पांडवप्रताप

 पांडवप्रताप

हटकर गल्लीत मंजुळा मावशीच्या घरी किंवा संपत मामाच्या घरी पांडव प्रताप, हरी विजय, श्री राम विजय, भक्ती विजय, नवनाथ किंवा महाभारत अशा पोथी वाचन असे. रोज रात्री ८:०० ते ९:००/१०:०० असे हे वाचन असे. मंजुळा मावशीच्या दारात उंबराचे झाड होते, तिचा मुलगा राजू माझ्या २ वर्ष पुढे होता. त्याला आम्ही जरदाळू म्हणत. गावात प्रत्येकाचे वेगवेगळे नाव होते. गावातील आया बाया आणि भाविक जण तिथे जमत. पोथी वाचनाराचे एक उच्चासन होते. इलेक्ट्रिक मोटर दुरुस्त करणारा अमरभाऊ मरमट हा एक उत्तम भाष्यकार होता. अमर भाऊ अंगलटने खूप बारीक होता जुन्या मराठीतील त्या ओव्या तो बोली भाषेत सोप्या करून वाचून दाखवायचा. नुकताच पडून गेलेला पाउस, चिखलातून चालत आलेले आम्ही तिथल्या पन्हालीच्या पाण्याने पाय धुवून आत शिरायचो, ओट्यावर किंवा घरात बसण्याची मांडणी असे. पटगर किंवा झोर्या अंथरलेला असे. 

वेगवेगळे लोक कुणबी मराठी आणि परदेशी भाषा बोलायचे त्यामुळे शाळेत आम्ही कुणबी मराठी आणि गावातील व्यवहारात परदेशी बोलायचो.

माय वो , आह्याSSSSSय भागाबाई काल कुठी गेलत्या ? ह्योनी आला ? कर वा या नामदेव आयोकी ? आज या कान्ह गयो ? सगळे कोरम पूर्ण व्हायची वाट बघत. थोडी चेष्टा मस्करी आणि शेतातील गोष्टी, गावातील बातम्यांनी पोथीचे warmup व्हायचे मग कुणीतरी सावध भक्त म्हणायचा, “आपण इठी पोथी वाच्याले आले आहे का लोकांची चिवड्याला ?” सगळे भानावर यायचे, किशोर वयीन मुले मुली चोरून लपून तोंडावर हात दाबून हसायच्या.

