बशीर ब्रास ब्यांड लोहारा.

 बशीर ब्रास ब्यांड लोहारा.

 लग्न मंडप सजलेला असे, यांचे आगमन व्हायचे तेच मुळात मोठ्या ढोल च्या उगीच वाजवलेल्या बीट्स ने. खुळखुळा, मधूनच पितळी पिपाणी चा आवाज खात्री करून द्यायचा कि आम्ही आलो आहोत. (We arrived) आम्ही हातातील सगळी कामे सोडून तिकडे धाव घ्यायचो. सुरवातीला ते आले म्हणजे घाम पुसायचे त्यांना शेजारच्या गावातून पायी चालत यावे लागायचे, वाद्य साधने डोक्यावरून खाली उतरवायचे, ५-६ जन असायचे बाकीचे २-३ transit मध्ये असत. मुसलमानी हिंदी आम्ही यांच्या कडून शिकलो. (तेरकू मै क्या कह रा, तू पाणी लेके आन भाऊ. मेरकू बडी प्यास लगी है, कित्ता तपरा आजकल.) धावत जावून जग आणायचा भरून पण तेवढे पाणी एकटा मास्टरच पिवून टाकायचा. “ओ बेटा तू वो पानिकी कळशी भरके ला, इत्तेमे हमारा क्या होता !”

  दोन्ही हातांनी तोल सावरत कळशी भरून दिली कि ते आम्हाला त्यांच्या पिपाण्याना हात लावू देत. मास्टर म्हणजे आम्हांला परब्रम्ह वाटत असे. म्हणजे त्याने आमचे आवडीचे गाणे वाजवले तर, याची देही याची डोळा त्याचा प्रत्यय येई. आर बाजेवले, बजाव. फुकट के पैसे लिये वाटत, कुणीतरी दारुड्या पिंक टाकायचा, मास्टर ओशाळयाचा पण त्याची बोलवणी करीत असे. काल रात्रीचा hangover असल्यामुळे त्यांना जेवून झोपायची पडलेली असायची.

अरे ये शिवलाल “ये मास्टर कू आणि इका आदमींकू रोटी खला दे भला” नानाची ओर्डर सुटायची, मग काय आंम्ही कारभारी पणे शिवलालचा कंट्रोल घ्यायचो. भाऊ तू फक्त पान दाल, बाकी हाम देख लेंगा. देवढीत मास्टर आणि पार्टीचे पान वाढले जायचे. गरम पुर्या, तेलाचा तवंग असलेली बादली आणि दाल ची वाढी एक स्पेशल यांच्या साठी आम्ही राखून ठेवायची. आग्रह करून करून बुंदी वाढायची “अरे बसरे बेटा, पेट फट जायेंग हमारा ! अल्ला ताला तेरेकू बहोत बडा आदमी बना दे”. गप्पा रंगायच्या, जुने लग्न आठवले जायचे. बुढा भगवान है याहान का, काकाने किसीको खाली हाथ नाही भेजा इस घरसे. ते आम्हा नातू मंडळीना सगळ्यांना ओळखायचे ! बहेन का छोरा न तू , अरे कित्ता बडा हो गया, तेरी शादी मी बुला न रे भै हमको. जेवण झाले कि ते सगळे धाब्याच्या मातीच्या घरात कड्ब्यावर सतरंजी टाकून झोपायचे, बाहेर हत्ती येऊन गेला तरी मग त्या घामेजलेल्या शरीरांना कुणी उठवू शकत नसे. एक पोर्या त्या वाद्य वृन्दावर लक्ष ठेवत असे, बारके आगाऊ पोरे त्या ढोला ला ढम करून मारून पळून जात, लहानपणी मित्रांना डेरिंग दाखवायची संधी म्हणजे पोर्याचा डोळा चुकवून आम्ही २-३ ठोके मोठ्या ढोलावर officially वाजवत असू ( रीतसरपणे हातात तो अडकवलेला ठोका घेवून) तो पोर्या मारायला धावला तर मग इकडून कुणी तरी खुळखुळा वाजवीत असे. झोपलेल्या मंडळींचा आर्धा जीव साजोसामानात असे. जसे आम्ही समजूतदार झालो तसे आम्ही पोर्या ची मदत करत असू. पोर्या मग बुलबुल ची प्रक्टिस करत आम्हाला पण थोडे फार पाहू देत असे. सगळी दुपार मग त्या सामानाच्या भोवती जात असे. मोठ्या पिपाण्या ते घसा फुगवूनच वाजवू शकत, त्यांच्या तटट फुगलेल्या शिरा बघून महाभारतातल्या भीमाची पौंड्र शंखाची आठवण येत असे. जशी जशी संध्याकाळ कलत असे तसतसे एकेक शिलेदार मास्टर आणि पार्टी ला येवून भेटत. काळी पिपाणी हि फार महत्वाची वस्तू, ह्या साजाला फक्त मास्टर आणि फक्त मास्टर च हात लावीत असे. तिला तो कुठे ठेवत असे हे आम्हाला कधीच कळले नाही. संध्याकाळी लांबूनच मास्टर चा छोकरा जो मिथुन किंवा अमिताभ किंवा जितेंद्र सारखा दिसे हातगाडी घेवून हजर होई. सजवलेली हातगाडी कधी जीप सारखी तर कधी हेलीट्रक्टर सारखी दिसे (हेलिकॉप्टर नाही) तिच्या दोघा टोकांना लांब स्पीकर लावलेली असत. त्यांचा आवाज ऐकला कि शेतात गेलेला बाल मजूर वर्ग पळून येत असे.

