पेरणे व्हायला पाहिजे. पेरण्यासाठी आणि प्रोजेक्ट म्यानेजमेंट च्या परीक्षेला सारखाच अलर्ट पण लागतो. दलींदर लोकांचा तो विषय नाही त्यांनी तिकडे फिरकूही नये.

बीजाचे रोपण हा पूजेचा विषय असतो, सारख्या लयीत , सारख्या तालासुरात , बैलांचे चालणे, पामरीचा वेग मागच्या पास धरनार्याचा वेग, चाड्ड्यावरची मुठ, माउलीचा वेग, मागे बैल हाणनार्याचा वेग सगळे कसे एक अद्वैत झालेले असते. सगळे बसतील पण त्यांना उसंत नाही, शेतकऱ्याला भरून येणारे आभाळ दिसते, त्याचा जीव कासावीस होतो, सगळे आज एकाच दिवशी पार पडलेत तर माझे पिक समान येयील. मोठ्या शेतकऱ्याला तर दुप्पट टेन्शन , पाऊस आला तर , काम अपूर्ण राहिले तर ? कितीतरी मजूर लावलेले असतात, त्यांची मजुरी वाया नको जायला. बिजवाई, मटेरेल भिजले तर ? पाणी आणून ठेवले का यांचे ? न्याहाऱ्या आणल्या का त्यांनी ? एक न धड चिंताच चिंता पेरायची चिंता - जोपासायची चिंता - विकायची चिंता. सुमन मामी या कामात तरबेज तिची मुठ म्हणजे मामाचे वर्ष भराचे उत्पन्न, दिवसभर बैल हाकणारा नामदेव भाऊ आणि सुमन मामी जेव्हा शेतात काम सुरु करायचे तेव्हा वाटायचे बघतच राहावे यांच्याकडे. एकेक तास (पिकांची ओळ) अगदी आखीव रेखीव , कुठे जागा सुटायला नाही पाहिजे, कुठे दाट पेरले तर उत्पन्न कमी, मरचा विचार करून इतकेच बीज टाकायचे कि सगळे उगतील तेंवा शेतकऱ्याला समाधान वाटेल. इतके मोजून मापून कि परब्रह्मच पेरायचा मामीच्या हातून - तो मनाचा विषय नाही. अंतर्मन काम करते पिकवनारयाला लेकरांची चिंता असते. आणि हा काही मिनटांचा विषय नाही दिवसभर, दोन तीन दिवस एकसलग. दिवसभर रुतलेले काटे मामी रात्री चिमणीच्या प्रकाशात काढायची , दारू पिलेला मामा गल्लीत आरडा ओरडा करायचा पण कुटुंबावर प्रेम करायचा. कमीत कमी 25-30 किलोमीटर चालत असेल त्या दिवशी ती , पण चेहर्यावर तेच प्रेमळ हसू , मुलांना , नवर्याला सांभाळण्याचा तोच समजूतदार पणा ! कुठून येती इतकी शक्ति ह्या आदिमायेत ? राकेलच्या धूर ओकणार्या चिमणीत तिला काटे कसे दिसत असतील ?

त्या संध्याकाळी बैलांना दान मध्ये ढेप, गव्हाचे पीठ मिळायचे टोपलीभर दान खाऊन ते तृप्त होऊन रवंथ करत बसायचे. बाहेर पाऊस पडला तर सगळे शेतकरी खुश कारण पेर चांगली उतरेल !

 

मटेरेल गरमी करून टाकीन मामा (उत्तम भाऊ ज्ञान टाकायचा ) ,

अरे चांगला बोल रे बाबा, इठी मही गांड दुखू राहिली अन तुले मजक सुचू राहिली का ?

पाह्य भो मी मजाक करीन का मामा संग ?

अरे या उत्तमकू चहा भेज रि ! घरात ऑर्डर सुटायची.

 

दिवे लागणीची वेळ , चुलीवरून भाजीचे पातेले बाजूला होऊन चहाचे आधन चढायचे ! तिथे चहाला खंड नसे , चूल आणि चहा यांचे वेगळे प्रेमाचे नाते होते.

सगळे सालदार , महिनदार , रोजनदार , ढोरके आणि शेतकरी एकत्र सुख दू:खाच्या गप्पा मारत उद्याची स्वप्ने रंगवत पेंगु लागायचे , मामा रेडियो वर भारुड किंवा बातम्या लावायचा , कधी "आपली शेती - आपल्या समस्या " यावर परिसंवाद असे ( परिसंवाद- पुण्या मुंबई वाल्यांना सुद्धहा जो शब्द डोक्यावरुन जाईल तो शेती विषयी च्या कार्यक्रमात का असायचा ? कुण्या बामनाचे भाषांतर असायचे बहुतेक) एकदा दगडू मामाची मुलाखत प्रसारित केली होती आकाशवाणी जळगाव केंद्रावरून आम्ही जीवाचा कान करून एकत होतो, मामा पेक्षा तो मुलाखत घेणाराच जास्त बोलत होता) , बहुतेकदा भारुड आणि ते गाणे आमचे कवितांसारखे पाठ असायचे, काही वेळा नको तिथे नको त्या गाण्यांमुळे पंचाईत व्हायची ( समोरच्याची आमची नव्हे ) उदा. "खेळतांना रंग बाई होळीचा होळीचा , फाटला ग कोना माझ्या चोळीचा ! अहो राया माझ्या हिरीला इंजण बसवा .. बाई तुझ्या उसाला लागलं कोल्हा ... आता हसू येते की मी किती लोकांची पंचाईत करून ठेवली असेल तेंव्हा, मोठी मंडळी डोळे मोठे करून दाटवायेचे पण त्या निरगसपणाला त्यांच्या कडेही उत्तर नसे. आणि जन मन प्रामाणिक होते , चांगल्या वाईटची जाणीव स्पष्ट होती

Comments

Popular posts from this blog

चिलयपाटी

नदी

मसनखडी आणि चुनीलाल गवळी

देवमाणूस

नाना

एसटी

नांगरणी

मराठी मुलांची शाळा, कासमपुरे

मनोगत

ओळख