म्हातार्यांना कळायचे नाही त्यांना ऐकायला कमी येत असे त्यामुळे काय झाले याच्यापासून ते मैलभर लांब असत. पोथी एकने म्हणजे पुण्य मिळते या भावाने ते येत. सगळ्यांनी नमन केले कि ते पण वाकत.  सगळे जमा झाले कि मग पोथीच्या पारायणाला सुरवात होई. अमर भाऊ मग खड्या आवाजात वाचून दाखवी. त्याच्या वाचण्याला ताल होता. एकसुरी लयीत तो वाचीत असे. त्याचे सगळे उच्चार मी नीट ऐकत असे. त्या श्रोत्या मध्ये मी एक जाणकार श्रोता होतो. नुसत्या नजरेने आम्ही एकमेकांचे भाव वाचीत असू. मराठी अशा वेगळ्याच गतीने आत्मसात झाली. शब्द भरणा असा अकस्मात वाढला. त्याने कडवे म्हटले कि तो नजर फिरवायचा, लोकांचे प्रश्नार्थक भाव वाचायचा मग त्याचे निरुपण करायचा. तो काही बामन नव्हता आणि त्याचे काही मराठीचे वेगळे शिक्षण झालेले नव्हते पण तळटीपा पाहून आणि अभिप्रेत अर्थाचा मागोवा घेवून तो अगदी अचूक वेधायचा. एकदा ते शब्द आकळले कि मग पुढचे सोपे होते. त्या कल्पना, तो भावविलास, ती प्रतिभा अप्रतिम होती. रोजच्या व्यवहारातले ते दाखले त्या ग्रंथाला वेगळ्याच उंचीवर न्यायचे. अवघड शब्द सोप्या उपमांनी खुलून दिसायचे. सगळे कसे साधे सरळ होते. सांगताना तो सहसा चुकत नसे पण त्याचा कान उपटायला पण कुणीतरी म्हातारा असेच. वरतून एक भक्ती होती कि ह्या गादीवर बसुन माझ्याकडून चूक व्हायला नको. सगळे कसे प्रामाणिक होते स्व:ताशी पहिले प्रामाणिक आणि नंतर जगाशी. एक दोन कडवे जर त्याने fast forward केले तर मग कोणीतरी महिला मंडळातून आर्त हाक द्यायचा “माय वो आज काय तुमची गाडी ठेषण नी पकडू राह्यली, एवढा काय वाघ लागला का पाठी मांगी. परत वाचा, मग तो ओशाळून त्या सोप्या श्लोकांचे निरुपण मला करायला सांगी. छोटू बराबर पकडतो ओ माय, हुशार हाय तो. मी हुशार आहे असे मला लहानपणीच आया बायांनी सांगितलेले असल्यामुळे माझा तो गोड गैरसमज उर्वरित आयुष्यात अधिकाधिक घट्ट झाला. भीमाचे, हनुमानाचे वर्णन मला खूप आवडत असे. मारुतीराया किती हुशार आहे याचे तुम्ही अर्धा तास जरी चिंतन केले आणि ते गुण जर जीवनात आणले तर कुठल्याच देवापुढे मागायची गरज पडणार नाही. बाल हनुमानाच्या खोड्या, त्याची अफाट शक्ती, राम भक्ती, त्याची चतुराई, त्याची सुष्म बुद्धी, सेवाभाव, नम्रता, मैत्री, स्वानुभवावर सिद्ध करण्याची वैज्ञानिक चिकित्सक (सीता मातेचे दिलेले अनमोल हारातील मणी त्याच्या साठी मातीमोल कारण त्यात राम नाही -  त्याच्या अंतर्यामी राम आहे हे तो सिद्ध करून दाखवतो), प्रसंग सावधान (आख्खा द्रोनगिरी उचलण्याची कल्पकता). हनुमानाचे स्टीकर, बरेच दिवस माझ्या शाळेच्या पेटीवर आतल्या बाजूला मी चिटकवलेले होते. तुमचा स्पायडरमन आणि डोरेमोन आहेत इतके गुणी ? हे सगळे टोनिक फार लवकर मला मिळाले, माझ्या गावाचे ते ऋण आहे.    

 भीम - दु:शासन वधात, दु:शासनचा बाहू रानपलांडू सारखा उपटून त्याची छाती फाडून त्याचे रक्त गटागटा मैरक मद्यासारखे पितो आणि ते रक्ताने माखलेले हात घेवून सैरंध्रीला शोधतो तिचे केस बांधण्यासाठी. कुठल्या ऑस्कर विनर डायरेक्टर हा प्रसंग तुमच्या मानस पटलावर इतका खोलवर चितारू शकेल ? आजही ते वर्णन डोळ्यापुढून जात नाही. प्रत्येक दिवसाची एक उत्सुकता असे. पुढे काय हि उत्कंठा असे. रावण हा सीतेचा मागच्या जन्मीचा पिता असे काही बाही निघाले कि जाणकार त्यावर भाष्य करीत, “हे त भक्ती विजय मध्ये निघेल हाय”.