मास्टर चा पोर्या म्हणजे आमचे आराध्य, त्याचे कपडे (leather ची pant-shirt ), त्याची झुल्फे. तो बोलायचा सुद्धा अमिताभ सारखा. एक पाय गाडीच्या चाकावर ठेवून तो उगीच Estyle ने वाजवायचा. hallo mike टेस्टिंग ready १-२-३. इकडे मास्टर आणि पार्टी ला चहा-पाणी द्यायला आम्ही कुणातरी छोट्या शिपायाला delegate करायचो. जेवून-झोपून फ्रेश झालेली ती मंडळी म्हणजे आज रातकू खैमाना है ! त्यांचा नूर पार पालटलेला असे. ब्रिटीश जनरल कोर्नावालीस्चे कपडे ते सगळे घालत असत, इतके चकाचक कि दुपारी घामाघूम होवून पायी चालत आलेली मंडळी हीच का हा प्रश्न पडावा. मास्टर ची शिस्त कडक होती. इंदिरा गांधी च्या हाताने त्यांना पारितोषिक मिळाले होते ए मेरे वतन के लोगो जरा आखमे भरलो पाणी ह्या गाण्या साठी. त्यांच्या बद्दल मला आजही कमालीचा आदर वाटतो. ते त्या जगाच्या पलीकडचे होते. शरीर, कपडे तिथले असले तरी प्रतिभा अद्वितीय होती, त्यांचे त्यांच्या कामावर प्रेम होते, ते नवनवीन प्रयोग करीत असत.

एकदा हातगाडी तय्यार झाली (घरातून त्यांना लाईन द्यावी लागत असे त्यामुळे generator चा आवाज नसे ) कि घोळका करून सगळे युनिफोर्म तय्यार असत. मास्टर सोडून सगळ्यांच्या पायात परागोन स्लीपर किंवा रबरी बूट असत. मास्टर चा backup म्हणजे त्याचा बुलबुल वाजवणारा मुलगा. २०-२५ जणांचा तो वृंद सुरवातीला आरती टाकायचा. ओम जय जगदीश हरे ! त्याची चाल, लय, ताल कधी कुठल्या मंदिराच्या आरतीत पण सापडली नाही.

आणि  सलामीलाच “देवा हो देवा गणपती देवा हमसे बढकर कोण) एव्हाना आमच्या अंगात आलेले असे. इस्त्रीचे pant-shirt , शूज, perfume घालून कधी एकदा हात पाय मोकळे करू असे होवून जाई. अंगणात नाचायला उतरले की ओवाळण्यासाठी रांग लागे, १-२-५-१०-२०-५०-१०० नातेवाईकात चढाओढ सुरु होई, ( काढणा दायक्या, ५० कि काई कंजुषी कर रहे है अन्ना ने तेल टाकले म्हणजे आणखी उत येई अण्णा म्हणजे आमचे पाहुणे ६.५ फुटी अण्णा साठी एक वेगळा chapter लागेल.) इतके पैसे पण सगळे मास्टर च्या सह कलाकाराकडे जाई. त्यात मग कोणी तरी शक्कल काढली, काही वेळा आमची ओवाळणी मग आमचे खिसे भरत.