काय योग्य आणि काय अयोग्य याची बैठक त्या काळी घट्ट होती. समाजमन किडलेले नव्हते, साधे होते पण सदाचारी होते. व्यसनांना स्थान नव्हते. चांगल्या वाईटाची चाड  होती. एकेक ओळ म्हणजे अमृतानुभव असे. करमणूक, ज्ञान प्रबोधन, सद्विचार कानी पडून मन शांत होई. अरे त्या देवाला सुद्धा चुकले नाही बाबा प्रारब्धाचे भोग आपण तर साधी माणसे. दु:ख वितळून जाई. आता ती सोय नाही, आता दु:ख आतल्या आत खदखदत असते आणि cancer बनते. रोज रात्री एकत्र आल्यामुळे एका मोठया कुटुंबाचे आपण सदस्य आहोत हि भावना बळावत असे, बहुधा हेच कारण आहे कि गावातील जुने चेहरे मला सगळे माझ्याच घरातील वाटतात. त्यांना काही मागतांना काही गैर वाटत नाही आणि काही देताना वेगळे वाटत नाही. पेंगुळलेल्या जीवांसाठी एक चहाचा ब्रेक होई, त्यासाठी लागणारे सामान बरोबर गोळा होई. चहा कसा करावा याचे शिक्षण तिथेच झाले कि आणि बोघनी राखेने कशी घासावी तिकडेच तर शिकलो. २-३ कप बशीत चहा वाटला जाई, मानाप्रमाणे नंबर येई. पहिले गुणी जन, मग वयस्कर, मग आयामाया आणि मगच मुले. छोट्यांचा नंबर पहिले लागे कारण ते ओरडून घर डोक्यावर घेत “माय मले देन वो”. आलेले कप बशी धुणे, परत भरणे, वाटणे, तोल सावरत - रस्ता काढत कुणाच्या अंगावर पाय न देता चालणे असे motoring skills develop होत.  असा २० मिनिटाचा ब्रेक असे, तंबाखू आणि बिडी वाले अशा ठिकाणी येत नसत. त्यात मग कुणाला चांगले मार्क पडले तर त्याचे पेढे, कुणाला भाऊ झाला, कुणी गावावरून आला असे ऐनवेळीचे प्रसंग भर पाडीत. 

त्या जागेला फुलांचा, उदबत्तीचा, पाउसाच्या कुंद हवेचा, इतक्या सगळ्या जीवांच्या श्वासाचा एक उबदार वास असे. चहा नंतर दुप्पट जोमाने अमर भाऊ निरुपण करीत असे, पेंगणारे पण सावध होऊन माना डोलवित असत. प्रश्न विचारीत असत, कोडी घालत असत. रात्रीचे १०-११ वाजले कि उद्या उठायच्या चिंतेने आरतीची तय्यारी होई.

बाहर भीतर देखू तुमको बलहारी, त्रिभुवन के सैय्या, मथूराके राजा, यादव माणिक साधो !

इतर एक दोन आरत्या, ताट, तांबे ढोलकी वाजवून म्हटल्या कि झोप उडून जाई. गल्लीत अंधार असे, कुत्री भुकत. म्हशी झोपलेल्या असत, पायाखालची डबकी आणि चिखल तुडवत परत घरी येत असू, पाय धुतले जात आणि कधी एकदा गोधडीत शिरू असे होवून जाई. गाढ झोप लागे, भूतांची काळजी हनुमानावर सोडून आम्ही निर्धास्त झोपत असू.        