           २०-२५ गस बत्ती पेटवली जायची,  त्यांना डोक्यावर घ्यायला तितकीच वाड्यातली मुले, माणसे रोजाने लावली जायची. बायका नटून थटून, घोडा सजून धजून नवरा मुलगा किंवा नवरीला त्यावर बसविले जाई. इतक्या आवाजात मागे बायका वेगळी गाणी म्हणत. त्यासाठी असणारी भातिन आणि तिचा ढोल म्हणजे नगार्यात टिमकी. ४-५ गाणी वाजवून झाली अंगणात कि हळूच कुचाचा इशारा व्हायचा, मास्टर मामाचा आदेश डोळ्यांनी समजायचा. पुढच्या २-३ चौकात येई पर्यंत मोठ्या टग्या मित्रांनी कंट्रोल घेतलेला असे. “डॉन को गाणो लगा मास्टर” पायांची उडणारी धूळ, फटाक्याचा वास, बंदुकीच्या गोळ्यांचे फायरिंग, कपड्यांचा परफुम, एक वेगळाच वास आसमंतात भरून असे. नाचावे कि फटाके फोडावे ह्या द्वैतात काही वेळ जायचा.

“आज मास्टर कू थाकाबाको है, चलो बाजो बजाव” ! चा कल्ला व्हायचा. मास्टर आणि पार्टी ला सगळ्या गावांचे अनुभव असायचे, त्यातल्या त्यात कासमपुरा, जन्गीपुरा हि सांभाळून राहायची ठिकाणे.        

आता खंड नाही, संध्याकाळी सुरु झालेला वाजा सतत ७-८ तास वाजत असे. त्यांना पण एक कला अवगत असे, न थांबता ते कितीतरी तास सलग वाजवीत असत. दारूड्यांची उतरली कि ते परत चार्ज करून येत, ती सोय मात्र मास्टर आणि पार्टी कडे नव्हती. ते फक्त पाणी मागत. मग कोणी तरी भाला ( गोल दगड ८० kg चा ) घेवून येई, मास्टर आणि पार्टी ला आता डफड्याच्या चालीवर वाजवावे लागत असे. ढान्ग्या दद्दंग- ढान्ग्या. तो भला फ़क़्त पैलवान उचलू शकत असे. हनुमंताचा दगड तो, नुसत्या ताकदीने त्याला उचलता येत नसे, टेक्निक होते त्याला अंग खांद्यावर घ्यायचे. मग चुरस चाले, कुणीतरी लाठी फिरवून दाखवी, पट्टा फिरवी काळा मागोमाग हे सगळे उद्योग बंद झाले. (त्या भाल्याला कुणी तरी घराच्या खोदलेल्या पैय्यात टाकले, घर बांधून झाले पण त्याला रात्री रोज स्वप्नात माकड येई, त्याला शेवटी बांधलेले घर तोडून तो भाला काढून हनुमानाच्या मंदिरा जवळ आणून ठेवावा लागला.) रात्री १२-१ वाजता होळी पटांगण मध्ये बीद यायची एव्हाना सगळ्यांचा जोर उतरलेला असे. बायका ८०% गायब असत. एक योगाचा डोंबार्याचा - उलटे होवून रुपयाचा नाणे कपाळाने उचलण्याचा प्रयोग व्हायचा. चलो चलो थांबो थांबो च्या भानगडीत मास्टर आणि गाडी अंगणात येत असे. सगळे पेंगुळलेले किंवा पांगलेले असत. आता उद्याच्या वरातीचे वेध लागलेले असत. मास्टर थांबलेले असत वाट पाहत आणि मी त्यांना आणि पार्टीला पाणी द्यायच्या बहाण्याने त्यांची विचारपुस करीत असे.

मास्टर मैने सुना है आप बहोत अच्छा बजाते है एक बार शहनाई बजायीयेना. माझे मन मोडायला त्याला जीवावर येई. सगळ्या शांततेत त्यांची एकट्याने वाजवलेली शहनाई त्या मंडपात लग्न असल्याची जाणीव घट्ट करीत असे. इतका सगळा थकवा, झोपेचा प्रभाव लांब पळून जाई. आपल्यासाठी स्पेशल मास्टर ने शहनाई वाजविली हे समाधान गहिरे असे. त्या सगळ्या गोंधळात ती शेवटची एक शहनाई, तो solo performance आम्हा दोघांना वेगळ्याच विश्वात नेई. 

“अरे झोप रे नाना, झोपू दे त्या मास्टर ला पण उद्या जायचे आहे न ! “ मामा हसून रंगात भंग टाकायचा. मन, शरीर तृप्त झालेले असे.

Comments

Popular posts from this blog

चिलयपाटी

नदी

मसनखडी आणि चुनीलाल गवळी

देवमाणूस

नाना

एसटी

नांगरणी

मराठी मुलांची शाळा, कासमपुरे

मनोगत

ओळख