अधिक महिना, धोंड्याचा महिना, निर्जला एकादशी, वैकुंठ एकादशी चे संस्कार मनावर फारच खोलवर होते. पारायण महिनाभर चालत असे, प्रत्येक दिवस थोड्थोडी प्रगती होई, वाचनाराला अंदाज असे, मग त्यानुसार तो योग्य ठिकाणी दिवसाचा अध्याय संपवी. सगळे अध्याय संपले कि सांगता होई त्या दिवशी दुपारी जेवण असे. सगळ्या श्रवणी मंडळीना अगत्याने बोलाविले जाई. भात, दाल-बट्टी किंवा बाफले आणि वांग्याची किंवा कांद्याची चटणी असे. केळीच्या पानावर तूप आग्रहाने वाढले जाई. सगळे घरचे, झिरो बजेट शेती सारखे. धान्य घरचे, भट्टीचे जलावन रानातील वाळलेल्या झाडांचे, आचारी घरचे आणि वाढणारे आणि खाणारेसुधा घरचेच. झिरो कार्बन फुट प्रिंट आम्ही जगायचो, सगळे उष्टावली आणि पाने उकिरड्यावर खत बनत. तेल आणि वनस्पती तुपच ते काय नंतर बाहेरून येऊ लागले. आग्रह करून करून वाढले जाई, यजमान घरचे डायरेक्ट बट्ट्या चुरून देत त्यामुळे नाही म्हणायची सोय नसे. हसत खेळत, थट्टा मस्करी करत जेवण चाले. त्या जेवणात कुठे कॅलोरी नव्हत्या आणि त्याने कधी ग्यास पण झाला नाही. ते चोचले बाजाराने दिले आमच्या शरीरांना.

                    आता देव्या बसतात, प्रत्येक मंडळाच्या एक अशा ४-५ बसतात. मंडळ गावातूनच वर्गण्या गोळा करतात, पुढारी मतदार संघ बघून सगळ्यांना खुश करीत लोकांचे चोरलेले असे फुकटचे पैसे दानशूर पनाचा आव आनुन वाटतो. देवी पुढे सकाळ संध्याकाळ कान फाटे पर्यंत सिनेमाची गाणी वाजतात. “चोली के पिच्चे आणि चुनरी के नीचे” समजावून सांगितले जाते. मातीची मूर्ती ५-१० हजाराची बाहेरून विकत आणतात, त्याच्या सजावटीवर आणि बांजो १०-२० हजार वर वेगळा खर्च, फारच सुलक्षणी असतील तर भागवत सप्ताह ठेवतील पण त्या वाचणार्याचा पण एक १० हजार पासून रेट आहे, वाचणारा बाबा आव आणून वाचतो पण ते काळजाला भिडत नाही कारण त्यात राम नाही. दर १५ मिनटाला राधे श्याम चा फिलर टाकून ब्रेक घेतो, त्याला घ्यायला इनोवा, सोडायला सफारी. श्रोते पण दुपारचे कल्टी मारून पसार होतात एक झोप मारून येतात. लाईन नसली कि गावात देवी बसली आहे कि नाही असा संशय यावा. शेवटच्या दिवशीचा भंडार्याचा सामान जळगाव वरून येतो, अगदी केळीच्या पानासारखी दिसणारी प्लास्टिक ची कागदाची पत्रावळी सुद्धा. गावातील पैसे बाहेर शहरात व्यापार्यांच्या घशात जातात. मंडळाचे राजकीय वाद होतात, उरले सुरले वाचणारा बाबा घेवून जातो. कार्यकर्ते शेवटच्या दिवशी तर्राट होवून नाचतात. नंतर उरलेल्या आणि फाळके मारलेल्या पैशाचे बोकड आणून त्याची मटन पार्टी वेगळी. पांडव प्रताप यांच्या डोक्या बाहेरचे आहे. हनुमान यांना कळला असता तर हे दारूचे उपासक झाले नसते. चवचाल बाजाराने निर्माण केलेली हि भस्मासुरे जाळण्यासाठी किती विष्णू लागतील कुणास ठावूक? हे देवीचे उपासक अनवाणी पायांनी गडावर जातील, ज्योत आणतील, उपवास करतील पण यांची अंतर्यामीची ज्ञानज्योत मालवली आहे तिला कसे पेटवावे हा खरा प्रश्न आहे. मनातले गाव मनातच बरे त्याचा पण बाजार करतील हे.

Comments

Popular posts from this blog

चिलयपाटी

नदी

मसनखडी आणि चुनीलाल गवळी

देवमाणूस

नाना

एसटी

नांगरणी

मराठी मुलांची शाळा, कासमपुरे

मनोगत

ओळख